पहिल्या अध्ययात श्रीकृष्णाने नवनारायणांना द्वारकेत बोलावून नाथपंथाची योजना केली. पार्वतीने शंकरास ते जप करीत असलेला सिद्ध मंत्र कोणता ते सांगा असे म्हटले होते. तो मंत्र एकांतवासात जिथे दूरदूर पर्यंतकोणी नाही अशा ठिकाणी जाऊन तुला सांगतो असे शंकराने सांगितले. ते यमुनेच्या किनारी निर्जन ठिकाणी बसले व शंकराने पार्वतीला आपला मंत्र सांगितला. त्या मंत्रावरच्या शंकराच्या प्रश्नाला यमुनेच्या पाण्यातून उत्तर मिळाले. कोण आहे म्हणून शंकराने पाहिले तर एका माश्याच्या पोटात कवी नारायण म्हणजे मच्छिंद्रनाथ असल्याचे शंकराला कळले. यमुनेच्याकाठीच मच्छिंद्राचाजन्म झाला. कामीक नांवाच्या कोळ्याला आकाशवाणी ऐकू आली त्याप्रमाणे तो त्या मुलाला घरी घेऊन गेला व त्याची पत्नी शरद्वतेच्या स्वाधीन त्याला केला.
कवी नारायणाचे स्वभाव व जीवन वैशिष्ट्ये
सुरवातीलाच आपण पाहिले आहे की कवीनारायणाने मच्छिंद्रनाथ म्हणून प्रगट होऊन कार्य करण्याची योजना झाली होती. वासुदेवाचा अंश असणार्या ऋषभाला, शंभरमुले होती. त्या पैकी नऊ मुले ही नवनारायण म्हणून प्रसिद्ध होते. त्या नवनारायणांमध्ये कवीनारायण हा सर्वात मोठा मुलगा होता. त्यानेच मच्छिंद्रनाथ म्हणून नाथपंथाची स्थापना करून, नाथपंथाचे कार्य सुरू केले होते.
भगवंताच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे कविनारायणाचे स्पष्ट व निश्चित मत आहे. नश्वर पदार्थां विषयी, जे केंव्हातरी नाहीसे होणार आहे, अशां विषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले आहे, अशांना वाटणारी भिती, उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. भगवंतानी, आपल्या प्राप्तीचे जे उपाय, अज्ञानी लोकांना,भागवता मधून,अगदी सहजपणे सांगितले आहेत, तीच भागवत धर्माची तत्त्वे आहेत असे स्पष्टपणे समजावे, व तिचा अंगिकार करावा.या भागवत धर्माचा अवलंब करणार्या मनुष्यावर कधीच संकटे येत नाहीत. अगदी डोळे बंद करुन जरी तो वागत राहिला किंवा त्याच्या विधी-विधानात कांही कमतरता राहिली तरी, त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रीयांनी, बुध्दीने, अहंकाराने किंवा स्वभावा प्रमाणे जी जी कर्मे करील, ती ती सर्व कर्मे त्याने त्या परम पुरुष नारायणांनाच समर्पण करावीत. ईश्वराला जो विन्मुख हाईल, त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरुपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो.या आत्म्या खेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते. म्हणून गुरूंनाच आपले अराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे. हा द्वैतप्रपंच नसतांनाही त्याची तशी कल्पना करणार्याला तो भासतो. ज्याप्रमाणे, स्वप्नामध्ये स्वप्न पाहणार्याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळया मनोरथांमुळे, एक विलक्षण सृष्टी भासू लागते, त्याप्रमाणे, विवेकी पुरुषाने संसारातील कर्मासंबंधी संकल्प-विकल्प करणार्या मनाला आवरावे. त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. भगवंताच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिध्द आहेत, त्या ऐकाव्यात. तसेच त्यांच्या विषयीची नामे व स्तोत्रे, जनलज्जा सोडून किंवा संकोच सोडून म्हणत राहावीत. प्रपंचामध्ये सर्व व्यवहार, आसक्त न होता करीत रहावेत. जो हे व्रत म्हणून करतो, त्याच्या हृदयात, आपल्या आराध्य देवतेच्या नाम-संकीर्तनाने प्रेमाचा अंकुर निर्माण होतो. त्याचे चित्त द्रवू लागते. तो वेड्याप्रमाणे कधी कधी खदखदून हसतो तर कधी कधी मोठ्याने रडू लागतो. कधी मोठ्याने भगवंताना हाक मारतो. तर कधी त्याच्या गुणांचे गायन करू लागतो. कधी तो नाचतो सुध्दा. अशा वेळी तो ईेशराच्या प्रेमामध्ये बेभान झालेला असतो. यावेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रह-नक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्ष, वनस्पती, नद्या, समुद्र, इतकेच काय, सारे चराचर भगवंताचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा.
जेवणार्याला जशी, प्रत्येक घासा बरोबर तृप्ती होवू लागते, जीवनशक्ती मिळू लागते आणि त्याची भूक नाहीशी होते असे तीन फायदे एकाच वेळी होतात, त्याच प्रमाणे जो मनुष्य भंगवंतांना शरण जातो त्याला भगवंता बद्दल प्रेम, त्याच्या स्वरुपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तुंविषयी वैराग्य, अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते.
अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंताचे भजन करतो, त्याला भगवंता विषयी भक्ती, संसारा बद्दल वैराग्य आणि भगवंताच्या स्वरुपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परम शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो असे ह्या कवीनारायणांचे मत होते व त्या प्रमाणे ते स्वतः सदैव राहत असतात. अशा रोमा रोमात भिनलेल्या प्रवृत्तिचे मुळातले कविनारायण म्हणजेच मच्छिन्द्रनाथ. या पोर्श भूमीवर मच्छिंद्रनाथांचा जन्म हा माशाच्या पोटात मुखावाटे ब्रह्मवीर्य गेले आणि शेवटी पूर्व नियोजनानुसार कवीनारायणाने त्या मत्स्याच्या पोटी जन्म घेतला व त्या बाळाचे नांव मच्छिंद्र पडले. मुखावाटे वीर्य जावून जन्म घेणे हे केवळ आश्रचर्यजनक व अघटीत आहे. सामान्य मानवी पद्धतीला पूर्णपणे फाटा देवून (जी शरीर यंत्रणाच नाही) त्या योनीद्वारे वीर्य न जाता ते मुखाद्वारे जावून गर्भधारणा होणे हे म्हणजे मानवी जीवन पद्धतीला, ब्रह्मरचनेला न जुमानता आपल्या इच्छेप्रमाणे या नाथपंथाने घटना घडविणे झाले. केवढी ही अघटित गोष्ट आहे. ही कहाणी काल्पनिक नसून हेच तर नाथपंथाचे वैशिष्ट्य आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज ह्या गोष्टीवर माणसाचा विेशास बसणे अशक्य आहे. परंतु ही अद्भूत शाक्ती आजही ह्या पंथात विद्यमान आहे.
यापूर्वी एका विशेष घटनेचे पोथी मध्ये वर्णन आहे ते असे
तंव तो यमुनातट एकान्त | तेथें मनुष्याची न मिळे जात | ऐसें पाहोनि शुद्ध एकान्त | तें स्थान ईश्वरासी मानलें ॥110॥ परी तो मच्छोदरांत ॥॥ कवि नारायण नेणोनि त्यांत ॥॥ पार्वतीतें उपदेशीत नाथ ॥॥ मंत्रसंजीवनीसी ॥11॥ तो मंत्र उपदेशितां ॥॥ मच्छी तेथें होती सत्यता ॥॥ तो उपदेशशब्द गर्भीं तत्त्वतां ॥॥ मच्छिंद्राने ऐकिला ॥12॥ परी ग्रहणचि झालें ॥॥ तेणेंकरोनि ज्ञान प्रकटले ॥॥ मीतूंपण सर्व सरले ॥॥ सर्वचि ब्रह्म सनातन ॥13॥ शिव पार्वतीते पुसत ॥॥ कीं कैसें चोज उपदेशांत ॥॥ तूतें सांपडेल खूण ते मातें ॥॥ बोलोनि दावीं अपर्णे तूं ॥14॥ शिव तीस पुसतां ॥॥ तों आधीच मच्छेंद्र झाला बोलता ॥॥ म्हणे महाराजा आदिनाथा ॥॥ ब्रह्मचोज मिरवेल ॥15॥ किंबहुना चराचर ॥॥ असे स्वरूपीं साकार ॥॥ नग नोहे हेमचि सार ॥॥ आब्रह्मभुवनापासोनी ॥16॥ शिव ऐकतां वचन ॥॥ जळीं पाहे चाकाटोन ॥॥ तों मच्छोदरी नारायण ॥॥ कवि महाराज समजला ॥17॥ शंकर बोलते झाले त्यातें ॥॥ म्हणती महाराजा तूं आहेस येथें ॥॥ तरी मम उपदेशाचा तूतें ॥॥ लाभ झाला कविराया ॥18॥ हें फारचि झालें अपूर्व ॥॥ पुढें ऐक आनंदपर्व ॥॥ मंत्रउपदेशगौरव ॥॥ दत्तमुखीं करवीन मी ॥ 19॥ तुज जन्म झालियापाठी ॥॥ बद्रिकाश्रमी यावें शेवटी ॥॥ तेथें तूतें देईन भेटी ॥॥ सर्व सामग्री सचिन्ह ॥120॥
मत्स्याच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी शंकर-पार्वतीचे संभाषण ऐकले आणि शंकराच्या प्रश्नाला प्रतिसाद पण दिला. हे सर्व कथानक अकल्पीत व असंभव वाटणे शक्य आहे. परंतु या संदर्भात नाथशक्तिपिठामार्ङ्गत सन २०१०-२०११ मध्ये घडलेली एक घटना लक्षात घेण्यासारखी आहे. गर्भधारणा होण्यापूर्वी व झाल्यावर वाढीस लागलेल्या गर्भावर सुरवातीपासूनच कांही निवडक वेदोक्त सूक्तांचा उपचार एका विशिष्ट पध्दतीने करण्यास सुरवात केली. विशिष्ट रंगरूप अंग कांती व गुणांचा अविष्कार त्या गर्भावर करण्यास सुरवात केली. जन्माला मुलगाच येईल व तो कुयोग टाळून तसेच हवे असलेल्या नक्षत्र योगावर येवून, त्याची रंगरूप,अंग कांती आई-वडिलांपेक्षा वेगळी आणि सरस राहील या उद्देशाने सर्व प्रयोग केले.ज्या ज्या वेळी हा प्रयोग व्हायचा त्या त्या वेळी गर्भ त्याला विशेष प्रतिसाद द्यायचा असे लक्षात यायचे. प्रसृती झाल्यावर मुलगाच झाला, रंगरूप अंगकांती सर्व आई-वडिलांपेक्षा वेगळे आणि सरस निघाले. प्रसृती नंतर तेच सूक्त म्हटल्यावर ते अर्भक डोळे उघडून त्या आवाजाच्या दिशेने डोळे फिरवून, मान वळविण्याचा प्रयत्न करून पहायचा. म्हणजे गर्भावस्थेत असताना बाहेरच्या बोलण्याचा, मंत्रोपचारांचा परिणाम होतो व तो टिकावू असतो. हा प्रयोग श्रीसमर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांचे शिष्य नरेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शना खाली केला अशा निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग येथून केले आहेत. आज देखील पंथ आपले कार्य करीत आहे हेच पंथकार्याचे सदृष्य आहे.
पुढे मच्छिंद्रनाथांनी, निमित्त साधून, पालन पोषण करणार्या आईवडिलांना सोडून दिले आणि स्वतः बद्रिकाश्रमात तपश्चर्येसाठी निघुन गेले.
हल्लीच्या काळातील माधवनाथांची तपश्चर्या
अशा प्रकारची कडक तपश्चर्या हल्लीच्या काळांत असंभव वाटते. परंतु मच्छिंद्रनाथांच्या परंपरेतील सत्यमल नाथांपासून चित्रकूट येथे नाथपरंपरेचे कार्यसुरू होते.चित्रकूटला नाथपंथाच्या परंपरेच्या गादीवर माधवनाथ महाराज विराजमान झाल्यावर वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी ते हिमालयात गेले व तेथे त्यांनी मच्छिंद्रनाथां प्रमाणे १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली.त्यानंतर त्यांनी पंथ कार्याला चित्रकूट येथून सुरवात केली. व्यंकटनाथ महाराजांना देखील माधवनाथांनी वयाच्या १२ व्या वर्षी हिमालयात अंगावरच्या वस्त्रानिशी पाठविले. व्यंकटनाथांनी तेथे १२ वर्षापेक्षा जास्त काळ, कठोर जीवन जगून, बर्याच सिध्द सत्पुरूषांचे कृपाशिर्वाद प्राप्त करून साधना केली.
चित्रकुटच्या त्यागानंतर माधवनाथांचे पंथ कार्य देवगांव येथूनच झाले. अगदी समाधी घेईपर्यंतचे आपले दैदिप्यमान व अघटीत कार्य त्यांनी देवगांव रंगारी येथूनच केले. आपल्या सर्व शिष्यांना व भक्तांना आषाढी कार्तिकी प्रमाणे दर सहा महिन्यांनी देवगांवी येण्यास सांगितले. व्यंकटेश(नाथ) लहानपणापासूनच माधवनाथांच्या सेवेत होता. लहानपणा पासूनच माधवनाथांनी त्याला घडविले होत. व्यंकटेश(नाथ) सहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याला माधवनाथांनी अज्ञातवासात जायला लावले व सर्वापासून त्याला दूर केले. व्यंकटेशाने(नाथ) जवळ जवळ १२ वर्षे हिमालयात गुप्तपणे काढले व या कालावधीत ध्यान धारणा योग आदींचा अभ्यास त्याने केला. अनेक सिध्द सत्प्ाुरुषांचे आशीर्वाद, सेवा त्यांना लाभली. माधवनाथांच्या योजनेप्रमाणे प्रदीर्घ काळानंतर ते पुन्हा घरी माधवनाथांच्या सेवेत आले. माधवनाथांनी व्यंकटेशा(नाथ)कडून उग्र व कडक साधना करवून घेतली आणि त्यांची कसून परीक्षा घेतली. नित्यनियमाने आपल्या पध्दतीपणे गुरुकार्य करीत समाधी घेईपर्यंतचा जीवनाचा उर्वरित कालावधी त्यांनी देवगांव येथूनच पंथाचे कार्य करण्यात घालविला. पारंपरिक स्थानाचा म्हणजे चित्रकूटचा त्याग केल्यामुळे माधवनाथांनी समाधी घेण्यापूर्वी आपल्या सर्व शिष्यांना उद्देशून सांगितले होते की आमचे देह कलेवर कोठेही पडेल पण आमची आत्मज्योत देवगांवला व्यंकटेशात विलीन होईल ज्याने त्याची सेवा केली त्याने माझी सेवा केली जो त्याला मुकला तो मला मुकला,मी त्याचा गुरू नाही व तो माझा शिष्य नाही.पण येवढे कडकसांगून देखील त्यांच्या शिष्यांनी आपल्या गुरूवचनाला केवळ धाब्यावर बसविले. गुरूवचनाचा विचारून करता त्यांना हवे तसे ते वागत गेले. आज देखील गुरूवचनाचा विचार न करता, गुरू परंपरेचा विचार न करता आपली उदात्त भावना व्यक्त करून परंपरेला न जुमानता स्वतःचे साम्राज्य निर्माण करावे अशा तर्हेने ते माधवनाथांचे गुरू कार्य पुढे नेत असल्याचे भासवित आहेत.गुरूंचे वचन किंवा त्यांच्या सांगण्याचा विचार न करता हे वागणे कितपत बरोबर आहे ह्याचा विचार कोण करणार? ह्यांची उन्नती, उद्धार कसा होणार?
पंथकार्याची धुरा हाती देण्यापूर्वी सद्गुरू आपल्या शिष्याला पंथ कार्य करण्यास सिध्द करतात. त्या प्रमाणे व्यंकटनाथांना पूर्णपणे तयार करून, १९३६ साली आपला कार्यावतार संपविण्यापूर्वी माधवनाथ महाराजांनी व्यंकटनाथ महाराजांना स्वतः गादीवर बसविले व पुढील पंथ कार्य करण्याची आज्ञा दिली. यात शिष्यांच्या संम्मतीची अगर त्यांना कोणत्याही तर्हेने जाहीर करण्याची पद्धती ही गुरू ठरवितील त्या प्रमाणेच असणार. इतर कुणाच्या मान्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही. येणार्या गुरूने कोठे व काय करावे हे अधिकार सद्गुरूच ठरवितील. पंथकार्य करण्याच्या दृष्टीने मच्छिंद्रनाथांनी, बद्रिकाश्रमात जाऊन, कडक तपश्चर्येला सुरवातकेली.