नवनाथांचे कार्य

नवनाथ भक्तिसार ह्या प्रासादिक पोथीच्या पहिल्या अध्यायात नाथपंथाचा उद्देश,तो कां व कसा निर्माण झाला, विष्णूने, नवनारायणांना बोलावून पंथ कार्य करण्यास सांगितले, कोणी कोणी, कोठे कोठे व कसा अवतार घ्यायचा वगैरे सर्व गोष्टिंचा उहापोह केला आहे. ह्या बद्दलचे सविस्तर विवेचन आपण ह्या पुस्तकाच्या योग्य त्या ठिकाणी केले आहे.

हा संपूर्ण ग्रंथ वाचण्यापूर्वी हे लक्षांत ठेवणे जरूर आहे की सर्व नवनाथ हे अवतारी पुरूष होते. अयोनी संबंधातून ते जन्माला आले होते, प्रत्यक्ष जीवनांत ते सामान्य माणसां प्रमाणेच वावरत असत राहत असत. त्यांचे सर्व व्यवहार, सकृत दर्शनी, हे आपल्या सारख्या सामान्य माणसां सारखेच होते. त्यांना कोणत्याही तर्हेचे प्राथमिक शिक्षण घेण्याची जरूरी नव्हती किंवा आपले लहानमूल जसे आपण वाढवितो वा आपण त्याला विविध प्रकारांनी घडवितो, त्या प्रमाणे या नवनाथांना घडविण्याची गरजच नव्हती. तपश्चर्येनी गुरू कृपेने त्यांना त्यांच्या पूर्व जन्मीचे सर्व ज्ञान होत असे

आता आपण त्या पोथीत वर्णन केलेल्या घटनांचा उहापोह करू.

निरनिराळ्या नारायणांनी आपला अवतार हा, अग्नीच्या गर्भा पासून, ब्रह्मदेवाच्या वीर्या पासून, सूर्याच्या वीर्यापासून घेतला,असा उल्लेख नवनाथांच्या कथानकांतून,नवनाथांच्या पोथीतून केला आहे. या ठिकाणी अनेक प्रश्न मनामध्ये उपस्थित होतात.आपण मानवी वीर्य लक्षांत घेवून सर्व कल्पना करतो. मुळांत मानवी वीर्य आणि ब्रह्मवीर्य ह्यातच फरक आहे. मानवी वीर्य हे क्षणभंगूर आहे. शास्त्रीय दृष्ट्या मानवी वीर्याचे स्खलन होता होताच ते नाश पावू लागते. हे बाह्य वातावरणात तर टिकतच नाही. उघड्यावर पडलेले हे वीर्य कोणतीही गर्भधारणा करूच शकत नाही. तसेच शास्त्रीय दृष्ट्या मानवी वीर्यापासून होणारी गर्भधारणा ही केवळ योनी मार्गानेच फलद्रुप होवू शकते. स्त्री बीजाशिवाय नवीन जीव घडवणे हे केवळ अशक्य आहे.मानवाच्या बाबतीत मुखावाटे वा योनी शिवाय इतर कोणत्याही मार्गाने गर्भधारणेचा संभवच नाही. ब्रह्मवीर्याचे तसे नाही हे नवनाथांच्या पुढील विविध कथानकांवरून स्पष्ट होईल.

मानवी वीर्या मुळे उत्पन्न होणार्‍या जीवामध्ये, शरीरामध्ये अनेकविध दोष येतात, जसे कृश शरीर, रोगीट शरीर, विविध रोगांपासून शरीर यातना आदी. शिवाय अशा शरीरामध्ये गर्भधारण करणार्‍या बीजाचे पिंडदोष देखील असतात, जसे अल्पायुषी जीव, प्रवृत्ती-प्रकृती दोष आदी. मानवी जीव, शरीर हे आध्यात्यिक दृष्टीने अज्ञानात, अनभिज्ञ व पूर्ण आसक्त असून ते काम क्रोध, मद, मोह व मत्सराने पूर्णतःलिप्त असते.स्वकल्याणार्थ वा केवळ स्वार्थासाठी जगणे हे त्या जीवाचे ध्येय असते.मानवी वीर्याचे बीज वा मूळ हे मानवी बीजच आहे.घराण्यातील परंपरेनुसार त्यात विविध प्रकारचे गुणदोष केवळ जन्मानेच येतात.मानवी बीजाचा स्त्री बीजाशी येणार्‍या संबंधावर निर्माण होणार्‍या जीवाची प्रत,त्याचे गुण दोष अवलंबून असतात.सपुर्ण ब्रह्मांडाचा,पंचमहाभूतांचा प्रत्येक मानवी जीवनांवर कसा परिणाम होतो, हे हा खेळ प्राक्तनाचा की पूर्व संचिताचा, ह्या प्रस्तूत लेखकाच्या पुस्तकांतून खुलासेवार सागितला आहे.

ब्रह्मबीजाला असल्या कोणत्याहि मर्यादा नाहीत, तसेच त्याला काल मर्यादेचे देखील बंधने नाहीत,तसेच मानवी जीवना संबंधीची बंधन वगैरे नसतात.सामान्य मानवाची जी स्थिती असते,जे निकष मानवी शरीरांना, प्रकृतीला लागू पडतात ते सर्व तसेच्या तसे ब्रह्मबीजाला लागु पडत नाहीत. ब्रह्मबीज हे स्वयंसिध्द असते. जीवनिर्मीती साठी अन्य कोणतीच वा कोणाचीच गरज त्याला नसते. ईश्वरी संकेता नुसारच ते कार्य करते. प्रजोत्पादनासाठी त्याला स्त्री बीजाची तसेच स्त्री गर्भाची गरजच नसते. ब्रह्मबीजाने जन्माला येणारा जीव हा अघटित ईेशरी अवतारी कार्य करून जातो. मानवी शरीरात दृष्टोत्पत्तीस येणारे दोष त्यात नसतात. परंतु तो इतर मानवी शरीरासारखाच हाडा-मासाचाच असतो. ब्रह्मबीजाचा हवा तसा उपयोग वा त्याच्यातील स्थित्यंतर हे ईेशरी अवतारच करू शकतात. ब्रह्मबीजाची ओळख ही मानवी जीवाच्या आकलना बाहेर आहे .

मच्छिंद्रनाथ म्हणजे मूळचे कवी नारायण होते. मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेण्यापूर्वी ते काय होते, कोणत्या गुण वैशिष्ट्यांचे होते, ते काय करीत होते, हे आपण प्रथम पाहू.


Leave a Reply