☼ लेखकाचा परिचय ☼
श्री. नरेंद्र जगन्नाथ चौधरी ऊर्फ नरेंद्रनाथ महाराज यांचा जन्म ललिता पंचमी ९/१०/१९३७ रोजी अकोला येथे सुविद्य घराण्यात झाला. वडिल ऍडव्होकेट होते, ते व आई त्या काळात कॉंग्रेसच्या चळवळीत सक्रिय होते. बालशिक्षण पद्धती त्या काळात त्यांनीच प्रथम सुरू केली.
शासकीय शाळेतून शालेय शिक्षण घेऊन १९५८ साली नागपूर विद्यापीठातून बी. कॉम झाले. त्यानंतर १९६२ साली चार्टर्डअकाउंन्टंट झाले. याच दरम्यान कॉस्ट ऍण्ड वर्क्स अकाउंन्टंट्स तथा एलएल. बी. चा कोर्स केला. शॉर्ट हॅड टायपिंग, रेडिओ इंजिनिअरिंगचा सर्टिफिकेट कोर्स केला. १९६८ साली एक्सटर्नल एम. कॉम.ची पदवी घेतली.
विद्यार्थी दशेत असताना ते बौद्धिक तर्कतुर्क करणारे नास्तिक विचारांचे होते. १९५७ साली नाथपंथातील योगाभ्यानंद व्यंकटनाथमहाराजांशी त्यांचा संपर्क आला व तेथूनच त्यांचे आचार-विचार व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. १९६३ च्या नाथषष्ठीला सद्गुरू व्यंकटनाथांचा अनुग्रह मिळाला आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला आणि व्यवसायाला सुरूवात झाली.
१९६४ साली नागपूर येथील एम. ए. इकॉनॉमिक्स गोल्ड मेडिलिस्ट कु. कुंदा तांबे हिच्याशी ते विवाहबद्ध झाले. प्राध्यापिका सौ. कुंदा चौधरी या इकॉनॉमिक्सच्या हेड ऑफ दि डिपार्टमेंट होत्या व आज त्या शिक्षण स्थेच्या अध्यक्षा आहेत. मुलगा हा देखील चार्टर्डअकाउंन्टंट म्हणून प्रॅक्टीस करीत असून, मुलगी एम. कॉम. होऊन पुण्यामध्ये सॉफ्टवेअरच्या स्वतंत्र व्यवसायात आहेत. लेखकाने पुणे विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले व पुणे विद्यापीठाचे परिक्षक म्हणून देखील बरेच वर्षे कार्य केले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्डअकाउंन्टंटच्या कोचींग बोर्डाचे ते एक्झामिनर होते. प्रॅक्टिसच्या कालावधीत प्रा. पी. के. अत्रे आदींसारख्या व्यक्तींशी व्यवसायिक संबंध आला. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँक नॅशनलायझेशन्सच्या विषयावर व्यक्तिगत भेटीसाठी व चर्चेसाठी बोलवले होते. याच कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सेक्रेटरीयल प्रॅक्टिस या विषयावर पुस्तक प्रसिद्ध केले होते. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाखाचे शिक्षण दिले होते. याच दरम्यान अध्यात्मिक विचारांचे मासिक ‘स्वानंद’ हे सर्व सामान्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करीत होते.
बदलत्या काळाचा, तंत्रज्ञानाचा ओघ लक्षात घेऊन १९८६ साली कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले आणि विदर्भाच्या त्या भागात खासगी क्षेत्रात कॉम्प्युटरसेवा प्रथमच सुरू केली व अनेक विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे शिक्षण देऊन प्रशिक्षित केले.
सद्गुरुच्या सेवेत, सान्निध्यात मिळेल तेथे व मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ घालवून प्रॅक्टिस करीत होते. १९९३ च्या महाशिवरात्रीला सद्गुरू व्यंकटनाथमहाराजांनी समाधी घेतली. सद्गुरुंच्या आज्ञेवरून तेव्हापासूनच गुरुकार्याला सुरुवात केली. वेदमंत्राच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन ची योजना केली आणि त्या प्रमाणे १९९७ साली प्रल्हाद आश्रम चर्तुवेद पाठशाळेची स्थापना केली. येथून विद्यार्थ्यांना निःशुल्क रहिवाशी शिक्षण देणे सुरू केले.
अनेक शिष्यांसमवेत हिमालयाच्या दुर्गम भागापासून ते देशातील अनेक छोट्या मोठ्या गावाशहरांपर्यंत नाथपंथ कार्य प्रसारित केले व पुढे आध्यात्मिक शक्तीचे केंद्र ‘नाथशक्तीपीठ’ अकोला येथे स्थापन केले. या शक्तीपीठाच्या माध्यमातून वेद शिक्षण, प्रचार, प्रसार व अनुभूतीचे कार्य, नॉन कन्व्हेन्शनल एज्युकेशन, समाजातील कोणत्याही व्यक्तीला त्याला आवश्यक वाटणार्या कोणत्याही प्रश्नासाठी वेदंत्राच्या माध्यमातून काळजीमूक्त करण्याचे कार्य तथा नाथपंथाच्या पंरपंरेचे गुरुंच्या आज्ञेप्रमाणे कार्य पुढे वाढविले. तेव्हापासून ते नरेंद्रनाथमहाराज म्हणून ओळखले जातात.
प. पू. व्यंकटनाथमहाराजांच्या परमकृपेने प्राचिन विद्या, मंत्र, तंत्र तथा चालिरीती लक्षात घेऊन आणि जनसामान्यांच्या अडचणींचा अभ्यास करून वेदांची महती व पंथावर कृपा करणार्या देवतांच्या तत्त्वांचा अभ्यासकरून नरेंद्रनाथांनी विविध पूजांच्या पद्धती, यज्ञप्रयोग व इतर विधानांचा अभ्यासपूर्ण पूजाविधी व प्रयोग तयार केले. या प्रयोगांना विशिष्ट प्रकारच्या उपासनेची जोड दिली. कोणत्याही व्यक्तीची जन्मपत्रिका, त्याच्या जीवनात घडलेल्या विविध घटना व त्याला भेडसावत असलेल्या समस्यांचा अभ्यासकरून त्यांच्याकडून यथायोग्य वरील पूजांचे कर्म करवून त्या व्यक्तीला दुःखमूक्त करून त्याचे जीवन आत्मविश्वास, यश व आवश्यक वाटणारे सूख मिळवून देऊन त्याचे जीवनात त्याला सुखी, समाधानी करण्याचा अभिनव प्रयत्न ते करतात.
अशा प्रमाणे कार्याला सुरुवात केल्यानंतर अनेक विद्वानांचा, साधूसंतांचा संबंध आला. विशेष उल्लेख करण्यासारखे म्हणजे जालना जिल्ह्यातील सावरगाव येथील प. पू. महामहोपाध्याय ब्रह्मर्षी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी नरेंद्रनाथांच्या पंथकार्याची, वेद कार्याची व वेदमंत्राच्या माध्यमातून होणार्या ‘भाग्याच्या पुनरुज्जीवनाची’ स्वतः खात्रीकरून अनुभूती घेतली आणि नाथशक्तीपीठाच्या कार्याचा गौरव व स्तुती केली. नाथशक्तीपीठाचे कार्य लक्षात घेऊन कांचीकामकोटीचे जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्रसरस्वती स्वामी महाराज यांनी लेखकाला विशेष आमंत्रण देऊन आपल्या पीठावर बोलावले आणि नाथशक्तीपीठाच्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करून त्यांचा विशेष सत्कार केला. प्राचीन भारतामध्ये प्रसिद्ध असणारी हवन संस्कृती आज देखील तेवढीच व्यापक व प्रभावी आहे. याचा अनुभव नाथशक्तीपीठाच्या कार्यातून अनेकांनी घेतला आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये पंचमहाभूते, चार वर्ण, चार युग, चार निजतत्व, चार गुण व बारा घरांची जन्मपत्रिका तसेच वेद, विज्ञान, अध्यात्म आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध व त्याचा प्रत्येक मानवावर होणारा परिणाम तसेच प्रत्येकाच्या जीवनात येणारे अडसर व त्याची कारणमिमांसा आणि त्यावर प्रभावी उपाय योजना यांचा सूत्रबद्ध उल्लेख केला आहे.