नाथपंथाचे उद्येश काय व नाथपंथाची योजना का ?

हे सर्व जेंव्हा देवांच्या सभेत प्रगट झाले तेंव्हा साहजीकच, विष्णुला, ब्रह्मदेवाला फार मोठा प्रश्न पडला. कृत, त्रेता व द्वापार युगाची घडण चांगली झाली परंतू कलियुग या सर्वांच्या मानाने फारच विचित्र घडले. कलियुगांत ईश्वर भक्तिचा महीमा राहणार नाही सर्वच काही विचित्र घडत राहील सामान्य जीवन हे क्लेशदायक, दु:खदायक व असह्य होईल. सज्जन, सत्प्रवृत्त माणसाला जीवन नको नकोसे होईल.

कलियुगात लोक, काही कवड्यांसाठी सुध्दा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील शुद्र तपस्व्याचा वेष घेऊन दान घेऊ लागतील.आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चासनावर बसून धर्माचा उपदेश करु लागतील. दुष्काळामुळे आणि करांमुळे त्रासलेली कलियुकातील प्रजा नेहमी खिन्न राहील. स्त्रिया स्वैराचारी होतील. देशात चोर, लुटारुंची वाढ होईल. पाखंडी लोक वेदांना नावे ठेवतील. राजे प्रजेचे रक्तशोषण करतील.कली सर्वांनाच स्वच्छंदी करून सोडील, निद्रा, परद्रव्य,परस्त्री ह्यांचा अनीतीने वापर करेल. जगामधील सर्व लोकांमध्ये खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल, ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील.धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल.

म्हणून कलीयुगातील जीवन नियंत्रीत असावे, सामान्य जनजीवनांतील कलीचा प्रभाव कमी करावा यासाठी आवश्यक असणारे कलियुगाचे परिवर्तन करण्यासाठी युगांची ङ्गेररचना होणे शक्य नव्हते म्हणून युगांतर्गत परिवर्तन करण्यासाठी, स्वत: विष्णूने नाथपंथाची योजना केली. ही योजना जर केली नसती तर कलीयुगाचे भयानक परिणाम सामान्य माणूस सहन करू शकला नसता.

नाथ पंथ स्थापनेसाठी नवनारायणांना द्वारकेत बोलाविले

श्री नवनाथ भक्तिसार या पोथी मध्ये पहिल्या अध्यायच्या सुरवातीला, इशस्तवन करून चरित्र गुंफण्यास सुरवात केल्या नंतर नमूद केले आहे की द्वापारयुगाच्या समाप्ती नंतर कलियुगाची सुरवात होणार. कलीयुगांत ईश्वर भक्ती टिकून राहणार नाही. सज्जन, सत्प्रवृत्त लोकांना जीवनात फार हाल-अपेष्टा भोगाव्या लागतील अनीती, हिंसाचार, भ्रष्टाचार हेच दैनंदीन जीवनमान होईल याला आवर घालण्याच्या दृष्टीने श्रीकृष्णचा अवतार घेतलेल्या श्रीविष्णुने नवनारायणांना द्वारकेत बोलाविले, त्याची पार्श्व भूमी अशी आहे.

हरीचा गौरव पाहोन | बोलते झाले नारायण | कवण अर्थीं पाचारण | आम्हांसी केलें श्रीरंगा 34॥ हरि म्हणे जी महाराजा | कीं मनीं काम वेधला माझ्या | कलींत अवतार घेणें ओजा | तुम्ही आम्ही चलावें 35॥ जैसे समुच्चयें एकमेळीं | राजहंस जाती उदरधिजळीं | तेवीं तुम्हीं कृपाकल्लोळीं | अवतादीक्षा मिरवावी 36॥ येरू म्हणती जनार्दना | अवतार घ्यावा कवणे स्थाना | कवण नामीं कवण लक्षणा | जगामाजी मिरवावें 37॥ यावरी बोले द्वारकाधीश | कवि नारायण जो कां प्रत्यक्ष | तेणें मच्छिंद्र होऊनि दक्ष | जगामाजी मिरवावें 38॥ यावरी हरि जो महादक्ष | तो तंव शिष्य होऊनि प्रत्यक्ष | महाराज नामें तो गोरक्ष | जगामाजी मिरविजे 39॥ यापरी अंतरिक्ष नारायण नाम | तो जालिंदर मिरविजे प्रकाम | तयाचा शिष्य भक्तिद्रुम | प्रबुद्ध नामें कानिफा 40॥ यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम | मिरविजे जगीं चरपटी नाम | आविर्होत्र जो योगद्रुम | मिरविजे जगीं नामें नागेश 41॥ यापरी द्रुमिल अतिसमथर्ं| जगीं मिरविजे भरतनाथ | आणि चमस नारायण जगीं विख्यात | रेवणनामें मिरविजे 42॥ नववा जो करभाजन | तो गहिनी ऐसें मिरविजे नाम | ऐसे अवतार महीकारण | दीक्षेप्रति मिरवावे 43॥ म्हणाल एकटपणीं वास | करणें सांगतां आम्हा कलीस | तरी तुम्हांसवे अवतारास | बहुत येतील महाराजा 44॥ प्रत्यक्ष कवि वाल्मीक सुरस | तो पुढें होईल तुलसीदास | आणि शुक महाराज जो ब्रह्मभास | कबीर भक्त होईल तो 45॥ यापरी जो व्यास मुनी | तो जयदेव होईल महाप्राज्ञी | आणि उद्धव माझा प्राणाहुनी | आवडता होईल नामा तो 46॥ आणि भक्तिप्रौढीं जांबुवंत | तो नरहरि होईल नितांत | प्रत्यक्ष जो बलराम भ्रात | पुंडलीक होईल तो 47॥ मीही प्रत्यक्ष जन्मोन | ज्ञानदेव नामें मिरवीन | आणि धवलारी जो पंचानन | निवृत्तिनाथ होईल कीं 48॥ आणि सत्यनाथ चतुरानन | तो स्वनामीं मिरवीन सोपान | जी योगमाया मानसमोहन | ती मुक्ताबाई विराजेल 49॥ यापरी प्राज्ञिक हनुमंत | तो रामदास होईल महाभक्त | आणि कुब्जा दासी मातें रमत | जनी जनांत होईल कीं 50॥ असो ऐसें समुच्चयेंकरोन | कलींत वाढवावें भक्तिमाहात्म्य जाण | मग अवश्य म्हणोनि नारायण | पुढें बोलत प्रश्नातें 51॥

पुढे दुसर्‍या अध्ययात ओवी क्रमांक ५३ ते ५५ मध्ये एक स्वतंत्र पंथस्थापन करण्यास आदिशक्तिने शंकराने,म्हणजेच आदिनाथांनी भगवान दत्तात्रेयाकरवी मच्छिंद्रनाथांना सांगितले.त्या प्रमाणे मच्छिंद्रनाथांनी नाथपंथाची स्थापना करून कार्याचा पुढील भाग सुरू केला.

शिवें पाहूनि मंददेहीं | म्हणे हा पूर्वी नारायण कवी | मग प्रेमसरितेच्या लोटप्रवाहीं | धरिला हृदयीं तत्काळ 44॥ मग त्रिवर्ग येऊनि त्या स्थानीं | दत्तासी म्हणे पंचमूर्धनी | या शिष्यातें अभ्यासोनी | सकळ सिद्धी मिरवीं कां 45॥ जें वेदकारणाचें निजसार | जें सर्वोपकाराचें गुहागर | सकळ सिद्धींचे अर्थमाहेर | निवेदीं तूं महाराजा 46॥ जारण मारण उच्चाटण | शापादपि निवारण | शरादपि अस्त्रादिनिबर्हण | मंत्रशक्ती त्या वरत्या 47॥ जो जैसा कर्मबिजे पाठ | होती दैवतें वरती भेट | वंशवरद वाक्पट | मस्तकीं स्थापोनि जाताती 48॥ वरुण आदित्य सोमस्वामी | भौमशक्रादि यमदमी | शिवशक्ती कामतरणी | वर देऊनि उठविले 49॥ विष्णु विरिंची कृपाकृती | वरदबीजे देऊनि शक्ती | ते मंत्रअस्त्रे अपारगती | हृदयामाजी हेलावला 50॥ असो सद्विद्येचा मंदराचळ | उभवोनियां अत्रिबाळ | क्षणमात्र वेंचूनि केला सबळ | सिद्धतरणी जेउता 51॥ नागबकादि वातास्त्र | नग-नागादि महावज्र | पावक जलधी अस्त्र पवित्र | सांगोपांग तो झाला 52॥ ऐसें सांगोनि सांगोपांग | जाता झाला योगमार्ग | परी सांप्रदाय योजूनि योग | कानफाडी मिरवला 53॥ पुढील भविष्य जाणोन | सांप्रदाय केला निर्माण | षडरूप जोगीदर्शन | कानफाडी मिरवले 54॥ नाथ ऐसें देऊनि नाम | शिंगी शैली देऊनि भूषण | ऐसें परिकरोनि प्रमाण | अत्रिनंदन पैं गेला 55॥ यापरी तों मच्छिंद्रनाथ | नमोनि निघाला आदिनाथ | महीवरी नाना तीर्थें | शोध करीत चालिला 56॥ तों भ्रमण करितां सप्तश्रृंगी | येता झाला महायोगी | अंबिका वंदोनि मनोमार्गीं | सप्रेम स्थितीं गौरविली 57॥ करीत वैखरीं अंबास्तवन | तों आले कल्पने मन | कीं कांहीं तरी कवित्वसाधन | लोकांमाजी मिरवावें 58॥ कवित्व तरी करावे ऐसें | कीं उपयोगी पडे सर्व जगास | मग योजोनियां शाबरीविद्येस | मनामाजी ठसविली 59॥

अशा तर्‍हेने नवनारायणांना, कवी वाल्मिक-तुलसीदास म्हणून, शुक महाराज-कबीर म्हणून, व्यास मुनी-जयदेव म्हणून, उद्धव -नामा म्हणून, जांबुवंत-नरहरि म्हणून, मीही म्हणजे प्रत्यक्ष विष्णू-ज्ञानदेव म्हणून, धवलारी जो पंचानन-निवृत्तिनाथ म्हणून, सत्यनाथ चतुरानन -सोपान म्हणून, योगमाया मानसमोहनमुक्ताबाई म्हणून व हनुमंत-रामदास म्हणून असे सर्वच ह्या पृथ्वीवर अवतरून भगवत्भक्ती वाढविण्याचे कार्य करू. अशा प्रमाणे सर्व विभूतिंना बोलावून कलियुगांत भक्ती महात्म्य वाढविण्याची योजना केली. एक नवीन पंथाची, नाथपंथाची, स्थापना करून भारत भूमिवर कार्य करण्यास सुरवात केली.


Leave a Reply