☼ ग्रंथ परीक्षण ☼
प. पू. जितेंद्रनाथ महाराज गुरु मनोहरनाथ
पिठाधीश, श्री नाथपीठ, श्री देवनाथमठ,
श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी
‘इया गुरुचरण सेवा | हो पात्र तया दैवा |
जे सकळार्थ मेळावा | पाटू बोधे | ’ (ज्ञानेश्वरी)
‘अर्थात् सकलार्थाची प्राप्तीकरून देणारी ही अनुपम गुरुचरणसेवा करण्याचे दैव मला प्राप्त होवो.’ ‘हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा’ हे श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी केलेले मानवी जीवन विषयक विवेचन यथावकाश अवलोकन केले. मनुष्यजीव व त्याच्या जीवनाचे हितचिंतन हा या विवेचनाचा मुख्य विषय असल्याचे पाहून मनाला अतिशय आनंद झाला.
या पुस्तकामध्ये मुख्यत्वे करून गुरुसामर्थ्य आणि गुरुकृपा, जीवाच्या प्रेतादी पिंडात्मक दशा, जीव-ब्रह्मांड-संबंध, जीवाचे पूर्व संचित आणि प्रारब्ध तसेच शास्त्र तसेच मंत्र आणि तंत्र यांच्या आधाराने जीवाच्या आधीव्याधी, गती आणि स्थिती संबंधी काय उपचार होऊ शकतात इत्यादींचे विवेचन केले आहे. हे सर्व पाहता श्री नरेंद्रनाथ चौधरी ऊर्फ श्री काका यांचे ठायी असलेली लोकोद्धाराची तळमळच दिसून येते.
तसेही जीवाचा जीवन व्यापार आणि हा जीव लोक किंवा संसार या विषयी भगवान श्री कृष्णांनी भगवत्गीतेत व श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत बरेचसे विवेचन केले आहे. ‘शरीरं यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वरः | गृहित्वैतानी
संयाती वार्युगंधानिवाशयात् ॥ (गीता १५/८)’ अर्थात्: पुष्पादिकांपासून वायू सुगंध घेऊन जातो तसेच पहिले शरीर सोडून जीव दुसरे धारण करतो, तेव्हा पंच ज्ञानेंद्रिये व मन यांनाही आपल्या सोबत घेऊन जातो आणि देहाहंकार उत्पन्न होतो आणि जीवाचा जीवलोकातील अव्याहत व्यापार सुरू होतो.
मनुष्याच्या पूर्व जीवदशेतील पंचज्ञानेंद्रिये व मन यांचा वासनात्मक व र्वकर्मात्मक भागच त्याचे पूर्व संचित व प्राक्तन बनवित असतो. त्यातील अनेकविध पूर्वकर्म संचिताचा लोप हा काही प्रायश्चित्ते, शास्त्रचर्या आणि तंत्रोपाय आदींमुळे होऊ शकतो. त्यामुळे प्रस्तुत विवेचनातून त्याचा उहापोह श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी करून तद्विषयक उपायही सुचविले आहेत. संसाराविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘अगा उपजणे निमणे | हे साचचि जे का मानणे | तो जीवलोकू मी म्हणू | संसार हन ॥ (ज्ञानेश्वरी)’ अर्थात् : जिथे जन्म आणि मृत्यू हे सत्य मानले जातात त्यालाच लोक, जीव लोक वा संसार असे मी म्हणतो.
उपरोक्त या संसारात मुख्यत्वे दोन सुखे असतात. एक एैहिक आणि दुसरे
आत्मिक. सर्व तंत्रशास्त्र मंत्रादी कामनिक उपासना या एैहिक सुख प्राप्त करून देतात आणि त्या योगे जीवाचा प्राक्तन-पूर्वसंचिताच्या व्यवहाराशी संबंध कायम राहतो. परंतु जीवनाच्या प्राक्तन-पूर्वसंचितांना साक्षीभाव धरून पाहणारा जीव जेव्हा श्री गुरुशरणागत होऊन ‘विषयची ज्याचा झाला नारायण’ असा होतो तेव्हा तो ‘पूर्वसंचित-प्राक्तन’ आदींच्या गुतांवळ्यातून बाहेर पडून जन्म मरणाच्या फेर्याबाहेर पडतो व आत्मसुखी होतो.
श्री माऊली या संबंधी सांगतात, ‘जेवी मजसी एकवट | जे जाले ज्ञाने चोखट | तया पुनरावृत्तीची वाट | मोडगी गा | (ज्ञानेश्वरी १५/३१७)’ अर्थात् : जशी गंगा शेवटी सागर होऊन अव्यायपद पावते, जशी मिठाची हत्तीण
विरघळुन सागररूप होते अथवा अग्निज्वाळा अतंराळात विरून जातात वा तप्त लोहावरील पाणी उडून जाते तसेच श्री गुरुकृपेने विमलज्ञानाची प्राप्ती झाल्यास जीव हा जन्म मृत्यू, प्राक्तन-पूर्वसंचित, आदींपासून मुक्त होऊन अव्ययपदाचा मानकरी होतो.
श्री नरेंद्रनाथ महाराज ऊर्फ श्री काका चौधरी यांना प. पू. श्री व्यंकटनाथ महाराजांची पूर्ण गुरुकृपा लाभली आहे. एैहिक दुःखापासून निवृत्त होण्यासाठी ते सर्वांना सतत मार्गदर्शन करीत आहेत. तसेच आत्मिक सुखाच्या अनुभूतीने जीवाचा समूळ उद्धार व्हावा आणि श्री गुरूकृपेने विमलज्ञानाच्या योगाने श्री गुरू शरणागत सर्वच जीवांना आत्मिक सुखाचा लाभ व्हावा, जेणे करून पूर्वसंचित आणि प्राक्तन आदींचा नाश होऊन मानवी जीवन हे अव्ययपदाचे धनी व्हावे, हीच सद्गुरुनाथ चरणी प्रार्थना करतो. या पुस्तकाच्या लेखकास तसेच प्रस्तुत विवेचनात्मक पुस्तक प्रबंधाला आशीर्वाद !
श्रीनाथ स्मरणम्प.
पू. जितेंद्रनाथ महाराज गुरु मनोहरनाथ
पिठाधीश, श्री नाथपीठ, श्री देवनाथ मठ,
श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी,(महाराष्ट्र)