☼ माझे गुरुदेव ☼
‘हा खेळ प्राक्तनाचा, की पूर्वजन्मीच्या कृतीचा?
मज ना कळे कशाचा? कुंठित बुद्धि-वाचा ॥
माझ्या गुरूंची आणि माझी भेट झाली, हा काही अपघात म्हणता येणार नाही. आज ज्या वेळी घडलेल्या सर्व गोष्टी पून्हा आठवतात तेव्हा हे म्हणणे गपडते, की माझे गुरू आपल्या शिष्याची (माझी) वाट पाहत होते. आज तर मला हा भाग प्राक्तनाचाच वाटतो. माझी-त्यांची भेट का व्हावी? माझ्या विचारसरणीत आमूलाग्र बदल करून माझ्याकडून साधना करवून घेऊन त्यांनी माझ्यामध्ये बदल का घडवावा, आणि त्यांनी मला हे कार्य करण्यास का सांगावे? काहीच कळत नाही.
पूस्तकाच्या सुरवातीला चार उदाहरणे दिली आहेत. वाल्मीकींना, (वाल्या कोळीला) नारदमुनी भेटले व त्यांना त्यांच्या पूर्वकर्माची प्रत्यक्ष जीवनात जाणीव करून देऊन त्यांच्याकडून त्यांच्या प्राक्तनात बदल करण्याच्या दृष्टीने कर्म करवून घेऊन त्यांच्याकडून अघटित कार्य करून घेतले. भारतीय संस्कृतीत एक नवाच इतिहास त्यांच्याकरवी रचविला.
श्रीसमर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांनी नरेन्द्रास ओळखले व त्यांच्याकडून कर्म करवून त्यांस विविध विषयांचे ज्ञान देऊन त्यांचे जीवनच बदलून टाकले. ते एवढे, की त्यांच्याकडून आपले गुरुकार्य पूढे करण्यायोग्य त्यांस तयार केले. ब्रह्मा, विष्णू, महेशस्वरूपी भगवान दत्तात्रेयांनी रजकाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वर देऊन दुसर्या जन्मात त्याच्या इच्छा पूर्ण केल्या. सद्गुरू व्यंकटनाथांनी नरेन्द्रांच्या पूर्वसंचिताची ओळख लक्षात घेऊन, त्यांची आंतरिक इच्छा लक्षात घेऊन त्यांच्या प्राक्तनात बदल करून व त्यास आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून, स्वत: भगवान दत्तात्रेय आराध्य दैवत असलेल्या नाथ पंथाचे कार्य पूढे करण्यास सांगितले.
ज्ञानदेव महाराजांनी पशूच्या मुखातून वेद वदविले. त्याला त्याच्या ७ पूर्वजन्मांची ओळख दिली. प्रत्येकाचा आत्मा किती प्रगत आहे, ह्यावर त्याची आध्यात्मिक उन्नती अवलंबून असते.
सद्गुरू व्यंकटनाथ महाराजांनी नरेन्द्रांच्या व्यावहारिक शिक्षणाचा विचार बाजूला ठेवला. कॉमर्स शाखेचे शिक्षण, लॉ विषयाचा अभ्यास, व्यावहारिक ज्ञान म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, इन्कमटॅक्स आदी विषयांच्या ज्ञानसंपदेत संस्कृत विषयाचा गंध नाही, अशा व्यक्तीला वेदकार्य करायला लावणे, हाच एक स्वतंत्र चमत्कार मानला पाहिजे. वेदकार्यदेखील असे, की वेदमंत्रांच्या माध्यमातून भाग्याच्या पूनरुज्जीवनाचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. जाती-जमातीचा विचार न करता, माणसामध्ये कोणत्याही तर्हेचा भेद न करता त्याला त्याच्या जीवनात वेदानुभूती देण्याचे कार्य आजदेखील सुरू आहे. माणसाची सामान्य प्रवृत्ती हे स्वत:चे विचार न सोडण्याची असते. काहीही झाले तरी स्वत:मध्ये मूलभूत बदल घडवू न देणे हे जीवाला सांभाळण्याएवढेच घट्ट असते. प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा मूलभूत स्वभाव बदलणार नाही. अशा परिस्थितीत अशा तर्हेचे कार्य अशा व्यक्तीकडून करून घेणे हे तर पशूपासून वेद म्हणवून घेण्यापेक्षादेखील अवघड आहे. म्हणून हे म्हणणे भाग पडते की
‘लिहिले न भाळीं त्याने वात्सल्य, प्रेम विधीने |
पण दोष ना कुणाचा, हा भोग संचिताचा |’
गुरुकृपेमुळे एका सामान्य व्यक्तीला पूर्वसंचिताचा चांगला भोग ह्या जन्मात प्राप्त झाला, हेच म्हणावे लागेल. सद्गुरू व्यंकटनाथ महाराजांना अखंड गुरुपरंपरेने गुरुपद प्राप्त झाले होते. मुळात नाथ पंथाची स्थापना ही भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून झाली होती. ह्या पंथाचे आराध्य दैवत हे भगवान दत्तात्रेयमुनी आहेत.
कलियुगामध्ये लोकांनी सत्प्रवृत्त राहण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये ईश्वराप्रती भक्तिभाव टिकून राहण्यासाठी नवनारायणांनी कोणत्या ठिकाणी व कसा अवतार घ्यायचा, हे सांगितले. पंथाचे आराध्य दैवत भगवान श्रीदत्तात्रेय राहतील, असे सांगून पूढील योजना सुरू करण्यास सांगितली. पूढे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आदींनी आपापल्या योजनेनुसार निरनिराळ्या ठिकाणी अवतार घेऊन पंथकार्याला सुरुवात केली.
चित्रकूटचे माधवनाथ :-त्यानंतर निरनिराळ्या विभूतींनी हे पंथकार्य पूढे विकसित केले. ह्यामध्ये निरनिराळ्या शाखा, उपशाखा निर्माण झाल्या. पूढे ह्याच पंथातील गुप्त नाथांच्या शाखेतील विठ्ठलनाथजींनी चित्रकूट येथून पंथकार्य केले. त्यांच्या समाधीनंतर गादीवर कोणी बसले नाही. म्हणून असे वाटू लागले, की पंथ आता खंडित होणार. परंतु पंथसिद्धता एवढी प्रखर व स्वयंसिद्ध असते, की समाधीनंतरदेखील बर्याच कालावधीनंतर जणू ती ईश्वरी योजना होती, हे हळूहळू लक्षात येऊ लागते. माधवनाथांनी चित्रकूटला कार्याची धुरा हाती घेतली. १९३६ पर्यंत त्यांनी पंथकार्य हे देवगावहून केले. नंतर समाधी घेण्यापूर्वी व्यंकटनाथांना पूढील कार्य करण्याची आज्ञा केली.
देवगाव रंगारीचे व्यंकटनाथ :-व्यंकटनाथ महाराजांनी नाथ पंथाचे विभूती माहात्म्य लोकांपर्यंत पोचविले. नवनाथांनी केलेले कार्य लोकांना सांगून पंथकार्याचा उद्देश व कार्यप्रणाली लोकांना समजावून सांगितली. त्यांनी असंख्य लोकांच्या व्याधींचे हरण केले, अनेक लोकांना संसारसागरामध्ये बुडण्यापासून वाचविले, अनेकांना भक्तिमार्गाला लावले. ‘स्वानंद सुधा’ हे व्यंकटनाथ महाराजांच्या माहात्म्याचे वर्णन करणारे भजनाचे पूस्तक आहे. अत्यंत मधुर, रसाळ, भक्तिपर व प्रासादिक भजन-गीते त्यात आहेत. कोणालाही उपरती होऊ शकेल अशी ही भजने आहेत. व्यंकटनाथ महाराजांनी आपल्या भजन-गीतांतून सहजतेने लोकांना आध्यात्माचे ज्ञान दिले. स्वानंद सुधेच्या सांप्रदायिक भजनाच्या केवळ श्रवणाने आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊ लागल्याची अनुभूती कोणीही घेऊ शकेल. पंथाच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची आणि विभूतींच्या अद्भुत सामर्थ्याची महती संपूर्ण जगाला दाखविली. त्यांनी अहोरात्र, अव्याहतपणे जीवोद्धारार्थ अघटित व देदीप्यमान कार्य जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत केले. महाराजांचा फार मोठा शिष्य परिवार होता. गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून व्यंकटनाथ महाराजांनी अखेरपर्यंत पंथाला शोभेल तसे अलौकिक व देदीप्यमान आध्यात्मिक कार्य अव्याहतपणे केले. सामान्य माणसाप्रमाणे जीवनमान ठेवून पंथाला शोभेलसे असामान्य व अघटित कार्य त्यांनी जीवनभर करून दाखविले. अनेकांना सत्प्रवृत्त करून ईश्वरोपासनेला लावले, परंतु शिष्य वा भक्त आपली आत्मोन्नती साधू शकले नाहीत.
समाधी घेऊन त्यांना १७ वर्षे झाली तरी ‘ॐ नमो भगवते व्यंकटनाथाय स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय चिदात्मने’ ह्या त्यांच्या मंत्राची अनुभूती आजचे कितीतरी साधक घेत आहेत. त्यांच्या अतुलनीय सामर्थ्याची आणखी कोणती वेगळी ग्वाही अपेक्षित आहे? ज्या गुरूंचा असा महिमा आहे त्यांच्या शिष्यांनी व भक्तांनी आपल्या गुरूंच्या सान्निध्यात राहून गुरूंच्या तेजाचा, योजनेचा लाभ घेऊ नये ह्यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते?
मानवी जीवनाला न गवसणारे विज्ञान :-
नवनाथांच्या पोथीमध्ये वाचलेले योगसामर्थ्य हे केवळ पूराणातले आहे, असा समज करून राहणे हा केवळ अज्ञानीपणा ठरेल. व्यंकटनाथांचे जीवन हे ओतप्रोत योगसाधनेनेच भरलेले होते. योगाची साधना करूनच ते योगिराज योगाभ्यानंद झाले होते. स्वतः माधवनाथांनीच कसून परीक्षा पाहून त्यांना तयार केले होते. आजही, २०१० च्या एवढ्या प्रगत विज्ञानकाळामध्येही आजचे विज्ञान आध्यात्मिक विज्ञानाच्या खूप मागे आहे, याची अनुभूती त्यांच्या बर्याच अनुयायांनी घेतली आहे. भारतातून इंग्लंडला आजही विमानाने जाण्यास ९-१० तास लागतात. योगिराज व्यंकटनाथ महाराज हे योगमार्गाने आपला इंजिनिअर शिष्य हरिभाऊ ह्यांच्याकडे केवळ १२ मिनिटांत प्रत्यक्षपणे इंग्लंडला त्याच्या घरी गेले होते. त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा ते आपल्या कुठेही राहणार्या शिष्याकडे केव्हाही योगसाधनेने जायचे. हा त्यांचा अनुभव त्यांच्या बर्याच शिष्यांनी घेतला आहे. प्राचीन गूढ विद्या, योग विद्या, आयुर्वेद विद्या, ज्योतिष विद्या, डाकिनी, शंखिनी, जारिणी, मोहिनी, भूतपिशाच्च व पंचमहाभूते ही सर्वच नाथांच्या इच्छेप्रमाणे कसे कार्य करतील, ह्या सर्वांचे ज्ञान त्यांना त्यांच्या हिमालयातील प्रदीर्घ काळाच्या वास्तव्यात बर्याच साधुमहात्म्यांकडून प्राप्त झाले होते. वर उल्लेखिलेल्या त्यांच्या विविध प्रकाशनांतून ह्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल.
त्यांच्या जीवनकार्यात जरी योगविद्येचा अनुभव सतत येत होता तरी ते साधकांना भक्तिमार्गानेच जाण्यास सांगत असत.
अकोला येथे नाथ शक्तिपीठाची स्थापना :
सन २००३ मध्ये भगवान दत्तात्रेय, रुद्रस्वरूपी भगवान शंकर, सुखकर्ता व विघ्नहर्ता गणपती, जगन्मातास्वरूपी शाबरीदेवी, पंचमुखी वीर हनुमान,भगवान सूर्यनारायण व त्यांच्या अस्तंगत असणारे नवग्रह या सर्व शक्तींनी सद्गुरू व्यंकटनाथांच्या अधिष्ठानाखाली अकोला येथून होणार्या गुरुकार्याला सर्वतोपरी साह्यभूत होण्यासाठी नाथ शक्तिपीठाची स्थापना केली. सद्गुरूंच्या कृपेने सर्व शक्तींनी हाक ऐकली आणि अघटित रीतीने शक्तिपीठाची योजना झाली. गुरुकार्याला प्रगतीची वाट मिळाली. विशेष म्हणजे, या कार्याला हिमालयातील साधूंचे आशीर्वाद प्राप्त झाले. निरनिराळे साधूमहात्मे नरेन्द्रनाथांच्या दर्शनासाठी येऊन गेले. नरेन्द्रनाथांना तेथील एका साधूने तर सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितले, ‘‘आनेवाले नजीक के भविष्यमें आप ऐसा भवन निर्माण करने जा रहे हो, कि जिसकी दुनिया में कोई मिसाल नहीं| एक शक्तिपीठ बनेगा- जो लोगों के बहुत उपयोगी होगा|’’
अनुष्ठान- हवन कार्य :-मानवी जीवनातील विविध वाईट योगांवर मात करण्यासाठी, तसेच जीवनातील अनेक प्रकारच्या खडतर योगांवर उपाययोजना करण्यासाठी अनुष्ठान- हवनाची उपाययोजना येथून केली जाते. शक्तिपीठामध्ये होणारे हवन अनुष्ठान हे केवळ नाथ पंथाच्या परंपरागत कृपेवरच साध्य होते. वेदशास्त्राच्या आधारावर एवढेच म्हणता येईल, की ज्या वेळी अग्निदेवता प्रसन्न होईल त्या वेळी अग्निकुंडातून प्रत्यक्ष अग्निदेवता प्रगट होईल किंवा अग्निज्वाळांमधून वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे विविध रंगांच्या ज्वाळा दिसू लागतील.
नाथ शक्तिपीठातून होणार्या हवनामधून नेहमीच वेदामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अग्निज्वाळांचे रंग दिसतात. बर्याच वेळा ह्या रंगांबरोबरच ज्या देवता कृपा करतात त्यांच्या आकृती फोटोमध्ये आलेल्या दिसतात. अशा विविध हवनांमधून गणपती, देवी, हनुमान, भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, भगवान सूर्यनारायण आदी बर्याच देवतांनी कृपा केल्याचे फोटोवरून लक्षात येते. हे सर्व केवळ व्यंकटनाथांच्या गुरुकृपेने घडत असल्याचे जाणवते. अशा विविध निकषांनी शक्तिपीठाचे कार्य हे केवळ परंपरागत लाभलेल्या अखंड गुरुकृपेवर आधारित आहे.
अध्यात्माचे अनुभूतिकेंद्र :
ह्या नाथ शक्तिपीठातून अनुग्रहित झालेले शिष्य, येथे येणारे भक्त व ह्या शक्तिपीठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना करणारा प्रत्येक साधक हा आपल्या साधनेच्या अनुषंगाने सततच अनुभूती घेत असतो. मार्गदर्शनाखाली योग्य उपासना केल्यावर कोणताही जीव हा निश्चितपणे आध्यात्मिक अनुभूती घेणारच. ही सामान्य अनुभूती आहे. आपल्या जीवनातील खडतर योगांवर कर्माच्या माध्यमातून अनुभूती घेणारे कितीतरी साधक आहेत.
जीवनाकडे शोध-बोध बुद्धीने पाहणे :-आपण आपल्या जीवनाकडे शोध-बोध बुद्धीने पाहणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजन्मीच्या कृतीचा, प्राक्तनाचा, विधिलिखिताचा, संचिताचा विचार करून त्याची सांगड सद्यजीवनाशी कशी घालायची, याचा शोध पूर्वअभ्यास नाथ शक्तिपीठ, न्यू तापडियानगर, अकोला येथून गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे. अखंड गुरुपरंपरेने नाथ पंथाचे कार्य केलेल्या योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज देवगाव रंगारी यांच्या कृपाछायेत व त्यांच्या आशीर्वादाने त्यांचेच अनुग्रहित असलेले त्यांचे शिष्य नरेन्द्रनाथ महाराज यांनी पंथ परंपरेच्या कृपेवरून व गुरुकृपेवरून पंथाचे कार्य ह्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने पूढे सुरू ठेवण्यात १९९३ साली सुरवात केली.
दोष घालविण्याचे प्रयत्न :-व्यक्तींच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून त्याच्या जीवनातील त्रासांचा व भोगांचा विचार करून, तसेच त्याच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून त्याला सद्यजीवनात होणार्या क्लेशापासून, त्रासापासून, स्वभावदोषापासून मुक्त करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे नाथ शक्तिपीठातून जीवनातील सर्व प्रकारचे दोष घालविण्याचा प्रयत्न १९९३ सालापासून होत आहे. अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे. असे दोष जर दूर झाले तर आपली कार्यक्षमता, लोकप्रियता वाढून आपला चांगला मित्रपरिवार किंवा व्यावसायिक परिवार वाढू शकतो. जीवन सुखावह होऊ शकते.
ज्या व्यक्तींना कोणताच त्रास नाही, सर्व काही सुरळीत चालू आहे असे वाटते, त्यांना त्यांच्या इच्छेवर त्यांच्या जीवनात कोणते त्रास आहेत, हेदेखील समजावून सांगितले जाते. विश्वामध्ये एक व्यक्तीदेखील अशी नाही, की जिला कोणताच त्रास नाही किंवा ती नास्तिक आहे, पूर्ण समाधानी आहे. येथे व्यक्तीला नुसतेच त्याच्या सुखदु:खाबद्दल मार्गदर्शन केले जात नाही, तर आध्यात्मिक जीवन कसे आणि का आवश्यक आहे, जीवनामध्ये सद्गुरूंचे महत्त्व का आहे, नामस्मरण करणे का गरजेचे आहे, दानधर्म आदी प्रत्यक्ष जीवनामध्ये कसे महत्त्वाचे आहे, कोणते कर्म केले असता आपल्या योगामध्ये बदल होऊ शकेल, आदी गोष्टींचे मार्गदर्शन ह्या नाथ शक्तिपीठामधून केले जाते. जन्मपत्रिकेवरून आपल्या जीवनयोगाचा, कर्माचा, जीवनात पूढे घडणार्या घटनांचा मागोवा कसा घ्यावा, हेदेखील येथून सांगितले जाते.
‘लिहिले न भाळी त्याने वात्सल्य प्रेम विधीने’ ह्याची जाणीव ज्या वेळी जन्मपत्रिका आपण पाहतो त्या वेळी विशेष होते. जे काही विधिलिखित आहे ते आपली जन्मपत्रिका समजून घेताना होते. जीवनातील घटनांवरून आणि
जन्मपत्रिकेवरून जीवनातील कुयोग कसे कळतात, हे आपण येथे समजून घेऊ शकाल, तसेच काय केले म्हणजे जीवनातील हे दोष जाऊ शकतील, हेदेखील येथे समजू शकेल. एवढे मोठे कार्य हे केवळ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांच्याच कृपेमुळे घडत आहे.
ह्याप्रमाणे पंचमहाभूते, चार वर्ण, चार युगे, चार निजतत्वे, चार गुण, बारा राशी, नवग्रह व नक्षत्रांचा जर विचार केला तर निश्चितपणे असे म्हणावे लागेल, की माणसाच्या जीवनावर, त्याच्या कृतींवर, त्याच्या संचितावर, त्याच्या प्रारब्धावर होणारा परिणाम हा या शास्त्राच्या माध्यमातून कसा नोंदविला जातो व कसा समजतो, हे अभ्यासाने कळू शकते. कोणत्या कर्मदोषामुळे आपले प्रारब्ध, आपले पूर्वसंचित बिघडले आहे हे जर निश्चितपणे कळले तर तो कर्मदोष कशाने जाईल त्याप्रमाणे त्याची उपाययोजना आपण करून जीवनातील अडसर दूर करू शकू. तसा हा विषय गहन अभ्यासाचा व गुरुकृपेचा आहे, परंतु हे सहज शक्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्य नाथ शक्तिपीठातून होत आहे.