☼ जीव कसा घडतो ☼

अर्थात मानवी जीवाची कहाणी

मानवी जीवाची कहाणी खर तर त्याच्या पिंडाच्या गर्भधारणेपासूनच सुरू होते. जनमानसामध्ये प्रसूती होऊन मूल जेव्हा जन्माला येते तेव्हापासूनच त्याच्या जीवनाची कहाणी सुरू होते. जन्मत:च साधारणत: १ ते १.५ फुटाचे असलेले बालक चंद्रकलेप्रमाणे वाढत वाढत वयात आल्यावर साडेपाच ते सहा फुटांचा माणूस होतो. साधारणपणे १५ ते २० वषार्ंत, १ ते १.५ फुटाचे ते बालक वाढत वाढत ५.५ ते ६ फुटांचा सक्षम देह होतो. ह्या कालावधीत भोवतालचे लोक त्याला घडविण्याचा, वाढविण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. शरीर केव्हा आणि कसे वाढले, हे कळत नाही आणि दिसतही नाही. वाढताना ते दिसतच नाही, पण वाढलेले मात्र दिसते. झाडांची रोपे देखील वाढताना दिसत नाहीत, पण वाढलेली मात्र दिसतात. नेमक ते केव्हा वाढीस लागले हे कळतच नाही. जीवनसत्त्व दिल्यावर त्याचा परिणाम होताना दिसत नाही, पण परिणाम मात्र झालेला दिसतो. म्हणजे ते एवढ्या सूक्ष्मपणे वाढत असते, की ते कसे आणि केव्हा वाढते हे कळतच नाही आणि वाढताना दिसतही नाही. श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते! कोण बोलविते हरीवीण!’ म्हणजे जन्माला घालणार्‍या जीवांच्या पलीकडे काही गोष्टी आहेत, काही शक्ती आहेत (देवाची सत्ता, ब्रह्मांड), की ज्यांच्या आधारावर मानवी जीव चालत असतो, वाढत असतो.

श्री समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधा’मध्ये मानवी जीवाच्या मुळाचा शोध घेताना म्हटले आहे, की पाहतां शरीराचे मूळ ह्या ऐसे नाही अमंगळ | रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यासी | माणूस जन्माला येणार, तो एक अर्भक’| म्हणूनच त्या अर्भकाचे बीजारोपण होत असते ते एका स्त्रीच्या उदरात. जर ही स्त्री रजःस्वला होऊ शकली नाही, तर हे बीजारोपण देखील होत नाही. परिणामत: मानवी जीवनाचा जन्म अशा ठिकाणीं होणारच नाही. हीदेखील परमेश्वराची एक किमयाच आहे.

स्त्री-शरीरातील ठराविक कालावधीनंतर नैसर्गिकरीत्या बाहेर पडणारा जो विटाळ तोच त्या स्त्रीला गर्भधारणेसाठी योग्य करतो आणि अशाच ठिकाणीं माणसाच्या जन्माचे बीजारोपण होते. म्हणजेच ज्या मातृभूमीत हे बीजारोपण होते ती भूमीची शुद्धता आणि बीजारोपण झालेल्या बीजाची शुद्धता ह्यावर स्थापित झालेल्या बीजाची शुद्धता अवलंबून राहील. श्री ज्ञानेश्‍वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, म्हणजेच बीजारोपण करणारे जे मूळ बीज आहे तेच जर शुद्ध- सात्त्विक असेल तरच स्थापित झालेले बीज किंवा स्थापित झालेली गर्भधारणा ही शुद्ध- सात्त्विक, गोमटी अशी असेल. त्या जीवाचे योगदेखील त्याप्रमाणे चांगलेच राहतील.

मानवी जीवनाचे जे मूळ बीज, त्याप्रमाणेच नवीन जीवाची उत्पत्ती राहील. जे योग, भोग, व्याधी, कष्ट, कर्मयोग, दुःख, असमाधान वगैरे स्थापन करणार्‍या उभय जीवांचे असतील तेच योग, भोग आदी योग प्रामुख्याने स्थापित झालेल्या जीवाचे असणार. त्याप्रमाणे जे सुख, समाधान, शांती, सुयोग आदी स्थापन करणार्‍या जीवांचे असतील त्याचप्रमाणे ते नवीन जीवात स्थापन होणार. हाच निसर्गनियम अनुभवास येतो. जसे बीज तसे फळ. म्हणजेच बालकाचे मातापिता ज्या गुणांचे, योगांचे असतील, साधारणतः ठोकळ मानाने तेच गुण बालकामध्ये येतात. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाले तर म्हणावे लागेल, की आईवडिलांच्या जन्मपत्रिकेतील ग्रहांचे नेमके संबंध मुलाच्या जन्मपत्रिकेत पाहावयास मिळतात. ग्रहांच्या भाषेवरून ते आपल्याला कळू शकेल.

मानवी जीवनाच्या जन्मजन्मांतरीची कहाणी लिहिण्याची भाषा म्हणजे नवग्रह व त्यांचे होणारे परस्पर योग, म्हणजे जन्मपत्रिका. संपूर्ण ज्योतिषशास्त्र हे नवग्रह, त्यांची १२ घरे, त्यांच्या १२ राशी व ग्रह आणि राशींचे परस्परयोग, नक्षत्र आदींवर आधारित आहेत. ब्रह्मांडातील प्रत्येक जीवनाचे सद्यजन्मातले योग, तसेच पूर्वजन्मदोष, प्रेतपीडा, अपमृत्यू, शापित जीव आदी विषयांचे ज्ञान ह्या जन्मपत्रिकेतील नवग्रहांवरून लक्षात येतात.

हे समजण्यासाठी सूर्यमंडळ, ग्रहमंडळ काय आहे, ब्रह्मांड काय आहे, हे समजून घेणे जरूर आहे. आधी आपण ब्रह्मांड म्हणजे काय, ते कसे चालते ह्याचा विचार करू.

ब्रह्मांड म्हणजे तरी काय?

 जे अनेक जीवांची तसेच निर्जीवाची उत्पत्ती करते- जे आहे आणि जे नाही पण- उदा.- प्रेतात्मा. जे दिसते आणि जे दिसत नाही, पण आहे. जे अनेक जीवांची निर्मिती, पालनपोषण करून त्याचा विकास करते आणि जे त्याच्यावर योग्य संस्कार करून त्याला तत्त्वरूपाने शिल्लक ठेवते आणि त्याचा संहारही करते. संपूर्ण ब्रह्मांडात होणार्‍या स्थित्यंतरांचा परिणाम हा ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीवर होत असतो- मग ती सजीव असेल किंवा निर्जीव असेल; जे निर्गुण-निराकार असेल; अस्तित्वात असेल अगर नसेलही; आपल्या दृष्टिक्षेपात असेल अगर नसेल; आपण स्पर्श करू शकू अगर केवळ भासमान असेल; चर अचर असेल; त्याच्या वलयाच्या कक्षेत असू अगर त्या अदृश्य शक्तींच्या खूप दूर असू. ब्रह्मांड हे केवळ अतर्क्य आहे व सर्वव्याप्त असून सर्वातीत आहे. ब्रह्मांडातील अतिसूक्ष्म बदलाचा परिणाम हा पूर्ण ब्रह्मांडावर होते. पंचमहाभूते म्हणजे ब्रह्मांड नव्हे. सृष्टी, पंचमहाभूते, नाशिवंत आहे तर ब्रह्मांड हे अविनाशी  आहे. ब्रह्मांड हे केवळ निर्मळ, शुद्ध गुणातीत आहे. साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत, मनाचे कष्ट मात्र लागतात.

हे ब्रह्मांड कसे चालते?

 हे ब्रह्मांड कसे चालते हे मोठे गूढच आहे. एवढे मोठे ब्रह्माण्ड आणि ते कोण आणि कसे चालविते हे दिसतच नाही आणि कळतही नाही.ते इतक्या बेमालूमपणे चालते, की प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो, की ते युगानुयुगे अव्याहतपणे, अहोरात्र कार्यरत असून कधी बंद पडत नाही की त्यात कोणते प्रश्न निर्माण होत नाहीत. ब्रह्माण्डातील सर्वच कार्ये कशी सुरळीत, सुव्यवस्थित, सुनियंत्रित, सुनियमित व स्वयंचलितासारखी चालतात. सर्व काही आपोआप चालते. संपूर्ण ब्रह्माण्डामध्ये कुठेच गोंधळ नाही, गडबड नाही, की आरडाओरडही नाही. सर्व कसे पूर्वनियोजितासारखे, मुख्य म्हणजे आपोआप चालते. ह्या ब्रह्माण्डाचे नियंत्रण कसे, त्याची काय योजना आहे, ते कसे चालते, ह्याचा आता आपण विचार करू.

 **********************************************************

आध्यत्मिक तत्त्वाशिवाय जीवन व्यर्थ आहे याची अनुभूती प्रत्येकाला आपल्या जीवनात येतेच. योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे आमच्या जीवनाचे, कार्याचे व आश्रमाचे मूळ अधिष्ठान आहे. त्यामुळे जीवनाचा आधार असलेले, नाथांचे अध्यात्मिक तत्त्व देखील या आश्रमातून नरेंद्रस्वामी राबवितात. अनुभव घ्या आणि नंतरच विश्वास ठेवा, हे तर त्यांचे ब्रीद वाक्य आहे. नरेंद्रनाथांनी याप्रमाणे आपल्या कार्यास प्रारंभ केला. कर्क व मकर संक्रमणाची हवन करता करता प्रल्हादाश्रमाची स्थापना करून वेदांचे महत्त्व आणि प्रसार कार्यास प्रारंभ केला.

 **********************************************************


Leave a Reply