☼ सुखाच्या शोधांत जीवाची भटकंती ☼
जीवनात प्रत्येकाची धडपड ही सुखाच्या शोधात असते. सुख मिळविण्यासाठी प्रत्येकजण सुचतील तसे, वाटेल ते प्रयत्न करतो. तो अहोरात्र ह्यासाठीच धडपडत असतो. पण एवढे करून सुख मिळते का? सुखाच्या शोधात माणूस हिंडतच राहतो. आपले हाल करून घेतो; पण देवावर विश्वास आहे किंवा नाही, नित्य पूजापाठ, उपासना होते किंवा नाही, ह्यावर जीवनाचे सुख किंवा आनंद अवलंबून नसतो, तर माणसाच्या सच्छीलतेवर, सज्जनतेवर व यथायोग्य नित्यकमार्ंवर, त्याच्या संस्कृतीवर, जीवनाच्या दैनंदिन कृतींवर,दातृत्वावर, त्याच्या चारित्र्यावर जीवनाचा आनंद अवलंबून असतो. आर्थिक सुबत्ता वा सर्व तर्हेचे स्वर्गोपभोग हे आत्मिक आनंद केव्हाही देऊ शकत नाहीत.
जीवनातील दु:ख, व्याधी, असफलता, असमाधान आदींचा जो सतत अनुभव येतो, त्याचा नाश कसा करता येईल,काय केल्याने असा त्रास दूर होईल, हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आजच्या युगामध्ये दिशाहीन झालेले जीवन योग्य व सुनिश्चित दिशेने वाटचाल कसे करू शकेल, मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन कसे स्थिर होऊ शकेल,हे जाणून घेणे गरजेचे झाले आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव जगणारच. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तो जगणारच. परंतु जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन कसे गेले, याचा प्रत्येक विचारी माणूस आढावा घेतो. पूर्ण आयुष्याचा उपभोग घेतल्यानंतर जेव्हा वृद्धापकाळ येतो, माणूस क्षीण होऊ लागतो तेव्हा तो कळत- नकळत मृत्यूची वाट पाहू लागतो. अशा व्यक्तीला इच्छा करूनही मरण येत नाही. याउलट तरुण, होतकरू मुलगा अचानक इहलोक सोडून जातो. हे असे कसे घडते? खरे पाहिले तर हा सर्व कर्माचाच सर्व खेळ आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे कर्म चांगले नसेल, कर्माचा अभाव असेल तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत कर्मदोषाच्या परिणामादाखल संपूर्ण कुटुंबव्यवस्था हादरून जाते.
सुख कोठे आहे म्हणूनी हिंडसी का विषयी अजुनी मानवा|
धनसंचय जरी तू करिसी - तरी दु:ख तुझ्या पाठीशी मानवा|
मायेची वृद्धी झालि परी वांछा नाही शमली मानवा |
लागला शोध का तुला? सुख न पावला-
घेई जाणोनी घेई जाणोनी का बघसी डोळे मिटुनी मानवा |
घरदार सोडुनी गेला गिरिकंदरी शोधत बसला मानवा |
पंढरपूर-काशी गेला परि गेला तैसा आला मानवा |
सुख कुठे? साकडे पडे, नाही चहूकडे, सांगतो बघ मी,
सांगतो बघ मी, शिणू नको वृथा हिंडुनी- मानवा |
दशदिशेस चंचल सौख्य, जाशील रे तेथे दु:ख मानवा |
हृदय एक ऐसे स्थान आत्मसौख्य भरले पूर्ण मानवा |
देहि ह्या गुंतुनी सया सौख्य हे लया जाई निशिदिनी
जाई निशिदिनी कळत न का तुजला अजुनी मानवा ?
अशी माणसाची जीवनातली अवस्था आहे. तरीही तो सर्व गोष्टी बाजूला ठेवून सुखाच्या शोधात आणि सुखप्राप्तीसाठी आपले सारे आयुष्य खर्ची घालतो. अशा प्रकारे जीवन व्यतीत करीत असताना माणसाला अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागते. जीवनात त्याला अनेकवेळा हा प्रश्न पडतो, की हे त्याचे पूर्वसंचित की त्याचे प्रारब्ध? हे कोणाचे शिव्याशाप? जीवनात मी असे काय कोणाचे वाईट केले, की आज मला हे दिवस पाहावे लागतात? या सर्व गोष्टींचा उलगडा होण्यासाठी पूर्वसंचिताचा जीवनावर कसा प्रभाव असतो? जीवनात घडणार्या घटनांवरून कर्मदोष कसे समजू शकतात? हे जाणून घेण्यासाठी जीव कसा घडतो? ब्रह्मांड म्हणजे काय? ते कसे चालते?
ब्रह्मांडाचे नियंत्रण कसे होते? ब्रह्मांडाची तत्त्वप्रणाली काय आहे? पंचमहाभूतांचा जीवाच्या जीवनप्रवाहाशी कसा संबंध असतो? आपण ज्याला नशीब समजतो ते काय आहे? आपले प्रारब्ध काय आहे? ज्योतिषशास्त्र ह्या बाबतीत कसे मदत करू शकेल? ते पूर्वसंचित कसे बदलू शकते? आत्म्यावर कर्माचे कसे संस्कार होतात? संपूर्ण सृष्टीचा आधार असलेल्या वेदमंत्रांच्या माध्यमातून बदल करणे शक्य आहे का? हे कसे घडते, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
☼ ☼ ☼
स्वर्गोपभोगीय सुखासाठी प्रयत्न करणे यासाठी जीव जन्माला आलेला नसून ईश्वर साधनेमध्ये तन्मयतेने प्रगती करणे आणि गुरूच्या मार्गदर्शनाखाली आपला आध्यात्मिक विकास करणे, हाच खरा जीवनाचा हेतू आहे आणि म्हणूनच आपत्तीच्या काळामध्ये योग्य कर्म केले तर मानसिक समाधान मिळू लागते.
☼ ☼ ☼