☼ ज्योतिषशास्त्र कसे मदत करू शकेल ? ☼

ज्योतिषशास्त्राचा विचार करताना ह्या शास्त्राशी संबंधित असलेले सूर्यमंडळ, नवग्रह, नक्षत्र, जन्मपत्रिकेचे तत्त्व आदी सर्व लक्षात घ्यावे लागेल. प्रथम आपण सूर्यमंडळाचा विचार करू.

१. सूर्यमंडलाचा आणि नक्षत्र-तारांगणाचा खेळ -

आकाशातील सूर्यमंडळ, ग्रह, नक्षत्र, तारांगण, तारे हे सतत भ्रमण करीत असतात.

मुलाचा जन्म झाल्यावर जन्मपत्रिकेत नवग्रह कोणत्या ठिकाणी कोणत्या घरात आहेत, हे त्यावरून काढतात. जन्मपत्रिका ही विशिष्ट आखणीची असते. त्यात एकूण १२ घरे असतात. प्रत्येक घराला एक एक राशी, अशा एकूण १२ राशी आहेत. प्रत्येक राशीचा क्रमवार ठरलेला आहे. त्यामुळे त्या त्या १ ते १२ आकड्यांवरून कोणत्या आकड्यांचे म्हणजेच कोणत्या राशीचे  ते घर आहे हे समजते. ज्याप्रमाणे पत्रिकेत जन्मराशी दिसतात त्याप्रमाणे पंचमहाभूतांत त्या प्रत्यक्षपणे दिसतात. पंचमहाभूतांतील आकाशतत्त्वात म्हणजे आकाशात ह्या १२ राशींचे नक्षत्र आणि तारांगणांनी झालेले राशिचित्र आकाशात प्रत्यक्षपणे दिसते.

मातेच्या उदरात प्रस्थापित झालेला गर्भ हळूहळू विकसित होऊन त्याची वाढ झाली की तो जन्म घेतो. ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी तो जन्माला येतो, ती त्याची जन्मवेळ, जन्मस्थान, जन्मदिवस व तारीख असे आपण नोंदवून ठेवतो. त्याच्या तपशिलावरून ज्योतिषी ह्या बालकाची जन्मपत्रिका तयार करतात.

त्याची जन्मपत्रिका ही जरी आताच्या घटनेवरून तयार केलेली असली तरी ती जन्मदिवशी असलेली ग्रहस्थिती नोंदविते. ही त्याची ग्रहस्थिती जोपर्यंत त्याचे सद्यजीवन आहे तोपर्यंत असते. ह्या त्याच्या जन्मपत्रिकेवरून त्याच्या सद्यजीवनाचा, तसेच मागील जन्माच्या त्याच्या कर्माच्या स्थितीचा उलगडा होत असतो.

ब्रह्मांडाच्या सप्तवर्गीय नियंत्रण योजनेतील सहावा घटक म्हणजे बारा घरांची जन्मपत्रिका :-

आता आपण जन्मपत्रिकेचा माणसाच्या जीवनाशी कसा संबंध आहे, त्याच्या पूर्वसंचिताचा मागोवा, त्याच्या पूर्वजन्मात घडलेल्या घटनांचा संबंध, तसेच माणसाच्या जीवनात, सद्यजीवनात घडणार्‍या घटनांचा संबंध कसा असतो, हे ढोबळमानाने समजून घेऊ. म्हणजेच माणसाचे प्रारब्ध व सद्यजन्मात घडणार्‍या गोष्टींचा संबंध कसा आहे, हे समजण्याासाठी जन्मपत्रिकेतील बारा घरांची काय योजना आहे हे आता पाहू.

जन्मपत्रिकेतील पहिले घर : हे लग्न म्हणजेच तनू म्हणून संबोधिले जाते. या घरावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे गुणदोष, आरोग्य, शरीरसंपदा शारीरिक आचरण व त्याच्यासंबंधी आध्यात्मिक वृत्ती आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदी त्याचे व्यक्तिमत्त्वाचे विशेष ज्ञान होऊ शकते.

पत्रिकेतील दुसरे घर : त्यानंतर डावीकडील दुसरे घर हे धनस्थान म्हणून समजले जाते. यावरून त्याची सांपत्तिक स्थिती, वंशपरंपरेने प्राप्त संपत्ती, सांसारिक जीवन, त्याच्या आवडीनिवडी, आप्तेष्टांशी संबंध, घराण्याचे ज्ञान, इतिहास, तसेच घराण्यातील पूर्वापार परंपरा, विद्या, वैभव, स्त्री, संस्कृती आदींचे ज्ञान होऊ शकते.

पत्रिकेतील तिसरे घर : पत्रिकेतील तिसरे स्थान हे सहज म्हणून संबोधिले जाते. ह्यावरून कुटुंबातील प्रेम व कलह, बहीण-भावंडांचे जीवन, प्रपंच, त्यांचे आरोग्य, गरिबी, श्रीमंती, शास्त्र, कला, क्रीडा, पराक्रम, गूढ शास्त्र, प्रवास आणि मानसिक व बौद्धिक दृष्टीने व्यक्तीचे मूल्यमापनाचे ज्ञान होऊ शकते.

पत्रिकेतील चौथे घर : चतुर्थस्थान हे सुखस्थान म्हणून ओळखतात. ह्यावरून मातापित्याचे सुख, घरातील वातावरण, शिक्षणातील यशापयश, नातलगांशी संबंध, त्यांचा ह्या व्यक्तीच्या जीवनावरून परिणाम, वास्तुलाभ, गृहसौख्य, आध्यात्मिक ज्ञानाची ओढ, उद्योगधंदा, नोकरी तसेच जीवनातील यशापयश, कीर्ती आदी गोष्टींचे ज्ञान ह्या घरावरून होते.

पत्रिकेतील पाचवे घर : पंचम स्थानावरून संततिसौख्य समजते. आपल्या मुलामुलींपासून मिळणारे सुख, संततीचे जीवनमान, तसेच सट्टा, लॉटरी, जुगार आदींपासून मिळणारे आकस्मिक धन, नातलगांचे हितसंबंध, विचारआचार व स्वभावदर्शनाचे ज्ञान ह्याच घराच्या ग्रहस्थितीवरून समजते. स्वतःचे शिक्षणयोग, मंत्रतंत्र, देवपूजा, चैन, दांभिकता, ग्रंथलेखन, विविध शास्त्रांचे ज्ञान, अभिनव नाटक आदींचा छंद वगैरेंचे ज्ञान ह्या घरावरून होते.

पत्रिकेतील सहावे घर : षष्ठ स्थान हे रिपुस्थान म्हणून समजले जाते. विविध प्रकारचे शत्रू, मनाची क्षुद्रता, स्वार्थी वृत्ती, सूड भावना, व्यसनाधीनता शरीरपीडा, अपघाती योग, संसर्गजन्य रोग, अशक्तपणा, चौर्यकर्म, तुरुंगवास, खुनशी वृत्ती, आत्मघाती विचार, आदी वाईट गोष्टींचे ज्ञान ह्या सहाव्या घरावरून होते.

पत्रिकेतील सातवे घर : जायास्थान हे सप्तम स्थान आहे. पतिपत्नींचे वैवाहिक सुखसंबंध, पतीचे सौंदर्य, शिक्षणसंस्कार व पतीवरची निष्ठा ह्या घरावरून लक्षात येते. परस्त्रीसंबंध, प्रेमविवाह, भिन्नलिंगी संबंध, वैधव्य, उद्योगधंद्याची वाटचाल, भागीदारी, स्त्रियांपासून होणारे धनलाभ, पुरुषत्व,नपुंसकत्व आदींचे ज्ञान ह्या सप्तम स्थानावरून होते.

पत्रिकेतील आठवे घर : अष्टम स्थान हे मृत्युस्थान म्हणून समजले जाते. जीवावर बेतणारी संकटे, व्याधी, जीवघेणी दुखणी, अपघाती योग, गूढ विद्या, करणी, कवटाळ, भानामतीसारख्या घोर जीवघेण्या विद्या, आयुर्मर्यादा, मृत्यू केव्हा, कसा, कुठे आदी योगांचे ज्ञान हे अष्टम स्थानावरून होते.

पत्रिकेतील नववे घर : नवम स्थान हे भाग्यस्थान आहे. देव-उपासना, तीर्थयात्रा, सत्संग, मातापिता व गुरुजनांबद्दल आदरभावना, परोपकारी वृत्ती, जनसेवा आणि सुखासमाधानाने जीवन जगणे हे या स्थानावरून समजते. मानसन्मानाचे आणि नावलौकिकाचे योग येथून दिसू शकतात. बुद्धिमत्ता, परदेशगमन व आर्थिक लाभ कसा होईल, हे समजू शकते.

पत्रिकेतील दहावे घर : दशम स्थान कर्माचे आहे. ऐश्वर्य, दातृत्व, पुण्यकर्म, मानसन्मान, कीर्ती, कर्तृत्व ह्या विषयाचे ज्ञान होते. नेतृत्व अधिकाराचे योगदेखील कळू शकतात. बुद्धिमत्ता, आशावाद, महत्त्वाकांक्षा, राजकारण, समाजकारण आदी विविध विषयांचे ज्ञान ह्या घरावरून होते.

पत्रिकेतील अकरावे घर : एकादश स्थानावरून लाभ कळतो. जीवनात मिळणारा लाभ, स्वकष्टार्जित धन, योग, नोकरी, उद्योग घडवून होणारे लाभ, हानी, मित्र तथा नातलगांकडून होणारे नुकसान अगर लाभ, वास्तू व वाहनसौख्य, कला-क्रीडांपासून मिळणारा लाभ आदी ह्या घरावरून समजते.

पत्रिकेतील बारावे घर : द्वादश स्थान हे व्ययाचे स्थान म्हणून ओळखले जाते. मनाची अस्थिरता, आर्थिक हानी, उधळपट्टी, कर्जबाजारीपणा, अपघात, कारावास, गुप्त कारस्थाने, जादूटोण्याचे प्रयोग, दैन्यावस्था, कोर्टकचेरी,व्यसनाधीनता आदींचे ज्ञान होते.

ह्याप्रमाणे जन्मपत्रिकेतील १२ स्थाने माणसाच्या विविध आणि सर्वंकष जीवनाचे ज्ञान आपल्याला देतात. आपल्या पूर्व आणि सद्यजीवनाची कहाणी या ग्रहांच्या आणि ग्रहांच्या परस्परयोगातून मिळणारे ज्ञान ह्यातून होऊ शकते. ग्रहांचे माध्यम हेच जीवनाची कहाणी सांगण्याचे एकमात्र सर्वसामान्य माणसांना लागू पडणारे साधन आहे. माणसाचे पूर्वसंचित व प्रारब्धाचे ज्ञान होण्यास ह्या शास्त्राचा फार उपयोग होतो.

ज्योतिषशास्त्र हे हिंदू लोकांसाठीच आहे, इतरांना ते लागू पडत नाही, हे समजणे चुकीचे आहे. हे एक शास्त्र आहे. ही मूलतत्त्वे आहेत. ही सर्वांसाठीच सत्य आहेत. व्यक्तिगत कुंडलीचा अभ्यास किंवा सांगितलेले निष्कर्ष चुकीचे असू शकतात. हे का व कसे, हा एक स्वतंत्र विषय आहे. परंतु ‘शास्त्र’ म्हणून ते शुद्ध व कोणालाही लागू पडणारे आहे.

कोणत्याही माणसाला त्याच्या जीवनात अनुभवाला येणारे त्रासदायक योग आहेत का, ते काय असतील, ह्याचा अंदाज जन्मपत्रिकेवरून निश्चितच घेता येतो. पत्रिकेवरून कोणत्या प्रकारचे कर्मदोष आहेत हेदेखील समजू शकते. परंतु नेमके कोणते उपचारकर्म केले म्हणजे हे दोष जाऊ शकतात, हे ज्योतिषी अगर इतर कोणीही सांगू शकत नाहीत. अखंड गुरुपरंपरेने जे कार्य करणारे सद्गुरू आहेत तेच कदाचित हे सांगू शकतील.

ज्याप्रमाणे जन्मपत्रिकेतील एक-एक करीत १२ घरांना आपआपले विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे गुणविशेष आहेत. त्या नवग्रहांतील रवी हा ग्रंहाचा राजा असून, आकाशातील सर्व ग्रह त्यांच्या अस्तंगतच भ्रमण करीत असतात. प्रत्येक ग्रह शरीरामध्ये कसा विद्यमान असतो व काय परिणाम होतो, हे पुढील भागात विशद केले आहे.

शरीरात हे ग्रहमंडळ कसे विद्यमान आहे? :-नवग्रह जे आकाशात दिसतात. त्यांचा प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच प्रभाव असतो. एवढेच नाही, तर जे ग्रह आकाशात दिसतात ते सर्व ग्रह माणसाच्या शरीरामध्ये विद्यमान असतात. प्रत्येक ग्रहाचा माणसाच्या शरीरातील हाड, मांस, स्नायू, ज्ञानेंद्रिय आदी सर्वांशीच सरळ संबंध असतो व त्यांचा परिणामदेखील त्या त्या विभागांवर जीवनात होत असतो.

शरीरातील ग्रहमंडळाचा विचार केला की असे म्हणावेसे वाटते, की माणसाच्या शरीरातील अस्थींचा, हाडांचा संबंध हा रवी ग्रहाशी असतो, तर चंद्राचा संबंध हा मनाशी, रक्ताशी असतो. मज्जातंतूंचा संबंध मंगळाशी, तर पृथ्वीचा संबंध बुधाशी असतो. गुरूचा संबंध आध्यात्मिक ज्ञान, बुद्धिमत्ता, रक्तदाब, यकृत यांच्याशी असतो, तर शुक्राचा संबंध शुक्र धातूशी असतो. शरीरातील स्नायूंचा संबंध हा शनीशी असतो.

त्यामुळे ग्रहांमध्ये होणारे स्थित्यंतर किंवा ग्रहणांचा होणारा परिणाम हा शरीरातील विविध अंगांवर होतो. शरीरातील ज्या पेशींचा दोष लक्षात घेऊन त्याला असणार्‍या आजारांवर, रोगांवर योग्य उपाययोजना केली तर तत्काळ लागू पडते.

ब्रह्मांडाच्या अंतर्गत असणार्‍या या विविध शक्तींचा जर विचार केला, तर ब्रह्मांडाचा एक घटक असणार्‍या एका मानवी जीवनाचा अभ्यास आपण वेगळ्या शास्त्रीय पद्धतीने करू शकतो.

जीवनात घडणार्‍या विविध गोष्टींचा प्रत्यक्ष संबंध हा पूर्वसुकृताशी लावणे जेवढे कठीण वाटते तेवढेच ज्या ज्या योगांचा जीवनातील सर्व गोष्टींवर प्रभाव आहे त्या विविध योगांवरून जीवनक्रम चालू असताना त्या गोष्टींचा होणारा परिणाम आणि ग्रहांच्या माध्यमातून माणसावर दिसणारे परिणाम, ह्यावरून जे काही ग्रहमंडळ दर्शवितात हे त्याचे पूर्वसंचितच मानावे लागेल.

सद्यजीवनात घडणार्‍या गोष्टी आणि जन्मपत्रिका यांचा परस्परसंबंधांवरून अभ्यास जर केला तर जीवनामध्ये घडणार्‍या अप्रतिम गोष्टी का घडतात, याचा अंदाज ग्रहमंडळाच्या माध्यमातून घेता येऊ शकतो. आपले निष्कर्ष बरोबर आहेत की चूक आहेत, हे पाहण्यासाठी सध्याच्या जीवनातील घटनांचा महत्त्वाचा भाग आहे. ग्रह बिघडले असताना काय केले असता बिघडलेला ग्रह दोषरहित होईल, हे अभ्यासावरून आणि अनुभवांवरून समजू शकते.

ब्रह्माण्डामध्ये सूर्यमंडळाची आणि ग्रहमंडळाची जशी विविधता आणि परस्परसंबंध आहेत, त्याचप्रमाणे अनेक देवदेवतांचीदेखील आहेत. कोणत्या त्रासासाठी कोणत्या ग्रहाची व कोणत्या देवतेची उपासना करायला पाहिजे, ह्याचा विचार पुढे केला आहे. तसेच कोणत्या उपासनेने जीवनक्रम हा आनंददायी ठरू शकेल ह्याचादेखील सूत्रबद्ध विचार केला आहे. त्याप्रमाणे जर योग्य उपासना केली तर दैनंदिन जीवनातले दोष जाऊ शकतात, म्हणजे जीवनात घडणार्‍या घटनांचा आणि उपासनेचा प्रत्यक्ष संबंध चालू जीवनाशी आहे. जीवनामध्ये दिसणारी सुबत्ता, विवंचनारहित सुखी जीवन, जीवनातील समाधान आदी गोष्टी या पूर्वसुकृताच्या आहेत; त्या केवळ आपल्या प्राक्तनाने आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. सर्व स्वर्गीय उपभोगीय सुखे जरी माणसाला मिळाली तरी त्याला कर्माच्या जोडाची गरज आहे. मनुष्यजन्म हा ऐश्‍वर्य उपभोगासाठी मिळालेला नसून, सतत अविश्रांत, अहोरात्र कर्म करीत सात्त्विक जीवनाचा आनंद घेत आत्म्याचे परमात्म्याशी मिलन करण्यासाठी मिळालेले हे जीवन आहे. नावलौकिक, कीर्ती, पैसा, प्रापंचिक सुख, व्यावसायिक सुख आदींच्या मागे लागून कर्मदोषच मागे लागणार आणि जीवन उन्नत होणार नाही. नारदमुनींनी म्हणूनच तर वाल्या कोळ्याला नामस्मरणास बसविले आणि त्याचे जीवन अत्युन्नत करून दिले.

स्वर्गोपभोगीय सुखासाठी प्रयत्न करणे यासाठी जीव जन्माला आलेला नसून ईश्‍वर साधनेमध्ये तन्मयतेने प्रगती करणे आणि गुरूच्या मार्गदर्शनाखाली आपला आध्यात्मिक विकास करणे, हाच खर्‍या जीवनाचा हेतू आहे आणि म्हणूनच आपत्तीच्या काळामध्ये योग्य कर्म केले तर मानसिक समाधान मिळू लागते.

ज्या वेळी आध्यात्मिक ज्ञानाची अनुभूती येते त्या वेळी असे लक्षात येते, की व्यावहारिक, व्यावसायिक उपजीविकेसाठी मिळालेले ज्ञान हे तुच्छ असून, आध्यात्मिक ज्ञानाची व्याप्ती आणि तृप्ती ही विशाल असून, आगळीवेगळीच आहे.

जन्मपत्रिकेवरून शापित जीवनाचा विचार :

आत्म्यावर झालेले शापित संस्कार कसे असतात, हे जन्मपत्रिकेवरूनदेखील समजतात. काही पत्रिका शापमुक्त असतात- ‘बृहत्पाराशरी’ ग्रंथात एकूण ८ शाप सांगितले आहेत. १. सर्पशाप, २. पितृशाप, ३. मातृशाप, ४. भ्रातृशाप, ५. मातुलशाप, ६. ब्रह्मशाप, ७. पत्नीशाप व ८. प्रेतशाप. यातील पितृशाप, प्रेतशाप, सर्पशाप असल्यास संतती होत नाही अथवा झाली तर वाचत नाही. त्यातील वरील शापांचे ज्योतिषाच्या आधारे विवरण देत आहे. ज्याच्या जन्मकुंडलीत राहूमुळे पंचम स्थान दूषित झाले असेल, पंचमेश अथवा गुरू व राहूचे युतीत असेल, पंचम स्थानावर, तसेच गुरूवर पापग्रहाची दृष्टी व राहू गुरूच्या धनू, मीन राशीत असेल किंवा खालील योग असतील त्याने संततिसौख्य व पुत्रप्राप्तीसाठी ‘नारायणबली’ व ‘नागबली’ करावा.

लग्नी राहू, पंचमात शनी-रवी, सप्तमात क्षीण चंद्र व व्ययात गुरू असणे. २. शनी पंचमेश असून अष्टमात, लग्नी मंगळ, अष्टमात शनी सह असताना, ३. लग्नी पापग्रह, व्ययात रवी, पंचमात शनी, मंगळ, बुध व पंचमेश अष्टमात, ४. पंचमात शनी. अग्नी राहू, गुरू अष्टमात, ५. लग्नी राहू गुरू, शुक्र अथवा चंद्र, शनीसह लग्नेश व अष्टमात, ६. लग्नी राहू मंगळासह दुष्ट असून शनी पंचमात, ७. लग्नी शनी, पंचमात राहू, अष्टमात रवी, व्ययात मंगळ, ८. सप्तमेश ६-८-१२ स्थानांत, पंचमात चंद्र, लग्नी शनी मंदीसह, ९. पुत्रकारक गुरू, शनीचे मकर, कुंभ राशीत पंचमेश शत्रुग्रहाने दुष्ट असतात. १०. अष्टमेश पंचमात शनी शुक्रासह असून, गुरू अष्टमात प्रेतशापाने संततीचा नाश होतो.

जन्मकुंडलीतील रवी-गुरू, तसेच शुक्र यांची युती प्रतियोग, तसेच मंगळ, शनी, बुध, राहूसह असतील अगर त्यांची युती असेल तर त्या कुलामध्ये कोणाच्या संपत्तीचा अपहार झाला असावा अथवा धनासाठी विधवा स्त्रीची हत्या झाली असावी. हा दोष पाच पिढ्यांपर्यंत असतो. त्यामुळे दारिद्य्र प्राप्त होते. घरात कोणी वेडा होतो. निर्दोष स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप येतो, वंशात एखादा पुरुष अविवाहित राहतो, स्त्रियांचे अकाली मृत्यू होतात, हे या शापाचे लक्षण आहे.

राहू, चंद्र, शुक्र एकत्र अगर युतीत असताना पिशाच्चबाधा, व्यवसायात अपयश येते. हा सात पिढ्या पूर्वीचा शाप भोगावा लागतो. राहू, मंगळ युती असेल तर घराण्यात कोणीतरी विषप्रयोग केला असावा अगर धनाच्या लोभाने कोणाची हत्या घडली असावी. यामुळे गंडमाळा, महारोग, मुकेपणा, सर्पदंशाने मृत्यू, स्त्रीसुखाचा अभाव, स्त्रियांचे मृत्यू वगैरे पीडा होतात. हा शाप तीन पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो.

राहू, बुध एकत्र अगर त्यांची युती असेल तर मौंजीपूर्वी एखाद्या बालकाची हत्या घडली असावी. त्याचा परिणाम प्रेतपीडा अगर अंधत्व येते, दारिद्य्र येते, कोणी वेडा होतो. रोग झाला तर त्याचे निदान होत नाही, राहण्याच्या जागेत दोष उत्पन्न होतो, अनाठायी पैसा खर्च होतो. हा शाप आहे असे समजावे. शनी, राहू एकत्र अगर त्यांची युती असताना घराण्यात कोणी आत्महत्या केली असावी. त्यामुळे शीलवान जन्माला आला तर तो भ्रष्ट होतो. द्विभार्या योग होतो. तरुण वयात कन्येला वैधव्य येते. हा शाप सात पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो.

सद्यजन्म :-या सर्व विवेचनाचा अर्थ असा, की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा पूर्वजन्म, पूर्वसुकृत, पूर्वसंचित आदींचे ज्ञान ह्या पत्रिकेवरून होऊ शकते, तसेच त्याचा सद्यजन्म व सद्यजीवनात घडणार्‍या गोष्टींचे ज्ञान ह्या ज्योतिषशास्त्रावरून होऊ शकते.

नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे जसे वैशिष्ट्य आहे तसे त्यांच्या परस्परयुतींचेदेखील वैशिष्ट्य आहे. विशेषतः चंद्र ग्रह हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मानवी मनाचा तो कारक आहे. मनामध्ये निर्माण होणारे विचार, सुखदुःख आदींची कल्पना ह्या ग्रहाच्या स्थितीवरून होऊ शकते. मनामध्ये येणार्‍या असंख्य विचारांपैकी काहींचे परिवर्तन हे आपल्या विचाराअंती होणार्‍या निर्णयामध्ये होऊ लागते. मानवी जीवनामध्ये आपण जे जे काही करतो वा करण्याचे टाळतो ते सर्व आपल्या मनाने, बुद्धीने घेतलेल्या निर्णयादाखल असतात. कोणतीही कृती आपण करतो ती आपण मनाने आधी ठरवितो आणि नंतर करतो. अमुक एक करायचे हा आपण घेतलेला निर्णय असतो. अगदी कोणाच्या सांगण्यावरून जरी एखादी गोष्ट केली तरी ती करण्यापूर्वी आपल्या मनाने, इच्छेने अगर इच्छेविरुद्ध घेतलेला तो निर्णय असतो.

ब्रह्मांडामध्ये सतत चालू असलेला हा खेळ विशेष आहे. कोणत्या तत्त्वाचा, कोणत्या माध्यमातून, कोणावर काय व कसा परिणाम होतो, हे कळतदेखील नाही. पण मन आणि बुद्धी बाकी निर्णय घेऊन त्यानुसार आपली कृतीदेखील घडते. ज्योतिषशास्त्रानुसार बोलायचे झाले तर आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांची युती जी असते तिच्यामुळे आपले विचार त्या ग्रहांच्या होणार्‍या परिणामाप्रमाणे होतात आणि बर्‍याच वेळा आपण अनुभव घेतो, की जे मी करायचे ठरविले ते न करता वेगळेच केले. जे नको तेच केले. असे का घडले, ह्याचा आपण जर विचार केला तर लक्षात येईल, की बुद्धीला आणि आपल्या ज्ञानाला जे योग्य वाटत होते ते केले गेलेच नाही. वेगळेच काही घडले. अगदी शेवटच्या घटकेला आपल्या मनात विचार येतो आणि त्याप्रमाणे आपण कृती करतो. ही जी कृती घडते हाच तर जन्मपत्रिकेतील योगांचा परिणाम आहे. विवेकाने आणि बुद्धीने घेतलेले निर्णय हे जन्मपत्रिकेतील योगांशी विसंगत असतात. ज्या योगामुळे जीव जन्माला आलेला आहे त्या योगाप्रमाणे आपले विचार होत राहतात. आपले अंतिम निर्णयदेखील त्याचप्रमाणे कार्यान्वित होतात आणि परिणामतः आपल्या हातून घडणार्‍या कृतीदेखील त्याप्रमाणेच होतात आणि कृती घडल्यानंतर आपल्यालाच विचार पडतो, की हे असे का व कसे घडले? हे तर माझे प्रयत्न नव्हते, उद्देश नव्हते. हे तर मला नको होते, हे अपेक्षितही नव्हते. हे अनपेक्षितपणे घडले. हाच तर तो जीवनातला अनिष्ट योग.

**********************************************************

 हात दिला तू किती बुडत्यांसी | जप तप दिक्षा दिली कितीकांसी |

अभय दिले तू किती व्यथितांसी | तुझे कधी ना हो विस्मरण |

 **********************************************************


Leave a Reply