नाथपंथ व इतर पंथातील फरक

येथे एक गोष्ट लक्षांत घेणे जरूरीचे आहे की नाथपंथाची स्थापना ही ब्रह्मा, विष्णु व महेश यांची आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे ब्रह्मांडाचे मुख्य घटक आहेत यांनीच ही योजना केली आहे. इतर कोणत्याही पंथाची अशा तर्‍हेची ईेशरी योजना झालेली नाही. अनेक पंथ कार्य करीत असतांना दिसतात परंतु त्यांची निर्मिती हा विश्वनिर्मितीचा एक भाग असे म्हणता येणार नाही. अनेक प्रकारचे निर्माण झालेले पंथ हे त्या त्या उपासना मार्गाचे प्रतिनिधित्त्व करणारा जन समुदायांचा ऐक गट म्हणता येईल. अशा प्रकारच्या पंथांनी त्या त्या मार्गाच्या उपासकांचा व उपास्य देवतेच्या कृपेचा विचार केला आहे.त्या मार्गातल्या लोक कल्याणाचाच त्यांचा विषय आहे. त्यांनी फक्त,आपल्या पंथांच्या आराध्य दैवताचाच विचार केला आहे. नाथ पंथाने, सूर्यमंडल, नक्षत्र तारांगण, पृथ्वी, आप, तेज वायु आकाश या ब्रह्मांडाचा विचार केला आहे. या सर्वांचा प्रत्येकांच्याच जीवनांत कसा संबंध आहे त्याचे परिणाम प्रत्येक देहावर, काय आहेत हे जनसामान्यांपर्यंत पोहचवून त्यांनी काय करावे ह्याचे मार्गदर्शन ह्या पंथाने केले आहे. नाथपंथाचा व्यापक दृष्टिकोन असून पंथ कार्य हे युगातील सर्वच लोकांच्या कल्याणासाठी आहे. जो या पंथाचा शिष्य नाही त्याचा देखील विचार हा पंथ करीत असतो. या पंथाने मनुष्य जातीचा विचार केला आहे. कोणत्याही एका गटाचा वा जातीचा विचार ह्या पंथाचा नाही. या पंथाचा संबंध सृष्टीशी, युगाच्या घटनांशी किंवा युगातील सर्व प्रजेशी, त्यांच्या जीवनमानाशी व दैनंदीन जीवनाशी आहे. सर्वसामान्यतः ईेशरा बद्दलची अनास्था, सत्‌प्रवृत्त माणसाच्या जीवनातील अडसर, सुखी समाधानी जीवनाची दिशा, तसेच कलियुगाच्या दुष्परिणामापासून कसे सावरता येईल या संबंधाचे मार्गदर्शन हा या पंथाचा विषय आहे. धार्मिक, सामाजिक, व्यावहारिक, अध्यात्मिक या सर्वांकश जीवनाशी यापंथाचा सरळ संबंध आहे. माणसाच्या जीवनात जप, तप, अनुष्ठान, हवन आदींच्या माध्यमातून आत्मोन्नती साधणे हा या पंथाचा विषय आहे. राजनिती, शासन वा शासनातर्फे प्रजेचे अनुशासन साधणे हा या पंथाचा विषय नाही, परंतु राजा अगर शासन योग्य वर्तन करीत नसतील, तर नाथांनी त्याची दखल घेतली आहे.

नाथपंथ कसा व कोणी निर्माण केला

भगवान विष्णूने नव-नारायणांना पाचारण केले.ज्या नवनारायणांना पाचारण केले ते म्हणजे कवी, हरी, अंतरीक्ष, प्रबुध्द, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन हे होत. या नवनारायणांनी पुढील प्रमाणे नांवे धारण करून अवतार करण्याची योजना केली होती. कवीनारायणमिच्छन्द्रनाथ, हरी नारायण-गोरक्षनाथ, अंतरिक्ष नारायण-जालिन्दरनाथ, प्रबुध्द नारायण कानिफनाथ, पिप्पलायननारायण-चरपटीनाथ, आविर्होत्रनारायण-वटसिद्धनाथ, द्रुमिल नारायण-भर्तृहरी नाथ, चमस नारायण-रेवणसिध्द नाथ, करभाजन नारायण -करभाजननाथ, अशा प्रकारे हे नवनारायण अवतार घेऊन, नाथपंथाचे कार्य करतील, असे ठरले.

युगाच्या घटनेत कोणताही बदल करता येणे शक्य नाही अशा परिस्थितीत परीणामात जो कांही बदल घडवावयाचा आहे तो देखील सहज साध्य नव्हता. अती कठीण होता. मुळात सृष्टिरचने नंतर कार्याची विभागणी ही तीन भागात झाली आहे उत्पत्ती, स्थिती व लय म्हणजेच सृष्टीची निर्मिती, सृष्टीचे पालन पोषण व सृष्टीचा लय. उत्पत्ती, स्थिती व लयाचे कार्य अनुक्रमे ब्रह्मा विष्णू व महेश हे करणार ब्रह्मदेवाने योजलेल्या युगाच्या निर्मितीच्या घटनेत इतर कोणलाही कोणताही बदल करणे हे त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर होते. म्हणून युगाच्या घटनेच्या परीणामांत बदल करण्यासाठी स्वत: विष्णुलाच मधे पडावे लागले. विष्णुला देखील योग्यत्या शक्तींचा संघटीत विनीयोग करावा लागला आणि म्हणूनच निरनिराळ्या शक्तींच्या अवताराची योजना करावी लागली. या शक्ती कोणत्या व त्या कशा होत्या हे समजून घेणे जरूरीचे आहे. नाथपंथाला अनन्य साधारण महत्त्व कां आले आहे हे देखील यावरून लक्षांत येईल. नाथ पंथाच्या कार्यासाठी ह्या नवनारायणांचीच का निवड केली गेली हे ही लक्षांत घेण्या सारखे आहे. यासाठी एक पूर्वेतिहास लक्षात घेणे जरूरीचे आहे. स्वायंभुव मनूचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता, त्याचा पुत्र आग्नीध्र. आग्नीध्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ मुलगा होता. वासूदेवांचा अंश असणार्‍या ऋषभनी मोक्ष धर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता. या ऋषभाचे शंभर पुत्र होते आणि ते सगळेच्या सगळे वेदांमध्ये पारंगत होते. भरत हा त्यांच्या मध्ये सर्वात थोरला होता. भरत हा नारायणांचा परम भक्त होता. त्याच्याच नावावरुन अलौकीक असा हा हिंदुस्थान देश भारतवर्ष नांवाने प्रसिध्द झाला. भरताने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते राज्य सोडून तो वनात गेला. तिथे त्याने तपश्चर्येने भगवंताची उपासना करुन, केवळ तीन जन्मांमध्ये भगवंतांना प्राप्त करुन घेतले. त्या शंभर पुत्रां पैकी भरता नंतरचे नऊ पुत्र या भारत वर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्याऐंशी पुत्र कर्मकांड करणारे ब्राम्हण झाले असे (भरत धरून) एकूण ९१ झाले.

शंभर पैकी बाकी उरलेल्या भाग्यशाली नऊ जणांनी परिश्रमपुर्वक आत्मविद्या संपादन करुन ते आत्मज्ञानी झाले होते.त्यांची नांवे कवी, हरी, अंतरीक्ष, प्रबुध्द, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस करभाजन अशी होती. हेच ते नऊनारायण होत की ज्यांनी नाथपंथाची स्थापना करून नाथपंथ कार्य केले. नवनाथ भक्तिसार पोथीमध्ये वर्णन करतांना म्हटले आहे की

उद्धावासी बैसवोनि सन्निध | कनकासनीं यादववृंद | तंव ते नवनारायण प्रसिद्ध | प्रविष्ट झाले द्वारके कवि प्रथम हरि दुसरा | अंतरिक्ष तृतीय हो चतुर | महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर | नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन | सहावा आविर्होत्र नारायण | सातवा द्रुमिल आठवा चमस जाण | करभाजन नववा तो ऐसे नवनारायण महाराज | द्वारकेंत पातले सहजासहज | रमापतींचे पाचारणचोज | दृश्य झाले धवळारीं हरीनें पाहातांचि नारायण | सोडिता जाहला सिंहासन | परम गौरविले आलिंगून | कनकासनीं बैसविले सकलवैभवभूषणाकार | मेळवोनि सकळ अर्चासंभार | सारिता झाला सपरिकर | षोडशोपचारें पूजेसी

************************* 

श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ (करवीर) यांचे ग्रंथावलोकन

 २२९९, ‘डीवार्ड, शुक्रवार पेठ, कोल्हापूर. फोन : ०२३१-२५४१४५४

 ज्या गुणांच्या आश्रयाने मन, बुद्धी कर्म करतात, ते गुण प्रकृतीच्या माध्यमातूनच जीवात्म्याला कर्मफल भोगावयास प्रवृत्त करतात. परंतु एखादाच जो कोणी हे जाणतो, की पुरुषकोण ? ‘प्रकृति गुणकाय आहेत ? त्याला याचा प्रभाव बाधत नाही.

 ‘ एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणै: सह | सर्वथा वर्तमानोऽ पि भूयोऽभिजायते २३/१३ गीता.

ह्या त्रिगुणांचाच थोड्या वेगळ्या पद्धतीने श्री. नरेंद्रनाथांनी (लेखकांनी) तर्क व शास्त्र या आधारे एक प्रकरण ‘आपले प्रारब्ध काय आहे ?’ या ग्रंथात सांगून त्यावर मात कशी करावयाची, याबद्दलची काही उपासना व त्यांच्या पद्धतींचाही उहापोह केला आहे. तसे करण्यापूर्वी ‘माणसाचे योग, भोग’ या प्रकरणांत ज्योतिष्य शास्त्रातील उद्बोधक माहितीही सांगितली आहे. कुतुहल म्हणून हे जाणून घेणे योग्यच ठरेल. अर्थात हे विचार विश्व एवढे मोठे आहे, की त्यांचा परिचय एवढ्या छोट्या पुस्तकात श्री. नरेंद्रनाथांनी अत्यंत परिश्रम घेऊन बसवण्याचा प्रयत्न केला आहे, तो स्तुत्य आहे. हा खेळ प्राक्तनाचा की पूर्व संचिताचा या ग्रंथाचे अवलोकन करतांना स्वामिंनी असे म्हटले आहे.

*************************



Leave a Reply