☼ पूर्वसंचिताचा जीवनावर प्रभाव ☼

माणसाच्या जीवनाकडे पाहिले तर असा प्रश्न पडतो, की त्याच्या सद्यजीवनाचा संबंध हा त्याच्या गतजन्माच्या कृतींशी आहे का? सद्यजीवन हे स्वतंत्र आहे का, पूर्वजन्माचा संबंध असतो का, जीवनात घडणार्‍या घटनांचा पूर्वजन्मीच्या कृतींशी काही संबंध असतो का, सद्यजीवनात येणारे अडसर जे प्रारब्ध म्हणून संबोधले जातात ते प्रारब्ध बदलू शकते का, माणूस जन्माला येतो तो मागील जन्माशी कसा संबंध जोडून येतो, माणूस मेल्यानंतर काय होते, ह्या सर्व गोष्टींचे विवेचन आता पाहू.

या सर्व विवेचनापूर्वी हे लक्षात घेणे जरूर आहे, की प्रत्येक जीवाचा जीवनप्रवास हा काही एकाच वेळी सुरू झालेला नाही. कुणाचे जीवन केव्हा अन् कसे सुरू झाले, हा विषयच वेगळा आहे. त्या बाबतीत येथे काही सांगणे हे शक्य होणार नाही, परंतु अशी कल्पना करणे योग्य राहील, की स्वतंत्र जीवाचा जीवनप्रवास ज्या वेळेपासून सुरू झाला तेव्हापासून साठलेले जे चांगले अथवा वाईट कर्म आहे त्याला प्रारब्ध म्हणता येईल? साठलेल्या कर्माला पूर्वसंचित असेच म्हटले आहे. मागील जन्माचे जे कर्म त्याला प्राक्तन म्हणून संबोधले जाते. हातून घडलेल्या कर्माच्या फळाला नशीब असे संबोधले जाते. आकस्मिक योगाने घडलेल्या गोष्टींना दैवयोग अथवा योगायोग म्हटले आहे.

जीवनात घडणार्‍या घटनांवरून कर्मदोष कसे समजू शकतात? पूर्वसंचिताचा जीवनावर कसा आणि काय प्रभाव पडतो, तसेच जीवनात घडणार्‍या घटनांवरून कर्मदोष कसे समजू शकतात, हे समजून घेण्यासाठी आपल्या प्राचीन इतिहासातील काही उदाहरणांचा ऊहापोह करणे आवश्यक आहे.

 वाल्मीकी ऋषींचा जीवनप्रवास

भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासातील वाल्मीकी ऋषींची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. वाल्मीकी ऋषी हे पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी होते. वाटमारी किंवा रस्त्यावरून जाणार्‍याला धर, पकड, मार आणि लूट हा त्याचा व्यवसाय. पाप-पूण्याचा विचार न करता प्रपंचासाठी हा सर्व उपद्व्याप चालू होता. अनेक दिवस असे चालू होते.

ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात ही गोष्ट आली. वाल्याचे प्रारब्ध व पूर्वसुकृत चांगले, पूर्वजन्मीचे संचित चांगलेच. सर्व योग चांगले असताना कोणत्या मोहामुळे, कोणत्या कारणामुळे तो जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकला,त्याचे जीवन असे का झाले, हा प्रश्न नारदमुनींना पडला. हे समजून घेण्यासाठी आणि त्याला जाणीव करून देण्यासाठी म्हणून ते ब्राह्मणाचे रूप घेऊन च्या समोर उभे राहिले.

वाल्याने आपल्या नित्यकर्म पद्धतीप्रमाणे त्या ब्राह्मणाला लुटण्यासाठी पकडले तोच तो ब्राह्मण वाल्याला म्हणाला, ‘‘तू मला मारू नकोस. तुला जे पाहिजे ते मी देतो. पण तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे.’’ ब्राह्मणाने त्याला विचारले, ‘‘तुझ्या ह्या व्यवहारातून जे काही पाप तुझ्या वाट्याला येत असेल त्यात तुझ्या बायकोला पापाचा अर्धा हिस्सा मान्य आहे का? तू तिला हे विचार. जर तिला हे मान्य असेल तर तू जे म्हणशील ते मी तुला देईन.’’त्यावर तो म्हणाला, ‘‘तिला हे मान्यच आहे.’’ परंतु प्रत्यक्ष तिच्याशीच बोलण्याचे ठरले होते, म्हणून घरी जाऊन तिला विचारले. विचारताक्षणीच ती म्हणाली, ‘‘ह्यांच्या कृतीतून घडणार्‍या पापाशी माझा काय संबंध आहे? हे जे काही घरी आणतात त्याच्यावर मी माझा प्रपंच चालविते.’’

पत्नीचे हे उत्तर ऐकून वाल्या कोळी विचारात पडला. तो विचारांच्या भोवर्‍यात इतका अडकला, की त्याला काय करावे हे काहीच सुचले नाही. मनाच्या उद्विग्नतेत गेल्यावर त्याला उपरती झाली आणि तोच त्या ब्राह्मणाला (नारदमुनींना) विचारू लागला, ‘‘मी आता काय करू? हे सर्व तर मी पत्नीसाठी, कुटुंबासाठी करीत होतो.’’ त्यावर नारदमुनी म्हणाले, ‘‘तू आता ‘राम राम’ असा जप करीत राहा. सर्व काही आपोआप होईल.’’ ब्राह्मणाच्या वचनावर विश्वास बसला, परंतु ‘राम राम’ म्हणता येईना. शेवटी त्या ब्राह्मणाने म्हणजे नारदाने सांगितले, ‘‘तू मरा मरा म्हण.’’ ते म्हणणे वाल्याला सोपे गेले आणि ‘मरा मरा’ सतत म्हणता म्हणता ‘राम राम’ आपोआप होऊन त्याचे तप सुरू झाले. तो त्या तपानुष्ठानात इतका तल्लीन झाला, की किती कालावधी त्यात गेला हे कळलेच नाही. वाल्या कोळी पूर्णपणे एका वारुळात लुप्त झाला.

वाल्याचा तो वाल्मीकी ऋषी झाला. त्यांची तप:साधना इतकी प्रखर झाली, की त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापूर्वीच संपूर्ण रामायण लिहिले. जे जीवन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जगले ते वाल्मीकी ऋषींनी रामजन्माच्या कितीतरी आधी जसेच्या तसे लिहिले आहे.

हे कथानक म्हणजे भारतीय इतिहासाचेच एक उदाहरण आहे, एक दाखला आहे. भारतीय संस्कृतीचा हा परिचय आहे. भारतीयांना हे मान्य आहे किंवा नाही हा प्रश्नच नाही. हीच आपली परंपरा आहे. हीच आपली संस्कृती पिढ्यान्‌पिढ्या आहे. ह्या सर्व घडलेल्या गोष्टी आहेत. अनेक वाङ्‌मयांतून ह्याचे दाखले मिळतील. त्याच्याबद्दल शंका काय घेणार?

वाल्या कोळीच्या जीवनावरून हे स्पष्ट होते, की एक सामान्य जीव जो वाल्या कोळी म्हणून जगत होता- त्याच्या जीवाच्या जीवनाचा पूर्वेतिहास,म्हणजे त्याचे प्रारब्ध ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात आले.

ब्रह्मर्षी नारदमुनी म्हणजे अखण्ड ‘नारायण नारायण’ म्हणत म्हणत स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या तिन्ही लोकांत संचार करणारा भगवान विष्णूचे परमभक्त आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्रिकाल ज्ञानी. माणसाच्या जीवाचा जीवनप्रवास हा अखण्ड असतो हे ते जाणत होते. जीव म्हणजे आत्मा.

ज्या वेळी माणसाच्या जिवाची गर्भस्थापना होते त्या वेळी हा बीजरूपी पिंड म्हणून प्रस्थापित होतो. हा पिंड आपला पूर्वेतिहास घेऊन येत असतो. आपल्या कर्माचे गाठोडे तो बरोबर आणीत असतो. जसे त्याचे कर्म असेल त्याप्रमाणे त्याच्या जिवाच्या जीवनाचा चरितार्थ चालतो. त्याप्रमाणेच त्याच्या जीवनात घटना घडू लागतात. म्हणजेच माणसाच्या जिवाचा जीवनप्रवास हा अखंड असतो.

वाल्याचा हा इतिहास ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात वाल्याच्या पूर्वसंचितामुळेच आला. वाल्याचे प्रारब्ध चांगले असताना त्याचे प्रत्यक्ष जीवन असे का, म्हणून ही उठाठेव नारदमुनींनी केली. वाल्याने प्रत्यक्ष जीवनात जे ऋषिकार्य केले तसे घडत नव्हते, म्हणून कोणत्या कर्मदोषांमुळे जीवनामध्ये तो लुटारू झाला. ह्याचा आढावा ब्रह्मर्षींनी घेतला आणि आपल्या तप:सामर्थ्याने वाल्याच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडविले.

गुरुचरित्राच्या काळातील गोष्ट

आपल्या प्राचीन धर्मग्रंथात, इतिहासात अशाच प्रकारच्या एका प्रसंगाचा दाखला आहे. एकदा भगवान दत्तात्रेयांनी एका धोब्याला त्याचा उल्लेख रजक म्हणून केला आहे. त्यांनी त्याला एक आशीर्वाद दिला.

गुरुचरित्राच्या ९ व्या अध्यायात एका रजकाची ही गोष्ट सांगितली आहे. हा रजक एकदा राजाला दिला जाणारा मानसन्मान पाहत असतो. त्याच्या मनात प्रकर्षाने येऊ लागते, की अशा तर्‍हेचे आपले जीवन असावे. अशा तर्‍हेचे ऐश्वर्य जीवनात असावे. असा राजसन्मान मिळावा. हे सर्व प्राप्त होण्यासाठी ह्या राजाने कोणत्या गुरूची सेवा केली तशी आपण करू. असा विचार करीत करीत तो राजाच्या त्या ऐश्वर्याचा वैचारिक आनंद घेत असताना त्याने श्रीगुरुस्वामींचे, दत्तात्रेयांचे दर्शन घेतले.

 

 

 

रजकास गुरुस्वामींनी आशीर्वाद दिला व पुढील जन्मी तो राजा झाला.

 श्रीगुरुस्वामींनी त्या रजकाला विचारले, ‘‘तू कोणत्या चिंतेत आहेस? कोणते विचार तुझ्या मनात चालू आहेत?’’ त्यावर त्याने आपल्या मनात असलेले विचार सांगितले. श्रीगुरुस्वामींनी त्याला आशीर्वाद दिला व पूढच्या जन्मी म्लेंछवंशी जन्म घेऊन राज्य भोगून तुझ्या इच्छा पूर्ण होतील. ज्या वेळी तुला आमचे दर्शन होईल त्या वेळी तुला ह्या जन्माची स्मृती होईल,’ असे सांगितले.

पुढे म्लेंछांच्या वंशात जन्माला येऊन तो ‘राजा’ झाला आणि आपले राज्य भोगू लागला. कालांतराने त्याच्या मांडीवर एक फोड झाला. अनेक उपचार करून राजाचा हा फोड बरा होतच नव्हता. वैद्य, मांत्रिक- सर्व प्रकार झाले तरी हा फोड बरा होतच नव्हता. उलट त्रास, दु:ख हे वाढतच होते. ते असह्य होऊ लागले. त्या फोडाच्या निमित्ताने कर्मधर्मसंयोगाने श्रीगुरुस्वामींची भेट झाली आणि पूर्वजन्माची जाणीव होऊन तो श्रीगुरूंना शरण गेला आणि श्रीगुरूंच्या कृपेने त्याचा फोडदेखील बरा झाला.

रजकाच्या जीवनावरून हे स्पष्ट होते, की एक सामान्य जीव- जो एक धोबी म्हणून जीवन जगत होता- त्याच्या जिवाच्या जीवनाचा पूर्वेतिहास, म्हणजे त्याचे प्रारब्ध, सद्गुरू स्वामींनी लक्षात घेतले.

ब्रह्मा, विष्णू, महेश्‍वरस्वरूपी भगवान दत्तात्रेयांनी- जे अखिल ब्रह्मांडाचे गुरू आहेत, संपूर्ण ब्रह्मांडावर ज्यांची पूर्ण सत्ता आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्यावर ज्यांची सत्ता आहे त्यांनी रजकाच्या जीवनामध्ये स्थित्यंतर करण्याचे ठरविले.

रजकाचा हा इतिहास भगवान दत्तात्रेयांनी लक्षात घेऊन, रजकाचे पूर्वसंचित लक्षात घेऊन, त्याचे प्रारब्ध लक्षात घेऊन रजकाला इच्छित अनुभूती दिली. त्यांनी आपल्या तप:सामर्थ्याने रजकाच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडविले.

ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील प्रसंग

महाराष्ट्रातील नामवंत संत- ज्यांनी फार मोठा इतिहास रचला आहे आणि नाथ पंथाला हठयोगाकडून वळवून विशेषेकरून भक्तिमार्गाची दिशा दिली ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज होत. त्या काळच्या ब्रह्मवृंदांनी संन्यासाची पोरे म्हणून त्यांना समाजबाह्य केले होते. ब्राह्मण हे भूदेव म्हणून ज्ञानवंत ब्राह्मणांकडून शुद्धिपत्रक प्राप्त करण्याच्या उद्देशाने भ्रमण करीत असताना पैठणला काही विद्वानांनी त्यांची कुचेष्टा करण्याच्या हेतूने रस्त्यावरून जाणार्‍या एका माणसाला थांबविले. त्याच्या हाती एक रेडा होता.‘‘ह्या रेड्याचे नाव काय,’’असे त्या माणसाला विचारले. तो उत्तरला, ‘‘ज्ञानदेव.’’ रेडा ज्ञानदेव व हा मुलगादेखील ज्ञानदेव. दोघेही एकच. मग रेड्याला मारले तर ज्ञानदेवाला लागायला पाहिजे, म्हणून ह्या विद्वानांनी सोट्याने त्या रेड्याला मारले, तेव्हा त्याचे व्रण ज्ञानदेवांच्या पाठीवर उमटले. ज्ञानदेवांचे मोठेपण मान्य करण्याऐवजी ह्यांना कोणती विद्या येत असेल, असे समजून ते विद्वान म्हणाले, ‘‘तू ब्राह्मण आहेस. तुला वेद म्हणता येतात का?’’ ‘‘हो’’ म्हटल्यावर त्यांनी सांगितले, की ‘‘हाही ज्ञानदेव आहे. तुझा आणि ह्याचा आत्मा सारखाच आहे. मग ह्याच्या मुखातून वेद म्हणून दाखव बरं.’’ ज्ञानदेवांनी या रेड्याला आपल्या जवळ बोलावून त्याला त्याच्या गत सात जन्मांची आठवण करून दिली व म्हणाले, ‘‘मागील जन्मी तू ब्राह्मण होतास. वैदिक होतास. तू नेहमी ऋग्वेद म्हणत असायचास. हे तुला आठवतं का?’’ रेड्याने ‘हो’ म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ‘‘मग ह्या विद्वान लोकांना तुझ्या मुखातून वेद ऐकायचे आहेत, ते तू ह्यांना ऐकव.’’ असे म्हणताच तो रेडा वेद म्हणू लागला. जसे वैदिक ब्राह्मण वेद म्हणतात अगदी तसेच वेद त्याने म्हटले. पशूला वाचा नसते, परंतु ज्ञानेश्वरांच्या प्रभावामुळे रेड्यानेदेखील माणसासारखे उच्चार करून वेद म्हणून दाखवले, हे कथानक सर्वश्रुत आहे. याही कथानकावरून हे स्पष्ट होत आहे, की एक पशुजीव जो रेडा म्हणून जीवन जगत होता त्याच्या जीवाच्या जीवनाचा पूर्वेतिहास श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या मुखातून वेद म्हणवून घेतले. हे केवळ ज्ञानेश्वर महाराजच करू कले.

मच्छिंद्रनाथांनी आरंभिलेल्या नाथ पंथातील ज्ञाननाथ हा एक दुवा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे हे चरित्र सर्वांनाच माहीत आहे. म्हणजेच माणसाच्याच काय, पण प्रत्येक जीवाचा जीवनप्रवास हा अखंड असतो. जीव म्हणजे आत्मा. ज्या वेळी जीवाची गर्भस्थापना होते त्या वेळी हा बीजरूपी पिंड म्हणून प्रस्थापित होतो.जेथे जीव आहे तेथे हा पिंड प्रस्थापित होतो. जीव कोणत्या देहाचा आहे ह्याचा पिंडावर काहीच परिणाम होत नाही.

चालू शतकातील नाथपंथी योग्याचा अनुभव

मच्छिंद्रनाथांनी आरंभिलेल्या नाथ पंथाच्या अखंड गुरुपरंपरेने देवगाव रंगारी येथून कार्य करणारे व्यंकटनाथ महाराज ह्यांच्या सान्निध्यात मी (प्रस्तुत पूस्तकाचे लेखक) १९५७ -१९५८ साली होतो. कॉलेजचे शिक्षण सुरू होते. नागपूरच्या कॉमर्स कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो. १९-२० वर्षांचे वय असेल. त्या वेळची माझी विचारसरणी ही साधारणत: देवाला न मानणारी होती. भक्ती,पूजा करणे, साधुसंताच्या सहवासात राहणे, त्यांच्याकडून ज्ञान घेणे, या गोष्टींवर अजिबातच विश्‍वास नव्हता. हे कलियुग आहे. ऋषी, मुनी, साधुसंत, देव,अंतर्ज्ञानी, योगी या पूराणांतल्या इतिहासातल्या गोष्टी आहेत. आजच्या युगात योगी, अंतर्ज्ञानी असे सत्पुरुष असणे शक्यच नाही. त्यामुळे गुरू अथवा गुरुछायेखाली राहणे, हे विचारच मान्य नव्हते. जे काही अलीकडच्या काळात विवेकानंद, रामकृष्ण यांनी कार्य केले त्यांच्या कार्यावर, विचारसरणीवर विश्‍वास होता. परंतु असे व्यक्तिमत्त्व आता केवळ अशक्य आहे. अशा विचाराच्या स्थितीत कालक्रमणा चालली होती. मनात येईल ते करायचे. आपल्या मनाच्या समाधानासाठी जे वाटेल ते करायचे आणि आपल्याला जे वाटते ते शुद्ध आणि योग्य आहे अशीच धारणा. अशा प्रकारे कालक्रमणा चालू असताना एक दिवस एक वर्गमित्र म्हणाला, ‘‘अरे, आमचे गुरुमहाराज येत आहेत. ते आले की आपण त्यांच्याकडे जाऊ. ते आपल्याला गंधाच्या गोळ्या देतील. त्या घेतल्या की आपण परीक्षेत पास होऊ.’’ केवळ परीक्षेत पास होणे या विचारांनी आकर्षित झाल्यामुळे ते ज्या वेळी येतील त्या वेळी त्यांच्याकडे जाऊ आणि गोळ्या मागू, असे ठरविले.

एके दिवशी कॉलेजमध्ये हजेरी लावून मित्र व मी बाहेर पडलो.मित्राला सांगितले, की ‘तासाभरात मी येतो.’ थोड्या वेळानंतर मित्राच्या खोलीवर गेलो. वेळ साधारणत: दुपारी १२ ते १२.३० ची असेल. मित्राच्या खोलीचे दार आतून बंद होते, म्हणून कडी वाजवली. मित्राने दार उघडलेच नाही. बराच वेळ कडी वाजविली, हाका मारल्या, पण त्याने दार उघडलेच नाही. मी मोठमोठ्याने हाका मारत होतो, कडी वाजवीत होतो, तेवढ्यात त्याने आतून दार किंचित उघडून फटीतून बाहेर कोण आहे, हे पाहिले. तो मी दार बाहेरून जोरात ढकलले आणि खोलीत प्रवेश केला. आतमध्ये गेल्यावर पाहतो तर मित्राचा चेहरा लाल झालेला. डोळ्यांतून अश्रू येत होते अन् तो रडत होता. गालांवर दोन्ही हात त्याने घट्ट दाबून ठेवले होते. दारं-खिडक्या आतून बंद होत्या. खोलीत जवळजवळ अंधारच होता अन् खोलीत दुसरे कुणीच नव्हते. ‘‘अरे उद्धव, काय झालं? काय झालं तुला? का रडतोस?’’ एक नाही की दोन नाही. काही उत्तर नाही. म्हणून त्याच्या गालांवरचे दोन्ही घट्ट दाबून ठेवलेले हात मी ओढून बाजूला काढले, तर त्याच्या गालांवर जाडसर हातांची बोटे उमटलेली दिसली. मी त्याला बळजबरीने पलंगावर बसविले. विचारले, ‘‘काय झालं?’’ थोडया वेळाने तो बोलू लागला,‘‘खोलीत आलो. मी माझ्या कॉटवर झोपलो. नेहमी झोपताना मी भिंतीकडे डोकं करून झोपत असे. आज अनवधानाने भिंतीकडे पाय करून झोपलो.’’ मी त्याला लगेचच म्हटले, ‘‘मग त्यात काय झालं?’’ तो म्हणाला, ‘‘नाही, भिंतीच्या पलीकडे गुरुमहाराजांची गादी आहे आणि नकळत माझे पाय तिकडे झाले. मी झोपलो आणि तेवढ्यात महाराज आले आणि म्हणाले, ‘‘अरे बाळा, आजपर्यंत आमच्याकडे डोकं करून झोपत होतास, आज पाय करून झोपलास? म्हणून हा घे प्रसाद!’’ असं म्हणून जोरात मुस्काटीत मारली आणि निघून गेले.’’

‘‘महाराज आता कुठे आहेत?’’ ‘‘ते देवगाव रंगारीला आहेत.’’ नागपूर ते देवगाव रंगारी हे अंतर जवळजवळ ६०० कि.मी असेल. म्हणजे बाजूच्या खोलीत ते नाहीत. तो म्हणाला, ‘‘ते नागपुरातच नाहीत. औरंगाबादजवळ देवगाव रंगारीला आहेत.’’ त्याला विचारलं, ‘‘ते तिथून आले आणि थप्पड मारून निघून गेले. तेवढ्यासाठीच ते इतक्या दुरून आले आणि गेले. हे कसं शक्य आहे?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘ते रोजच केव्हाही येतात. कधी बाईचा तर कधी माणसाचा आवाज काढतात. निरनिराळ्या गोष्टीवरून साक्ष देतात.’’

परंतु या गोष्टीवर माझा विश्‍वासच बसेना. मात्र त्याच्या गालावर उमटलेले बोटांचे वळ, लालबुंद रडका चेहरा आणि त्याचे बोलणे माझ्या मनात सतत प्रश्‍न निर्माण करीत होते. हा मुलगा प्रकृतीने किरकोळ. स्वतः स्वतःला मारलं तरी एवढी रुंद बोटे आणि वळ उमटणे शक्य नाही. उमटलेल्या वळावरून हे निश्‍चित जाणवत होते, की कुणातरी चांगली प्रकृती असलेल्या माणसाचे हे वळ आहेत आणि खोलीत त्याच्या आणि माझ्याव्यतिरिक्त कुणी नाही. या सगळ्या प्रकाराने गुरुमहाराजांविषयी कुतूहल वाढले आणि त्यांना केव्हा भेटतो, केव्हा पाहतो, असे मला वाटायला लागले.

त्यानंतर अल्पशा कालावधीत ते नागपूरला आले. आम्ही काही मित्रांनी ठरवले, की त्यांच्या दर्शनाला जायचे. परीक्षेत पास होण्यासाठी गंधाच्या गोळ्या मागायच्या. आम्ही ९-१० मित्र एके दिवशी त्यांच्याकडे गेलो. नुसते दरवाजात जाताच ते म्हणाले, ‘‘हं, काय, परीक्षा जवळ आली काय? गंधाच्या गोळ्यांसाठी आलात काय?’’ आम्ही सारेच हसलो. आमच्या मनातल्या उद्देशाला लक्षात घेऊन ते बोलताहेत, याचे विशेष वाटले. आम्ही सर्वांनी नमस्कार केला. मी ज्या वेळी त्यांच्या पायांवर डोक टेकवले, त्या वेळी त्यांनी माझ्याकडे पाहिले अन् मला सहजतेने विचारले, ‘‘बाळ, तुझं नाव काय?’’ मी म्हटले,‘‘चौधरी.’’ ते म्हणाले, ‘‘ते आम्हाला माहीत आहे. तुझं पहिलं नाव काय?’’मी म्हटले, ‘‘नरेंद्र.’’ ‘‘ते आम्हाला माहीत आहे. किती उशीर केलास रे?’’ असा उलट त्यांनीच मला प्रश्‍न केला. त्यांची ती प्रश्‍नोत्तरे ऐकून माझ्या स्वभावाप्रमाणे, विचाराप्रमाणे माझे डोके तडकले. तेवढ्यात मंद स्मित करीत त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, ‘‘एक एक जण या. मी तुम्हाला गंधाच्या गोळ्या देतो, त्या मोजा. मला येऊन सांगा. तुमच्या परीक्षेचा निकाल याच क्षणाला तुमच्या कानात सांगतो. मी गोळ्या मोजल्यावर त्यांना सांगितले,‘‘५६ गोळ्या भरल्या.’’ आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला, तोच कानामध्ये स्पष्ट शब्दांत ऐकू आले, ‘‘तू बी.कॉम.सेकंड क्लासमध्ये पास होशील.’’ आवाज ऐकताक्षणीच मी मान वर करून पाहिले,माझ्याजवळ कुणीच नव्हते. तोच त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, ‘‘आम्ही तुझ्या कानात जे सांगितलं ते तू ऐकलंस का?’’ मी ‘हो’ म्हटले.‘‘तोच तुझ्या परीक्षेचा निकाल आहे.’’

दुसर्‍या दिवशी आठ वाजता ते आमची वाट पाहणार होते. मी मनाशी पक्के ठरविले, की वाट्टेल ते झाले तरी त्यांच्याकडे जायचे नाही. प्रातर्विधी आटोपून तयार झालो. खोलीच्या बाहेर पडलो. ८ वाजले होते आणि नकळत डोक्यातला राग शांत होऊन मनात विचार आला, की त्यांच्याकडे जाऊन तर पाहावे काय म्हणतात ते. सरळ महाराजांच्या खोलीत गेलो. मला पाहून ते हसले आणि म्हणाले, ‘‘ये, मी तुझीच वाट पाहत होतो. तू तर येणार नव्हतास ना रे? मग काय झालं?’’ असे म्हणत हसत राहिले. जणू काही या गोष्टीची पूर्वकल्पना त्यांना होती. या प्रसंगानंतर सततच मनामध्ये त्यांच्याबद्दलचे निरनिराळे प्रश्‍न निर्माण व्हायचे. त्यांची उत्तरे शोधत शोधत व दोघांनीही एकमेकांना समजून पूढे जायचे, हा प्रकार सुरू झाला. अविश्‍वास नाही, परंतु विश्‍वासही नव्हता. श्रद्धा नव्हती, परंतु आदरभाव तेवढा जबरदस्त होता. ते खोटे बोलताहेत असे वाटत नव्हते, पण खरे काय असेल ते तपासून पाहू; ते जे काही सांगतात ते अमान्य करण्यापेक्षा प्रांजळ बुद्धीने तपासून आपली खात्री करून घ्यावी, अशा प्रकारचे स्थित्यंतर झाले. पूढे बी.कॉम.च्या परीक्षेत मी सेकंड क्लासमध्ये पास झालो.

माझ्या चित्तवृत्ती- प्रवृत्तीमध्ये बदल घडवीत घडवीत विविध प्रकारचे ज्ञान देत देत नाथ पंथाच्या शिस्तीत त्यांनी मला तयार केले. माझ्यात एवढा बदल घडला, की ज्या वेळी मी त्यांच्या सहवासात प्रथम आलो होतो तो कोणालाही न मानणारा मी, हा केवळ इतिहासातलाच राहिलो. शिष्याला घडवीत घडवीत एवढे घडविले, की ‘तू आणि मी एकच आहोत. तू जे केलेस ते मी केले, मी जे केले ते तू केलेस. मी म्हणजे तू व तू म्हणजे मी,’ असे ते स्वत: म्हणाले.

समाधीनंतर त्यांनी आपले पंथकार्य पूढे सुरू ठेवण्यास सांगितले. एका अतिसामान्य व्यक्तीला त्यांनी आपल्यासारखे केले. ही त्या योगेश्वराचीच किमया.

नाथ पंथाचे कार्य मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आदींनी आपापल्या योजनेनुसार निरनिराळ्या ठिकाणी अवतार घेऊन सुरू केले. त्यानंतर निरनिराळ्या विभूतींनी हे पंथकार्य पूढे विकसित केले. ह्यामध्ये निरनिराळ्या शाखा-उपशाखा निर्माण झाल्या. ह्याच पंथातील ज्ञाननाथ, गुप्तनाथांच्या मालिकेतील विठ्ठलनाथ,माधवनाथ. माधवनाथांनी चित्रकूट येथून पंथकार्य केले. त्यांच्यानंतर माधवनाथांच्या आदेशावरून व्यंकटनाथमहाराजांनी नाथ पंथाचे विभूतिमाहात्म्य लोकांपर्यंत पोचविले. त्यांनी असंख्य लोकांच्या व्याधींचे हरण केले, अनेक लोकांना संसारसागरामध्ये बुडण्यापासून वाचविले, अनेकांना भक्तिमार्गाला लावले. सहजतेने लोकांना अध्यात्माचे ज्ञान दिले. त्यांनी अहोरात्र अव्याहतपणे जीवोद्धारार्थ अघटित व दैदीप्यमान कार्य जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत केले.

याही गोष्टीवरून हे स्पष्ट होत आहे, की एक सामान्य जीव- जो एक सामान्य व्यक्ती म्हणून जीवन जगत होता, विद्यार्थी होता, त्याच्या जीवाच्या जीवनाचा पूर्वेतिहास योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांनी लक्षात घेतला. औरंगाबाद ते नागपूर ६०० कि. मी. एका वेगळ्या स्तरातून ते सहज जा-ये करू शकत होते. ते अदृश्य होत होते, तसेच ते सर्वव्याप्त होते, सर्वज्ञ होते. ते योगी सत्पुरुष होते. आपल्या तप:साधनेच्या जोरावर त्यांना नरेंद्राचे पूर्वसंचित माहीत होते. त्याचे प्रारब्ध माहीत होते. हे सर्व लक्षात घेऊनच त्यांनीदेखील एका अगदी सामान्य व्यक्तीला, व्यवसाय करणार्‍या व्यावसायिक वृत्तीच्या व्यक्तीला त्याच्यात सर्व तर्‍हेची स्थित्यंतरे घडवून त्याच्या चित्तवृत्ती, प्रवृत्तीमध्ये बदल घडवून, ज्ञान देऊन त्याला पंथकार्याची, गुरुकार्याची अनुमती दिली. कार्य करण्याचा हा अधिकार प्राप्त करायला अनंत जन्म घालवावे लागतात, तो अधिकार त्यांनी नरेंद्राला त्याचे पूर्वसंचित, प्रारब्ध लक्षात घेऊन ह्याच जन्मात प्राप्त करून दिला. म्हणजेच माणसाच्या जीवाचा जीवनप्रवास हा अखंड असतो. जीव म्हणजे आत्मा. आत्म्याभोवती कर्माचे बीजरूपाने वेष्टण आले की पिंड झाला. ज्या वेळी जीवाची गर्भस्थापना होते त्या वेळी हा बीजरूपी पिंड म्हणून प्रस्थापित होतो. हा पिंड आपला पूर्वेतिहास घेऊन येत असतो. आपल्या कर्माचे गाठोडे तो बरोबर आणीत असतो. जसे त्याचे कर्म असेल त्याप्रमाणे त्याच्या जीवनात योग येतात, त्याप्रमाणे त्याच्या जीवनात घटना घडू लागतात.

कर्म चांगले असले तर प्रयत्नांना यश येते. सुखा-समाधानाने, समृद्धीने जीवन फुललेले असते. आणि तेच चांगल्या कर्माचा अभाव असला म्हणजे अनंत प्रयत्न करूनही यश येत नाही किंवा अत्यल्प यश पदरी येते. व्याधींनी आणि कष्टांनी जीवन भरलेले असते. जीवनामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. अनेक क्लेशांची आणि दु:खांची मालिकाच जणू आपल्या गळीं पडलेली असते. सुख, समाधान, आनंद हे तर केवळ काल्पनिकच राहते. गतजन्मी मी काय पाप केले होते, असे म्हणत आपण आयुष्य काढतो.

हा खेळ प्राक्तनाचा      की पूर्वजन्मकृतीचा |

 मज ना कळे कशाचा    कुंठीत बुद्धि वाचा ॥

लिहिले न भाळी त्याने वात्सल्य प्रेम विधीने

पण दोष ना कुणाचा    हा भोग संचिताचा ॥

पूर्वसंचित, प्रारब्ध, कर्मदोष हे सर्व काय आहे? अशा प्रकारच्या विचारांच्या भोवर्‍यात माणूस अडकतो. ह्यासाठी जीवावर ह्याचे परिणाम कसे होतात, जीव कसा घडतो, हे पाहू.

 **********************************************************

ज्या वेळी आध्यात्मिक ज्ञानाची अनुभूती येते त्या वेळी असे लक्षात येते, की व्यावहारिक, व्यावसायिक उपजीविकेसाठी मिळालेले ज्ञान हे तुच्छ असून, आध्यात्मिक ज्ञानाची व्याप्ती आणि तृप्ती ही विशाल असून, आगळीवेगळीच आहे.

 **********************************************************


Leave a Reply