कलीयुगांत ईश्वर भक्ती टिकून राहणार नाही. सज्जन,सत्प्रवृत्त लोकांना जीवनात फार हाल-अपेष्टा भोगाव्या लागतील अनिती, हिंसाचार, भ्रष्टाचार हेच दैनंदीन जीवनमान होईल याला आवर घालण्याच्या दृष्टीने श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतलेल्या श्रीविष्णुने नाथपंथाची योजना केली.नाथपंथाची सुरवात मच्छिंद्रनाथांपासून झाली. मच्छिंद्रनाथांच्या जन्माची कहाणी खर तर आजच्या युगाला न पटणारी आहे. तसे तर सर्व नाथांच्या जन्माची कहाणी ही अघटीत व अवास्तवीक वाटणारीच आहे. सर्वच नाथांचे जन्म हे विशेष स्वरूपाचेच आहेत. स्त्री-पुरूषांच्या संबंधा शिवाय म्हणजे, अयोनी संबंधातून मनुष्यजन्म ही तर केवळ अतिरंजीत कल्पनाच वाटते, परंतु त्या सर्व सत्यकथा आहेत. हेच तर नाथपंथाच विशेष आहे. आजच्या युगांत देखील, पंथाच्या विभूतीकरवी, अनेक प्रकारच्या अद्भूत गोष्टी घडत आहेत.
मच्छिंद्रनाथ म्हणाले जगातले अज्ञान नाहीसे करण्यासाठी आम्ही अवतार घेतला आहे. हे अवतारी कार्य जगा वेगळेच आहे. तसतर सर्वच नाथांचेव्यक्तिमत्त्व हे अतीशय तपस्वी, तेजस्वी व प्रखर आहे. ब्रह्मांडाच्या तत्त्वांमध्ये परिवर्तन हे शक्य नाही परंतु प्रत्येक नाथ हे ब्रह्मांडाच्यातत्त्वामध्ये सहजतेने परिवर्तन करणारे आहेत. हे सर्व अवतारी सत्पुरूष आज देखील अदृष्य स्वरूपाने भाविकांना, भक्तांना सहाय्य करीत असतात. या सर्व नाथांपैकी गोरक्षनाथ हे अत्यंत प्रखर तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. ते आज देखील कार्यरत आहेत. गोरक्षनाथाचा या नाथ भक्तिसार ग्रंथाबद्दलचा असा अभिप्राय आहे की, ‘‘याला जो कोणी असत्य मानेल किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात जाईल.’’ गोरक्षनाथ आज जरी आपल्याला दिसत नसले तरी गोरक्षमंत्र गोरक्षवाणी, आज देखील तेवढीच प्रभावी आहे.
गोरक्ष बोलतो वाचेकरून | त्यातें असत्यमानतील जन | जो निंदक यातें दावील निंदून | तो अधिकारी विघ्नांचा ॥82॥ इहलोकीं परलोकीं | राहणारनाही परम सुखी | निर्वंश पावोनी शेवटी वंशी | पिचेल ग्रंथ निंदिता हा ॥83॥ अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार | आहे गोरक्षाचा किमयागार | परी पालटोनी भाषांतर | महाराष्ट्र अक्षरीं रेखिला ॥84॥ म्हणोन श्रोते हो भाविकजन | सोडोनि द्या कीं निंदावचन | विश्वासपर स्वार होऊन | मोक्ष मुक्काम करी कीं ॥85॥ तरी हा ग्रंथ संग्रह करून | चमत्कार पहावा पठण करून | हे चाळीसप्रसंग मंत्रनिर्वाण | महासिद्धीचे असती कीं ॥86॥ हे चाळीस मंत्र परोपकारी | आहेत दुःखाची करतील बोहरी (नाश) |तरी संग्रह करूनी उगलेची घरीं | ठेवा विेशास धरूनीयां ॥87॥ ह्या चाळीस अध्ययांत मंत्रयंत्र | सुखकारक असती अति पवित्र | दु:खदरिद्रहरण सर्वत्र | गोरक्षाने निर्मीले ॥88॥ पठण करता षण्मासमिती | जो अध्याय ज्या कार्याप्रती | ते कार्य होईल निःसंशय चित्तीं | पठण करून पहावें ॥89॥ याउपरी वाचता न ये जरी | तरी संग्रह करून ठेवावा घरीं | नित्य वंदिता नमस्कारी | कार्य त्यातचि घडेल ॥90॥ ऐक कुसुम झोंकून वरती | चला म्हणावे मम कार्याप्रती | नवनाथ वंदूनि उक्ति नमस्कार करावा॥91 ॥ ऐसा याचाआहे मार्ग | करूनि पहावा चमत्कार चांग | नवनाथ ओडवोनी (स्वतः जातीने)अंग | कार्य तुमचे करतील कीं ॥ 92॥
या सर्व गोष्टींचा विचार केला तर नाथ बोधामृत हा ग्रंथ शुद्ध मनाने वाचावा. एवढेच सांगता येईल. ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्यांचे मनन करीत रहावे म्हणजे मनांतील संभ्रम हळू हळू नष्ट होतील. वारंवार वाचनाने मनातील संभ्रम नष्ट होतील. नाथ भक्तिसार या पोथीच्या नियमबद्ध वाचनाने विलक्षण अनुभव येतील.
प्रत्येक नवनाथांचे अनेक शिष्य होवून गेले. आज हा पंथ फक्त नऊ नारायणांपर्यंतच सिमीत राहिलेला नाही. नवनाथांच्या प्रत्येकाच्या शाखा उपशाखा निर्माण झालेल्या आहेत.भारतांत सर्वत्र कार्य कारणार्या सर्व नाथ पंथीयांचा शोध येथे घेतला नाही. ज्या शाखेची माहिती वा परंपरा आपल्याला हवी असेल त्याचा आपण स्वतंत्रपणे शोध घ्यावा. चित्रकूटच्या माधवनाथांना लाभलेल्या परंपरेचा येथे प्रामुख्याने विचार केला आहे.नवनाथांची शिष्य परंपरा शेवटी दिली आहे. नवनाथांचे चरित्र जे नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये, मालु कवी विरचित पोथिच्या स्वरूपात वर्णन केले आहे ते ह्या नवनाथ बोधामृत ग्रंथासाठी आधारभूत मानले आहे.
आमची नाथ परंपरा
१. चैतन्य श्री आदिनाथ ९. चैतन्य श्री गुप्तनाथ
२. चैतन्य भगवान दत्तात्रेय १०. चैतन्य श्री परमहंसजी
३. चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ ११. चैतन्य श्री ब्रम्हानंद
४. चैतन्य श्री गोरक्षनाथ १२. चैतन्य श्री परमानंद
५. चैतन्य श्री गहनीनाथ १३ चैतन्य श्री काशीनाथ
६. चैतन्य श्री निवृत्तीनाथ १४. चैतन्य श्री विठ्ठलनाथ
७. चैतन्य श्री ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर महाराज) १५. चैतन्य श्री विश्वनाथ
८. चैतन्य श्री सत्यमलनाथ
१६. चैतन्य श्री माधवनाथ (१८५६ ते १९३६ )
१७. चैतन्य श्री व्यंकटनाथ (१९०४ ते १९९३ )
१९९३ च्या महाशिवरात्रीला श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथमहाराजांनी समाधी घेतली.त्या नंतर, त्यांच्याचआज्ञेवरून, श्री समर्थ सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज, हे गुरूकार्य पुढे वाढवीत आहेत. नाथ शक्तीपीठ ह्या नावाने हे कार्य गेल्या १८ वर्षा पासून न्यूतापडीया नगर खरप रोड,अकोला ४४००१ येथून सुरू आहे.