शंकराचे कालिकास्त्र मिळविले

सहाव्या आध्यायात कोकणात कुडत्तळ प्रांतात अडुळ गांवी मुक्काम केला. कालिका देवीचे दर्शन घेतले . कालिकास्त्र-शंकराची शक्ति कार्याससहाय्यभूत होण्यासाठी आश्वासन घेतले. गदातिर्थाला हरेश्वराला गेले.

मच्छिंद्रनाथांनी वेताळांकडून वचन घेतल्यावर, महाकालिका देवीच्या दर्शनासाठी निघाले. शंकराच्या हातातील कालीकास्त्राने अनेक दैत्यांचा वध केला होता. ते अस्त्र शंकराने कालीकेच्या स्वाधीन ठेवले होते. निवांत जागा पाहून कालीकादेवीची स्थापना कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावाच्या बाहेर केली होती. दुष्टप्रवृत्तीच्या तसेच सज्जनांना घातक असणार्‍यांचा नाश करण्याकरता या अस्त्राचा मोठा उपयोग होतो म्हणून ते अस्त्र पाप्त करण्यासाठी मच्छिंद्रनाथ कालीकेच्या दर्शनासाठी तेथे गेले होते.

कालिकादेवीने मच्छिंद्रनाथांना त्याच्या जन्माची ओळख दिली व त्याला परत जाण्यास सांगितले. त्याने केलेल्या शाबरी कवित्त्वाला तिने कोणतेच महत्त्व दिले नाही. उलट तू लवकर निघून जा अन्यथा तुला प्राणाला मुकावे लागेल, अशी धमकी देखील तिने दिली.

शंकराच्या हातातील हे अस्त्र प्राप्त करण्याच्या हेतूने मच्छिंद्रनाथाने देवीला हरतर्‍हेने विनविले. पण त्याचा कांहीच उपयोग झाला नाही म्हणून देवीला युध्दासाठी तयार होण्यास सांगितले. युद्धामध्ये देवीचे मच्छिंद्रनाथा पुढे कांहीच चालले नाही. तरी तिने ऐकले नाही म्हणून तिला पूर्णपणे बांधून टाकून तिचे प्राण कासावीस केले. नंतर देवीने आपले प्राण वाचविण्यासाठी शंकराची प्रार्थना केली. शंकराने मच्छिंद्रनाथाची विनवणी करून त्याला देवीचे प्राण वाचविण्यास सांगितले.

नाथ म्हणे पंचवक्त्रा | तुवां कवित्व करविलें साबरी पवित्रा | त्यातें वर देऊनि वरदपात्रा | काळिकास्त्र मिरवावें 16 जैसें तव करीं बहु दिवस | वसूनि अमित केले कार्यास | तेवीं माझे वक्त्रास | काळिकेंने बसावें 17 जें जें कार्य लागे मातें | तदनुकार्य वाहावें सरतें | आणि पुढेंही मंत्रकार्यातें | उपयोग व्हावें जयासी 18 ऐसें ये रीतीं वरदान | द्याल जरी प्रसन्न होऊन | तरी कामना समाधान | निजदेहीं नांदेल 19 अवश्य म्हणूनि उमारमण | काळिका त्वत्करीं ओपीन | परी या समयीं जीवित्वदान | काळिकेतें स्वीकारीं 120

नंतर शंकराने मच्छिंद्रनाथाची स्तुती केली व देवीला, जगाच्या कल्याणासाठी, मच्छिंद्रनाथांना ते सांगतील तसे कालीकास्त्राने सहाय्यभूत होण्याची आज्ञा केली.

यापरी मीही उमानाथ | त्वत्कार्यासी आहें उदित | ऐसें म्हणोनि करतळीं त्वरित | भाष घेतली मच्छिंद्रे 121 मग चरणीं माथा ठेवूनी | भस्मचिमुटी घेऊनी | वातास्त्रमंत्रआकर्षण जपोनी | बोलतसे वैखरी 22 पूर्णपाठ वैखरीसी होतां | भस्मचिमुटी फेंकी तत्त्वतां | तेणे हृद्गत होऊनि सर्वथा | काळिकादेवी ऊठली 23 उठूनि बैसली सावध होऊनी | दाही दिशा पाहें न्याहाळूनी | तों अकस्मात शूळपाणी | आपुले दृष्टी देखिला 24 मग लगबगें येऊनि त्वरित | शिवपदी मौळी सज्ज करीत | म्हणे महाराजा आदिनाथ | आजि जीवित्व त्वां दिधलें 25

मच्छिंद्रनाथांनी सर्व अस्त्रे, शस्त्रे, सांकेतीक रूपाने मिळालेल्या वस्तु आदी सर्वच पंथकार्यासाठीच मिळविल्या आहेत. हा पंथ जोपर्यंत कार्यरत आहे तो पर्यंत सर्वच देवदेवतांना नाथपंथकार्य करणार्‍या सर्वांना पूर्णपणे सहाय्यभूत होण्याची आज्ञा केली आहे. विशेष म्हणजे अस्त्रे वापरताना ती नाथांनी विभूतीच्याच माध्यमातून वापरली आहेत. अस्त्राचा संकल्प, त्याची योजना, त्याचा विनीयोग हे सर्व मनातल्या मनात करून विभूती द्वारे तिचे प्रक्षेपण केले आहे. नाथपंथाला अभिप्रेत असलेली विभूती कशी असते याचे वर्णन मागे केले आहे. अमूक एक अस्त्राचा विनीयोग केला हे त्याच्या परिणामावरून व वर्णनावरूनच समजते. अस्त्रांचा वापर हा प्रथम दर्शनी व्यक्तिगत कारणास्तव जरी दिसत असला तरी तो व्यक्तिगत नसून पंथकार्यासाठी वा लोकोद्धारासाठी केला जातो.

मृत्युकाळ पुढे ढकलला

अस्त्रांच्या संदर्भात हल्लीच्या काळात घडलेले एक उदाहरण पहा. नागपूरच्या एक वयोवृद्ध बाई अत्यवस्थ होत्या. नाते संबंधामुळे नरेंद्रनाथ महाराजांना त्या कालवश होण्यापूर्वी तेथे जाऊन त्यांना भेटणे आवश्यक होते.परंतु इतर महत्त्वांच्या गोष्टींमुळे ताबडतोब जाणे शक्य नव्हते. कमीत कमी ४-५ दिवसानंतर जाणे होणार होते. वेळ आलेली होती. डॉक्टरांनी स्पष्टपणेच सांगितले होते की त्या गेल्याच आहेत ताबडतोब कोणाला बोलवावयाचे असेल तर बोलाऊन घ्या. त्यांचे सर्वकाही संपले असे वाटले. इकडे आजी गेल्या गेल्या म्हणून आरडा ओरड झाली, त्यांनी डोळे फिरवून दिले.त्या गेल्या असे सांगितले. त्याच वेळी अकोल्याहून विभूतीचा प्रयोग करून त्यांच्या जीवन मर्यादेत स्थित्यंतर करण्यात आले व १५ दिवसांची मुदत त्यांच्या करता वाढवून घेतली. तोच अगदी थोड्या वेळेतच त्यांना बरे वाटू लागले म्हणून सर्व जण सांगु लागले.त्यांनी डोळे उघडले व त्या बोलु लागल्या. नरेंद्रनाथ महाराजांची नंतर भेट झाली आणि त्या १५ दिवसा नंतर गेल्या. अशा प्रकारे आजही या पंथात घटना घडत आहेत


Leave a Reply