नवनारायण कोण होते त्यांचा परिचय काय? नवनारायणांची पार्श्वभूमीका काय होती

नवनारायण कोण होते त्यांचा परिचय काय व त्यांचे वैशिष्ट्य काय आणि पंथ कार्यासाठी त्यांचीच निवड कां करण्यात आली हे समजून घेणे अवश्यक आहे.

हे व्यक्त-अव्यक्त जग, सृष्टी भगवद्रुप कशी आहे याची आत्मानुभुती घेऊन संपूर्ण सृष्टी वरील चेतन व अचेतन शक्ती आणि आपण सारे हे एकच आहोत, ब्रह्मांड आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव सतत घेत असणारे नवनारायण, पृथ्वीवर अखंड विहार करीत होते. ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहत असत ते नऊही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकासारखे तळपत होते. ते भगवंताचे परमभक्त असून सुर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्रिभूवनातील आध्यात्मिक सामर्थ्य संपन्न अधिकारी संत्‌पुरुषांना ते आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत. मनात येईल तिकडे त्रिभुवनात, ते तात्काळ जात असत. देवता, सिध्द, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य किन्नर, नाग, मुनी, चारण, भुतनाथ, विद्याधर, ब्राम्हण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात. सर्वजण जीवनमुक्तच होते.

एकदा, ते नऊनारायण, या अजनाभ वर्षात, महात्मा निमीकडे त्यांच्याच स्वेच्छेने आले होते. त्यावेळी तेथे ऋषींच्या द्वारा यज्ञ सुरू होता. त्यांना अचानक आलेले पाहून यजमान निमी, अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजणच त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. विदेह राजा देखील त्यावेळी तेथेच होता. त्यांना ओळखून विदेह राजाने त्यांचा यथायोग्य सन्मान करून, त्यांना आसनावर बसविले आणि प्रेमाने त्यांची विधिपुर्वक पूजा केली. विदेह राजा बहुलोश हा अतीशय बुध्दिमान होता. तो श्रीकृष्णाचा परम भक्त होता. त्याची भक्ति लक्षांत घेवून भगवान श्रीकृष्ण त्याच्या भेटी साठी विदेह देशाकडे स्वतःहून गेले होते. आपल्या अनन्य भक्तांपेक्षा, बलराम, लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव यांच्या पेक्षा देखील विदेह राजावर कृष्णाचे प्रेम जास्त होते असे भागवताच्या १०व्या स्कधातल्या ३२ व्या सूत्रात म्हटले आहे.

हा विदेह राजा, विनम्रतेने मस्तक लववून, अतिशय प्रेमाने त्यांच्याशी बोलु लागला की, आपण नऊ नारायण, हे मधुसुदन भगवंतांचे पार्शदच आहात.कारण भगवंताचे भक्त, लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. जीवनामध्ये मनुष्य शरीर प्राप्त होणे, हे अतिशय कठीण आहे, शिवाय ते क्षणभंगुर देखील आहे. अशा या मनुष्य देहाला जीवनांत, भगवंताच्या प्रिय भक्तजनांचे दर्शन आणखीच दुर्लभ आहे. म्हणून हे त्रिलोकपावन महात्म्यांनो, आम्ही आपणांस, आमच्या परम कल्याणा संबंधी आपल्या मार्गदर्शनाचे अभिलाशी आहोत. मनुष्य जीवनांत आपल्या बरोबर झालेला,अर्ध्याक्षणाचा सत्संग हा देखील आयुुष्याचा फार मोठा ठेवा आहे.

या नंतर विदेहराजा व नऊनारायण यांच्यात बराच संवाद झाला.त्यावरून प्रत्येक नारायणांचे वैशिष्ट्य व त्यांची ओळख लक्षात येते. हे नवनारायण मूलतः कसे होते हे लक्षात आले म्हणजे त्यांनी नाथपंथाचे केलेले कार्य समजणे सोपे जाईल. प्रत्येकाचे गुण वैशिाष्ट्य हे प्रत्येकाच्या अवताराचे वेळी लक्षांत घेऊ.

ब्रह्मांडाशी त्यांच नात कस होत हे आपण पाहिलच आहे ब्रह्मांडावर त्याच प्रभुत्व कस होत हे आपण पाहू. त्यापूर्वी ब्रह्मांडा विषयी आपण विचार करू

विश्व हे हिंदु तत्त्वावर चालते

संपूर्ण विश्व, ब्रह्मांड हे विशिष्ट तत्त्वांवर चालते. ब्रह्माण्डाचे व्यवहार ही एक तत्त्वप्रणाली आहे. सर्व तत्त्वे एका विशिष्ट धर्मासाठी किंवा तो धर्म पाळणार्‍यांसाठी आहेत हा समज करणे पूर्णत: चुकीचे होईल. ही तत्त्वप्रणाली सर्वव्यापक आहे. ब्रह्मांडातील सर्वांनाच ती लागू आहे. ही कुणा एका जातीची, जमातीची किंवा विशिष्ट गटाची वा विचार सरणीच्या लोकांची नाही. ही धर्मनिरपेक्ष आहे. कोणत्याही एका धर्माची नाही. त्यावर कुणा एकाचा स्वामित्वाचा अधिकार नाही. सूर्य, चंद्र, नक्षत्रे, तारांगण, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश, हे ब्रह्माण्ड हे संपूर्ण मानवजातीचे आहे. यावर केवळ हिंदूंचाच अधिकार आहे, इतरांचा नाही हा समज करणे पूर्णत: चुकीचे आहे. तसेच हे केवळ हिंदुतत्त्वज्ञान आहे असाही समज करणे चुकीचे आहे. डॉक्टर कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोण आहे ह्याच्यावर रोगी बरा होत नाही तर डॉक्टरांनी केलेल्या परीक्षणांवर, विश्‍लेषणांवर, तपासणीवर, तात्त्विक परीक्षणांवर, आदि अनेक गोष्टींवर अवलंबून असलेल्या औषधेापचारांवर रोगी बरा होतो. हे जसे आहे तसेच ब्रह्माण्डामध्ये आहे. हे ब्रह्माण्डाचे विश्लेषण, तात्त्विक परीक्षण व अनेक तर्‍हेचा अभ्यास केल्यावर समजू शकेल.

नवनाथांचे ब्रम्हांडावर प्रभुत्व

नवनाथांचे ब्रह्माण्डावर प्रभुत्त्व कसे होते हे समजून घेण्यापूर्वी ब्रह्माण्ड म्हणजे तरी काय? हे समजून घेणे आवश्यक आहे. ब्रह्माण्डाची व्याख्या करणे सोपे नसले तरी समजण्यासाठी असे सांगता येईल की जे अनेक जीवांची तसेच निर्जीवाची उत्पत्ती करते, जे आहे आणि जे नाही पण प्रेतात्मा जे दिसते आणि जे दिसत नाही, पण जे आहे. जे अनेक जीवांची निर्मिती, पालन पोषण करुन त्याचा विकास करते आणि जे त्याच्यावर योग्य संस्कार करुन त्याला तत्त्वरुपाने शिल्लक ठेवते आणि त्याचा संहार पण करते. संपूर्ण ब्रह्माण्डात होणार्‍या स्थित्यंतरांचा परिणाम हा ब्रह्माण्डातील प्रत्येक गोष्टींवर होत असतो. मग ती सजीव असेल किंवा निर्जीव असेल, जे निर्गुणनिराकार असेल, अस्तित्त्वात असेल अगर नसेलही, आपल्या दृष्टिक्षेपात असेल अगर नसेल, आपण स्पर्श करू शकू अगर केवळ भासमान असेल. चराचर असेल. त्याच्या वलयाच्या कक्षेत असू अगर त्या अदृष्य शक्तिंच्या खूप दूरअसू. ब्रह्मांड हे केवळअतर्क्य आहे व सर्वव्याप्त असून सर्वातीत आहे. ब्रह्मांडातील अती सूक्ष्म बदलाचा परिणाम हा पूर्ण ब्रह्मांडावर होते.

पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचमहाभुते म्हणजे ब्रह्मांड नव्हे. सृष्टी, पंचमहाभुते, नाशवंत आहे तर ब्रह्मांड हे अविनाशी आहे. ब्रह्मांड हे केवळ निर्मळ, शुद्ध गुणातीत आहे. साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे, त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत.मनाचे कष्ट मात्र लागतात. नवनारायण हे ह्या ब्रह्मांडाशी पूर्णतः एकरूप झालेले असतात. ते सदैव त्याच तत्त्वानी राहत असतात. त्यामुळे ज्या नवनारायणांनी नवनाथ म्हणून नाथपंथाचे कार्य केले ते आणि अखील ब्रह्मांड हे एकरूपच होते आणि ते त्याच तत्त्वांनी सदैव राहत असत. मनांत येईल त्याप्रमाणे ब्रह्मांडात ते पाहिजे तेथे तात्काळ जात असत. देवता, सिध्द, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य किन्नर, नाग, मुनी, चारण, भुतनाथ, विद्याधर, ब्राम्हण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात. सर्वजण जीवनमुक्तच होते.

नारद म्हणतात असे हे नवनारायण आणि ब्रह्माण्ड एकरूप असतांना त्यांचे प्रभुत्त्व हे ब्रह्माण्डावर राहणार यात विशेष ते काय? नवनारायणांचे हे व्यक्तिमत्त्व स्वतः त्यांच्याच तोंडूनऐकून मिथीला नरेश संतुष्ट झाला. त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयंती पुत्रांची पुजा केली. यानंतर सर्वांच्या देखतच ते सिध्द नवनारायण अंतर्धान पावले. निमीने त्यांच्या कडून ऐकलेल्या भागवत धर्माचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करुन घेतली. भागवत धर्माचे जर श्रध्देने आचरण केले तर शेवटी सर्व आसक्ती पासून मुक्त होऊन भगवंताचे परमपद प्राप्त करुन घेता येईल, असे नारदमुनींनी म्हटले आहे.

नवनाथ भक्तिसार या पोथी मध्ये नवनारायणांनी नवनाथ म्हणून कार्य कसे केले याचे सुंदर वर्णन केलेले आहे. नवनाथांच्या कार्याचा विचार केला तर प्रथम मनामध्ये असेच येते की काहीतरी तंत्रविद्या, काहीतरी यंत्रविद्या, काहीतरी अद्भूत अघटीत, अतर्क्य असे घडत होते. जे कांही घडत होते त्याला कोणते विज्ञान आहे हे लक्षांत येत नाही. नुसत्या विभूतीच्या माध्यमातून, जय मच्छिंदर म्हणून एखादी अघटित गोष्ट घडणे, भूतप्रेत पिशाश्च, देवदेवता यांना वश करून आपले कार्य करून घेणे वगैरे कसे घडत होते हे आपण पाहू. त्यांचे कार्य त्यांनी कसे केले व आज हे कार्य कसे घडत आहे हे देखील आपण पाहू.

नवनाथांनी केलेल्या कार्याचे विश्‍लेषण करतांना त्यांनी केलेले कार्याचे वर्णन तर ते इतरत्र जसे केले तसेच असणार परंतु त्यांचे उद्येश, कार्यप्रणाली परीणाम व त्यातील बारकाव्यांचा उल्लेख तसेच आज मितीला चालू असलेले कार्य यांचा उहापोह केला आहे. आजही हे कार्य कसे चालू आहे याचे वर्णन आपल्याला येथे वाचावयास मिळेल. येथे कोणतेही संशोधनात्मक कार्य केले नाही किंवा नाथपंथाचे इतरत्र असलेल्या ठिकाणांचा अभ्यास करून, त्यांचा उल्लेख वा आढावा घेतलेला नाही. तो या लिखाणाचा उद्देशच नाही, परंतु एका नाथपंथाच्या परंपरेला धरून नवनाथांनी केलेल्या कार्य प्रणाली समजविण्याचा प्रयत्न केला आहे. नवनाथ काय होते, ते काय करू शकत होते वगैरे गोष्टींचा उहापोह येथे केला आहे.

*****

विष्णूच्या नाभीतून प्रगट झालेल्या कमळा मध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाकडे सृष्टीरचनेचे कार्य विष्णूने दिल्यावर, ब्रह्मदेवाने चारयुगांची योजना केली. कृत, त्रेता, द्वापार व कलियुग असे चार युग झाले. ही चार युगे ब्रह्मदेवाने निर्माण केली आहेत. ही सर्व युगे ही केवळ भारत भूमीसाठीच नसून, ती संपूर्ण सृष्टीसाठी आहेत. हिंदू धर्म हा केवळ भारतातच आहे. हिंदु तत्त्वज्ञान, हे हिंदूचे आहे, भारतीयांचेच आहे म्हणून ते केवळ भारतीयांनाच लागू पडेल अन्य कुणालाही नाही हा समज करून घेणे चुकीचे ठरेल.


Leave a Reply