तिसर्या अध्यायात सरस्वतीला विभूती दिल्यावर मच्छिंद्रनाथ समुद्राच्या पूर्वबाजूने प्रवासकरीत करीत जगन्नाथ पुरीहून रामेश्वरला गेला. रामेश्वरला समुद्रस्नान झाल्यावर परतत असतांना मारूतीशी भेट झाली व तेथे त्या देघांचे युद्ध झाले. मारूतीने स्त्री राज्यात जाऊन मैनाकिनीला शरीर सुख देऊन आनंद देण्याचे आश्वासन घेतले. या संबंधातून तुला मीननाथ मुलगा होईल असे सांगितले.वास्तवीक पाहता मारूती व मच्छिंद्रनाथ हे दोघेहि त्रिकाल ज्ञानी होते. ते सर्वकांही जाणून होते. तरी दोघांचे अस्त्रयुध्द झाले. मच्छिंद्रनाथ पुढे नाथपंथाचे फार मोठे कार्यकरणार आहेत, ते कुठेही कमी पडु नये म्हणून त्यांची जाणून बुजून परीक्षा पाहण्या साठी मारूतीने युध्द केले आहे. मच्छिंद्रनाथ हा खरा कवी नारायण आहे हे मारूती ओळखून होता. तरी सुद्धा मारूतीने निरनिराळ्या अस्त्रांची योजना करून मच्छिंद्रनाथाचा पाडाव करण्याचा प्रयत्न केला.
तो लगेच उड्डाण करुन एकीकडे गेला आणि विशाल रुप घेऊन त्याने मच्छिंद्रनाथास कळू न देता त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले. ते आकाशमार्गाने ढगाप्रमाणे येत आहे हे पाहून मच्छिंद्रनाथाने लगेच ‘स्थिर स्थिर’असे म्हणून वातप्रेरक मंत्रशक्तीच्या सामर्थ्याने ते पर्वत जागच्या जागी खिळवून ठेवले. मारुती एकावर एक असे पर्वत नाथावर टाकीतच होता, पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खिळवून टाकले.
पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंच महाभूते आहेत. ह्या पंाचही महाभूतांवर कोणाचीही सत्ता चालत नाही. हे ब्रह्मांडाचे मुख्य घटक आहेत. ब्रह्मा विष्णु व महेश, म्हणजेच उत्पत्ति, स्थिती व लय यांची देखील या कोणावर सत्ता चालत नाही. अवतारी पुरुष हेच स्वतःच्या ईच्छेने त्यावर आपली सत्ता गाजवू शकतात. नाथपंथाला दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथांची वायुवर सत्ता होती.वायुने नाथांना सहाय्यभूत होण्याचे वचन दिले होते. वायु जरी मारूतीचा पिता होता तरी तो वचन बद्ध होता त्यामुळे मच्छिंद्रनाथ सांगतील तसे त्याला करणे भाग होते. वात शक्तिचा आधार घेऊन आपल्या वाणीने नुसते स्थिर स्थिर म्हणताच वायुने ते सर्व पर्वत वरच्यावर हवेतच स्थिर केले. त्याच्यावर आदळलेले नंतरचे पर्वत देखील त्यामुळेच स्थिर झाले.
हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे क्षोभला व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याच्या बेतात आहे असे मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायुआकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला जागच्या जागी खिळवून टाकले. त्याचे चलनवलन बंद झाले. मारुतीने वर हात करुन पर्वत धरुन ठेवला होता. हातही तो तसाच वर राहिला. पर्वत खाली टाकायला किंवा पायी चालायला देखील त्याच्या अंगी बळ
राहिले नाही. ते पाहून वायुने आपल्या मुलाला (मारुतीस) पोटाशी धरले. आणि संकटातून सोडविण्यासाठी मच्छिंद्रनाथास विनंती केली. ती नाथाने मान्य करुन पुन्हा मंतरलेले पाणी शिंपडले. त्यामुळे पर्वत आपल्या मुळ ठिकाणी व मारुतीही पुर्वस्थितीत आला.मारुतीने त्याच्या जवळ जाऊन’धन्य धन्य’ म्हटले, वायु मारुतीला म्हणाला, या सिध्दापुढे तुझे काही चालायचे नाही.याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करुन टाकले आहे.याची मंत्रशक्ती अफाट आहे. तुला कदाचित वाटेल की,मी स्वतःच त्याच्या मंत्रसामर्थ्याची प्रौढी कशी वर्णन करतो? पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि आपल्या शक्तीच्या बळावर याने देवतांना आपले दास केले आहे.’ मुळातच कवी नारायण असलेल्या मच्छिंद्राचे सामर्थ्य येथे लक्षांत येईल.
या युध्दात मारूतीच हरला.वायु म्हणजे मारूतीचा पिता,मधे पडला ते युद्ध थांबविण्यासाठी . मच्छिंद्रनाथांना मरूत व मारूती दोघेही शरण गेले आणि युध्द थांबविले. तुम्हाला हे सर्व माहित असतांना हे युध्द कां केल?’ तु सर्वज्ञ आहेस, मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केलेस ? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वी भेट झाली होती. त्यावेळेस शाबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करवून तू मला वरदान दिले होते. असे असताना हा बखेडा का केलास?’ असे मच्छिंद्रनाथांनी मारूतीला विचारल.
हे ऐकून मारुती मच्छिंद्रनाथाला म्हणाला, ’तू समुद्रस्नान करत होतास तेव्हा मी तुला ओळखले आणि तुझ्याजवळ आलो. तू कवीनारायणाचा अवतार आहेस व मत्स्याच्या पोटी जन्म घेतलास हे मला माहीत होते, परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की, नागाश्वत्थाच्या झाडाखाली देवांनी जो वर तुला दिला, त्याचे सामर्थ्य कितपत आहे, हे आपण एकदा पहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ संकटांतून पार पडायचे आहे, म्हणून तू हिंमत करुन पुढे कितपत टिकाव धरशील त्याचाही अदमास मला घ्यायचा होता.’
मारूती हा एकटाच जती म्हणून आता पर्यंत ओळखला जात होता. हा कवीनारायण आहे, याने मच्छिंद्रनाथ म्हणून नाथपंथ कार्य करण्यास अवतार घेतला आहे, हा जती आहे, हे मारूतीला पूर्णपणे माहीत होते. परंतु पुढे कार्य करतांना येणारे प्रसंग बिकट आहेत व मच्छिंद्रनाथाला मिळालेले शस्त्र, अस्त्र इत्यादींचे सामर्थ्य किती आहे, तो कुठे कमी पडतो कां, याची खात्री करून घ्यायची होती, शिवाय स्त्री राज्यातील राणीच्या कामनापूर्तीची आपली जबाबदारी, मच्छिंद्रनाथांवर सोपविण्याचा मारूतीचा उद्देश होता,तेथे देखील तो कमी पडू नये, यासाठी मारूतीने युध्दाचा घाट घातला होता. सरते शेवटी, युद्ध थांबल्यावर दोघांनी एकमेकाला नमन करून प्रेमभावाने निरोप घेतला. वैर भावातून हे युद्ध झालेच नव्हते. मच्छिंद्रनाथांची सिद्धता खूपच चांगली आहे अशी मारूतीची खात्री पटल्यानंतर, मारूतीने मच्छिंद्रनाथांना व नाथपंथाचे कार्य करणार्या सर्वांना सदैव सहकार्य करण्याचे वचन दिले. युध्द झाले म्हणून वैमनस्य धरून कोणीच बसले नाही हे लक्षांत घेण्यासारखे आहे. पुढे ते प्रेम भावानेच राहिले.
मारुती हा उध्वरेता आहे. त्याच्या नुसत्या भुभःकाराबरोबरच स्त्रीराज्यातील स्त्रिया गरोदर राहतील असे रामांनी सांगितले होते. मारुती मच्छिंद्रनाथांना म्हणाला, प्रभू रामचंद्रांनी सांगितल्यावर मी स्त्रीराज्यात गेलो त्यावेळी तेथे मेनका नावाची राणी राज्य करीत होती. ‘पृथ्वीवर इतर ठिकाणी मनुष्य, पशु, पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्रीपुरुष एकत्र आनंदाने रममाण होतात.’ असे तिने ऐकले होते. तेव्हा पासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही लाही होत होती. प्रत्यक्ष मारूतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करु लागली. स्वतःच्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या. अशी बारा वर्षे लोटली. अंगावरचे सर्व मास संपले, तरीही तिचा निश्चय ढळेना. तिची खडतर तपश्चर्या पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी माझ्या पाया पडून तिने आपले मनोरथ पूर्ण करायला सांगितले. ती मला म्हणाली, ‘मारुतीराया, तुझ्या भुभुःकाराने येथील सर्व स्त्रिया गरोदर रहातात. त्यामुळे तु येथील सर्व स्त्रियांचा पती ठरतोस. यामुळे सर्वांना खूप सुख होते, परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष संग करावा असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण करावी. मैथुनाची पध्दत तिन्ही लोकांत प्रचलित असते, ते सुख आम्हाला स्वप्नातही अनुभवता येऊ नये, अशी आमच्या नशिबाची स्थिती आहे. तर ते सुख मला प्रत्यक्ष दे.’
असे म्हटल्यावर मी तिला सांगितले, ‘मी ब्रम्हचर्यव्रत कडक पाळतो व ही माझी ओळखही आहे. त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीही घडणार नाही. माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते, तेवढे पुरे आहे. आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुरुप वागेल. मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. त्याच्यापासून तुला तुझ्या तपाचे फळ मिळेल. असे सांगून मी तिचे समाधान केले. आता तो योग आजच आला आहे, तेव्हा तू तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान कर.’
मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, ‘मीही उर्ध्वरेताच आहे, त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग ? माझे ब्रम्हचर्य पूर्णपणे नष्ट होईल व जगात माझी नाचक्की होईल. तेव्हा तू हे असले काम मला सांगू नकोस. शिवाय स्त्रीसंग हे अपकिर्तीचे भांडार आहे, म्हणून ही गोष्ट करावी असे मला बिलकूल वाटत नाही. कारण, नाथपंथी योगी मला वाळीत टाकतील.’
मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारे नकार देताच मारुती त्याला म्हणाला, ‘ही गोष्ट अनादि कालापासून चालत आली आहे. जसे सर्व युगे नव्याण्णव वेळा होऊन गेली तसेच नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्यापोटी मौनीनाथ म्हणून पुत्र होईल. त्याची कीर्ती दिगंत पसरेल’ मारुतीने त्याला असे सांगून त्याचे मन वळवले. मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात जाण्यास तयार झाला व त्यांनी एकमेकांस नमस्कार केला.
नवनाथांच्या पुढच्या कथानकांत पुढे मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात येईल असे सांगितले होते. स्त्री राज्यात गेल्यावर, मैनाकीनीने मारूतीला विचारले तुझ्याबरोबर हा कोण आहे. त्यावर मारुतीने उत्तर दिले तु त्यावेळी तप केले त्यावेळी मच्छिद्रनाथ तुला विषय विलासाचे पुर्ण सुख देईल म्हणुन तुला वरदान दिले होते. तोच हा मच्छिंद्रनाथ आहे. तो तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करेल. पुढे २० व्या अध्यायात ह्या बद्दल पूर्ण खुलासा झाला आहे तो जरूर पहावा. याचा अर्थ मारूतीला हे सर्व अगोदरच माहीत होते तरी त्याने हे युद्ध केले.
युध्दानंतर आपआपल्या मार्गी जाण्यासाठी निघाले. त्यापूर्वी, मारूतीने आपली जबाबदारी मच्छिंद्रनाथांवर सोपविली.ती म्हणजे, स्त्री राज्यात जावून तेथील राणीची कामवासना पूर्ण करणे.ही जबाबदारी खरतर मारूतीवर होती, परंतु ती मच्छिंद्रनाथाने पूर्ण करावी असे मारूतीने मच्छिंद्रनाथास सांगितले. मारूतीने हरतर्हेच्या विनविण्या केल्यावरून, मच्छिंद्रनाथांनी ती जबाबदारी स्विकारली. मारूतीचे अखंड ब्रह्मचर्यत्व टिकविण्याचा पारलौकिक हेतू मच्छिंद्रनाथांचा होता.ब्रह्मांडाचे संतुलन आणि ईश्वरी कार्याची कार्य पद्धती टिकविण्याच्या उद्देशाने त्याने मारूतीचे म्हणणे मान्य केले.
द्वापार युग संपल्या संपल्याच नाथपंथाची योजना झाली आहे. ज्या निरनिराळ्या अस्त्रांचा उल्लेख येथे केला आहे ती अस्त्रें आज दिसत नाहीत.ते दिसण्यासारखे वातावरण वा परिस्थिती देखील आज राहिली नाही.परंतु तत्त्व रुपाने त्याचा आज देखील उपयोग केला जातो.
मारूतीच्या स्तवनाने समुद्र दर्शनास आला
पंथ कार्य करणार्यांवर मारूतीरायाची कृपा कशी असते याचा एक अनुभव येथे सांगतो. पंथ कार्या निमित्त नरेंद्रनाथ महाराज ओरीसा मधील कोणार्क येथे गेले होते. नाथपंथाचे सूर्योपासनेचे महत्त्वाचे हवन म्हणजे मकर संक्रमणाचे हवन तेथेच होणार होते. जगन्नाथपुरीला जावून दर्शन घेवून हवनाचा कार्यक्रम होणार होता.अनेक भक्त, शिष्य सोबत होते. जगन्नाथाचे दर्शन झाले, नियोजित मकर संक्रमणाचे हवन पार पडले. त्या नंतर महाराजां सोबत असलेल्या सर्वांनीच आग्रह धरला की सायंकाळच्या उपासनेसाठी समुद्र किनारी जावे आणि समुद्राच्या साक्षीने देवतांचे आवाहन करून नित्य उपासना करावी. सर्वांच्या मनात होते की आपली उपासना दैवतां पर्यंत पोहोचते कां व आपल्याला काय अनुभूति येते. महाराज म्हणाले ज्या ठिकाणी लाटांचे पाणी येऊच शकत नाही,त्याही पलिकडे बर्याच आंतरावर उपासनेसाठी बसा. मारूतीरायाची कृपा झाली तर सागर आपल्याला भेटण्यास येईल. सर्वजण शिस्तित बसले. महाराज दुसर्या रांगेत मध्यभागी बसले होते. बाकीचे सर्व एकामागे एक अशा ओळीत बसले होते. नित्य नियमानुसार सायंउपासना सुुरू झाली. उपासना सुरू असतांना जिथपर्यंत आपली दृष्टी जाईल तेथपर्यंत समुद्राची लाट अखंड पण मंद गतीने येतांना दिसत होत्या. होता होता उपासना हळू हळू पुढे पुढे जाऊ लागली. समुद्रामध्ये सर्वकांही नित्य क्रमाने सुरू होते. उपासनेमध्ये ज्यावेळी मारूतीची नित्य उपासना सुरू झाली त्या वेळी समुद्राच्या लाटांमध्ये कांहितरी स्थित्यंतर होत आहे असे भासत होते. हनुमानाची उपासना करीत असतांनाच समुद्रातील एक तिरपी लाट अर्ध्यातूनच आली व सर्वांच्या लक्षात येण्या आधीच नरेन्द्रनाथांच्या उजव्या पायाच्या आंगठ्याला स्पर्श करुन परत गेली.सर्वांनाच केवळ आश्चर्य वाटले. लाटांना अजीबातच जोर नव्हता. त्यातून समुद्राच्या वाळवंटात समुद्राचे पाणी येवून गेल्याच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. त्या खुणांपर्यंत पाणी येण्याएवढा जोर लाटांना नव्हता. तिथपर्यंत समुद्राची लाट येण्याची अजीबातच शक्यता वाटत नव्हती.पण दिव्य असा नाथ पंथ आहे.मारूतीने पंथाला दिलेल्या वचनाची अनुभूती आली.मारूतीरायाचे स्तवन सुरू असतांनाच ही अनुभूती सर्वानाच आली. प्रत्यक्ष समुद्राने आपली सीमा सोडून सदगुरुच्या पदक्षालनासाठी वआपले सामर्थ्य, पवित्रता वाढविण्यासाठी पंथकार्य करणार्या सद्गुरूंचे पादस्पर्श केले. प्रभावी नाथपंथाचे प्रभावी सद्गुरू समोर आलेले पाहून समुद्र स्थित अनेक देवतांची ही किमया पाहून सर्वांनाच गहिवरून आले.
दुष्ट प्रवृत्ती टाळण्यासाठी मारूतीने दिलेले संरक्षण
पंथ कार्य करतांना हनुमानजी कसे सहाय्यभूत होतात याचे एक उदाहरण पहा. हिमालयातील वास्तव्यात अनेक शिष्यांसमवेत असतांना नित्यनियमाने उपासना आदि सुरू होते. अनेकविध घटना घडत होत्या. उत्तरकाशीला आमचे अनुष्ठान सुरू होते. विश्वेश्वराच्या शेजारी हनुमानाचे एक मोठे मंदीर आहे. तिथेच आमचा अनुष्ठानाचा ठिय्या होता. दररोज ठराविक पद्धतीने अनुष्ठान सुरू होते.एक दिवस मंदिराचा एक विश्वस्त नरेंद्रनाथ महाराजांजवळ आला व म्हणाला, ‘महाराजजी मंदिरके सामने एक साधू बैठता है, लेकीन वो लोगोंको बहूत तकलीफ देनेके हेतूसे, करणीबाधा करनेके हेतूसे,तथा लोगोको हैरान करने के लियेही बैठता है| हमने उसे बहुतबार यहॉंसे निकालनेकी कोशीश की, लेकीन वह वाम विद्याओंसे भय दिखाता हैं | उसको रोकना या उसे लोगोसे दूर करना बहूतहि कठीन जाता है | आप कृपा करके लोगोके हितमे उसका कुछ बंदोबस्त किजीएँ |’ नरेंद्रनाथ महाराज बोले, ‘कुछ देर रूकिये,जब हमारा हवन शुरू होजायेगा तब वो स्वयं ही यहॉंसे भाग जाएगा |’ तो साधु रोज तिथे येवून त्याला हवे असणारे कृत्य करीत होता आणि आपल्या विद्येचा उपयोग करून सर्वांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत होता.नरेंद्रनाथमहाराज तो आला की त्याच्याकडे पहायचे पण तो आपली जागा सोडत नव्हता व त्याची करणी थांबवत नव्हता.त्यानंतर दहा दिवसांनी हवनाला सुरुवात झाली.हवन सुरु असताना,तो साधू काहीतरी यंत्र हातात घेऊन सर्वांना दाखवत होता व घाबरविण्याचा प्रयत्न करीत होता. नरेंद्रनाथमहाराजांनाही ते यंत्र दाखवून काहीतरी विचित्र कृती करीत होता. हवनाला बसलेले काही ब्राह्मण थोडे घाबरले व नरेंद्रनाथमहाराजांना म्हणाले, ‘महाराज, तो साधू भिती दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे.’ त्यावर महाराज म्हणाले, ‘तुम्ही आहुती टाका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका.’ हवन चालू असतांना, एकाएकी काय घडले कुणास ठाऊक साधूच्या हातातील यंत्र जमिनीवर पडले आणि त्यावर त्याचाच पाय पडला. असे कसे झाले म्हणून तो साधू घाबरून गेला व आपले सामान गुंडाळून पळून गेला आणि पुन्हा त्या ठिकाणी दिसलाच नाही. पंथ कार्य करताना हनुमंत कसे पाठीशी असतात हे लक्षात येईल