☼ जीवनामध्ये अपेक्षित पातळी कशी गाठावी ☼
दैनंदिन जीवनात प्रत्येकाची धडपड ही सुखाच्या शोधात असते. समाजामध्ये महत्त्वाचे स्थान मिळविण्यासाठी, राजकीय क्षेत्रात आपले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी, आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी, सर्व तर्हेचे सुख मिळविण्यासाठी प्रत्येक जण सुचतील तसे आणि वाटेल ते जारीचे प्रयत्न करीत असतो; पण शेवटी त्यालाही प्रश्न पडतो, की आपल्याला अपेक्षित यश, अपेक्षित पातळी, अपेक्षित कार्यक्षमता, अपेक्षित सुख का मिळत नाही?
देवावर विश्वास आहे किंवा नाही, ह्यावर जीवनाचे सुख किंवा आनंद अवलंबून नसतो, तर माणसाच्या सच्छीलतेवर, संस्कार, पूर्वसंचितावर, प्रारब्धावर, आदी अनेक गोष्टींवर तो अवलंबून असतो. आर्थिक सुबत्ता वा सर्व तर्हेचे स्वर्गोपभोग हे इच्छित उद्दिष्टे साध्य करून देऊ शकत नाहीत किंवा आत्मिक आनंदही देऊ शकत नाहीत. जोपर्यंत पूर्वकर्मदोष जात नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनात दु:ख, व्याधी, असफलता, असमाधान आदी विविध नको असलेल्या गोष्टींचा स्वीकार करावाच लागेल. हे सर्व दोष कसे दूर करता येतील, आजच्या युगामध्ये दिशाहीन झालेले जीवन, योग्य व सुनिश्चित दिशेने वाटचाल कसे करू शकेल, मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन कसे स्थिर होऊ शकेल, हे सर्व योग्य कर्म केल्यावरच साध्य होऊ शकेल.
जीव कसा घडतो? आत्म्यावर कर्माचे कसे संस्कार होतात? हे ब्रह्माण्ड कसे चालते? पंचमहाभूताचा जीवाच्या जीवनप्रवाहाशी कसा संबंध असतो? जीवनात घडणार्या घटनांवरून कर्मदोष कसे समजू शकतात? आपण ज्याला नशीब समजतो ते काय आहे? आपले प्रारब्ध काय आहे? ते कसे ते बदलू शकते? जीवनातील खडतर योग, कधीही न बदलणारे प्रारब्ध वेदमंत्रांच्या माध्यमातून उपासनेच्या आधाराने कसे बदलते, ब्रह्मांडाचे आपल्यावर काय व कसे परिणाम होतात, हे सर्व आपल्या लक्षात आले आहे. हे दोष ज्या वेळी दूर होतील त्या वेळी आपण जीवनात यशस्वी होऊ.
उपासनेच्या माध्यमातून व नाथ शक्तिपीठातून आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन सांगितलेले कर्मविधी करून प्रयत्न केल्यास आपले जीवन उजळून निघेल यात शंकाच नाही. मग अखिल ब्रह्मांडामध्ये अनेकविध स्तरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा उन्नत होतो, त्याच्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी कसा गाठू शकतो, ह्याचा अनुभव येऊ लागेल.
अखिल ब्रह्मांडामध्ये वावरणार्या माणसावर सर्वच घटकांचा परिणाम कसा होतो, हे आपण पाहिले. ब्रह्मांडातील मानवी जीवनावर पंचमहाभूतांचे महत्त्वाचे घटक म्हणजेच १) पृृथ्वी, २) आप, ३) तेज, ४) वायू व ५) आकाश. ह्या प्रत्येक महाभूताचे जे विशेष गुणधर्म आहेत त्या गुणधमार्ंच्या प्रभावाखाली सृष्टीवरील सर्व जीव वावरत असतात. ह्या प्रत्येक तत्त्वाचा प्रत्येक जीवावर सतत परिणाम कसा होत असतो, हे आपण पाहिले.
आपले शरीर, तसेच आपला जीव हा आपण जे जे काही करतो त्याच्यावरच केवळ अवलंबून राहत नसतात, तर ते १) पंचमहाभूते, २) चार वर्ण, ३) चार युगे, ४) निजतत्त्वे, ५) निजगुण, ६) प्रत्येकाची जन्मपत्रिका व ७) बारा राशी व नऊ ग्रह, नक्षत्र अशा सात गोष्टींमध्ये जीव सतत खेळत राहतो. ह्या सर्वांचा प्रत्येक जीवावर वेगवेगळा परिणाम हा सतत होत असतो. म्हणूनच ह्या सर्वांच्या परिणामांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या विचारात, वागण्यात व जीवनाच्या योगात सततच वेगळेपण दिसून येते.
उल्लेख न केलेल्या दोषांबद्दल :- जे जे चांगले-वाईट कर्म आहे त्या प्रत्येकाची नोंद ही ग्रहांच्या माध्यमातून आत्म्यावर, जीवावर होते. जन्म झाल्यावर त्याचे प्रत्यक्ष परिणाम जीवनात पाहण्यात येतात. प्रत्येक जीवनात जसे ज्याचे कर्म असेल तसे ते त्याच्या जीवाचे प्राक्तन होऊन पूर्वसंचित होऊ लागते. त्याप्रमाणे जन्मानंतर प्रत्यक्ष जीवनात तसे चांगले अथवा वाईट गाचे
परिणाम त्या त्या जीवावर त्याच्या जीवनप्रवाहात झालेले दिसतात. ह्या सर्वांच्या परिणामादाखल जीवनात खडतर योग, स्वभावदोष वा यापूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जीवनातील विविध समस्यांचा अनुभव येतो. हे बिघडलेले योग जसे प्रत्यक्षात अनुभवाला येतात तसे ते जन्मपत्रिकेवरूनदेखील सहज लक्षात येऊ शकतात.
हे सर्व योग वेदमंत्रांच्या माध्यमातून अथवा योग्य कर्म करून दुरुस्त होऊ शकतात. अशा अनेक त्रासदायक गोष्टी आहेत, की ज्यांचा उल्लेख वा ऊहापोह येथे केला नाही. आवश्यक वाटल्यास वाचक अशा गोष्टींबद्दल ‘नाथ शक्तिपीठा’कडे चौकशी करू शकतात. त्याही गोष्टींचा विचार करून ब्रह्मांडाचा हा खेळ लक्षात घेतला, तर म्हणावेसे वाटते, की ह्या ब्रह्मांडातला माणूस हा कसा आणि कुठे कुठे फिरत जन्म काढतो आणि कसकसे जीवन जगतो आणि शेवटी बरोबर काय नेतो आणि नंतरच्या जीवनाचे काय होते हे कळत नाही. म्हणजे जीव वारंवार जन्म घेत असणारच.
जीवाला अनेक जन्म असणारच :-अनेक लोक जन्माला येतात, तसेच अवतारी पुरुषदेखील जन्माला येतात. आतापर्यंत अनेक ईश्वरी अवतार होऊन गेले, असा आपला इतिहास आहे. देवदानवांचे युद्ध झाल्याचेदेखील इतिहासात दाखले आहेत. जे अवतारी पुरुष होऊन गेले ते सामान्य माणसांसारखेच जन्माला येऊन कार्य करून गेले. भगवान श्रीकृष्णांच्या वचनाप्रमाणे :
‘नैनं छिन्दंन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:|
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषमति मारुत:॥ (गीता २-२३)
म्हणजे, ‘आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वायू त्याचे शोषण करू शकत नाही.’ आत्म्याकडे आपण जे पाहतो ते एक शरीर म्हणून. आत्म्याभोवती जे शरीराचे वेष्टन आहे त्यामुळे आत्म्याला वेगळे अस्तित्वच नाही, ह्या समजुतीने आपण राहतो. भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे जे वर्णन केले आहे त्याप्रमाणे आत्मा हा शरीराने किंवा कशानेही बांधला जाऊ शकत नाही किंवा कशानेही त्याला जखडून ठेवता येत नाही.
श्रीसमर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज- माझे सद्गुरू ह्यांचा एक विलक्षण अनुभव फार बोलका आहे. एकदा एक सत्पुरुष व्यंकटनाथांच्या दर्शनासाठी देवगाव रंगारी ह्या त्यांच्या निजस्थान गेले असता महाराजांनी त्यांना विचारले, ‘‘बाळ! कोठून आलास?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अकोल्याहून.’’ मग ‘‘चौधरीचं कसं काय आहे?’’ ज्यांना विचारले ते गृहस्थ डॉक्टर होते. अकोल्याचे डॉक्टर चौधरी हे प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यामुळे त्यांनी विचारले, ‘‘डॉक्टर चौधरी का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अरे चौधरी!’’ परंतु ते लक्षात न आल्यामुळे त्या गृहस्थांनी पुन्हा विचारले, ‘‘कोणते चौधरी?’’ त्यावर महाराजांनी आपला उजवा हात बाजूला दाखवीत म्हणाले, ‘‘अरे हा, अरे हा.’’ म्हणताच नरेंद्र चौधरी सदेह तेथे बसलेला त्या गृहस्थांनी पाहिला, अन् ते पटकन उद्गारले, ‘‘अरे हे बापूसाहेब चौधरी! ह्यांना मी चांगला ओळखतो.’’ महाराजांशी बोलणे होईपर्यंत तो आत्मा व तो देह अदृश्य झाला. योगी लोकांचे स्वत:च्या व ब्रह्मांडातील आत्म्यावर असलेले प्रभुत्व पाहा. इतरत्र वावरत असलेला जीव त्या योग्याने अगदी सहजपणे समोर उभा केला तो केवळ ओळख देण्यापुरता. काय ही नाथपंथाची परंपरा आहे पहा.
प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याबद्दल केलेले हे विधान आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा जिवंत आहे. आत्म्याचा नाश झाला नाही. तो कुठे ना कुठे, कोणत्या न कोणत्या स्वरूपात असेल. तो एकाच ब्रह्मांडाच्या तत्त्वाप्रमाणे ईश्वरी अनुसंधानाने कितीही ठिकाणी राहू शकतो. प्राचीन भारतीय संस्कृतीत किंवा पुराणांत याचे बरेच दाखले पाहावयास मिळतील. याचा अर्थ आत्म्याला वेष्टन असलेले जे शरीर ते नष्ट झाले काय किंवा न झाले काय, तो आत्मा आपल्या सर्व स्मृतींसह ‘बीज’रूपाने अस्तित्वात आहे. ह्याचाच अर्थ हे बीज, हा आत्मा जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या बीजावर कोरलेल्या स्मृतींसह तो जीव जन्म घेतो. सद्यजीवनात आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडता येत नाही. ती स्मृती आपणास नाही, त्यामुळे आपल्या मागील जन्मांचा आणि सद्यजन्माचा आपल्याला संबंध कळत नाही. परंतु सद्यजन्मात घडणार्या घटनांवरून अभ्यासाने, तारतम्याने हा संबंध आपण जोडू शकतो. तो कसा, हाच गुरुकृपेचा आणि गहन अभ्यासाचा प्रश्न आहे. ह्या संदर्भात अवतारी पुरुषांचे आत्मे कसे कार्यरत असतात, हे पाहू.
अवतारी पूरुषांचे आत्मे :-ईश्वराने अवतार जरी घेतले आणि अवतारी कार्य करून ते जरी आज आपल्याला दिसत नसले तरी त्यांचाही आत्मा हा ब्रह्मांडाच्या तत्त्वानुसार आजही विद्यमान आहे का, तो कोणत्या स्वरूपात असेल व काय करीत असेल, असे विविध प्रश्न मनामध्ये येतात.
इतिहासात वर्णन केल्याप्रमाणे – १) अश्वत्थामा, २) व्यास, ३) हनुमान, ४) बिभीषण, ५) बली, ६) कृपाचार्य व ७) परशुराम हे सात अवतारी पुरुष हे सप्तचिरंजीव म्हणून इतिहासप्रसिद्ध आहेत. याचाच अर्थ हे सप्तचिरंजीव ज्या देहाने जन्माला आले त्याच देहाने ते आजही कार्यरत आहेत. पुराणाप्रमाणे त्यांना मृत्यू नाही ते अमर व चिरंजीव आहेत. ते त्यांच्या सामर्थ्यानिशी, त्यांच्या शरीरानिशी पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे अवतरू शकतात.
सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युगे कितीतरी वेळा पूर्ण होऊन गेली आणि पुन्हा सुरू झाली. ज्या कुठल्या युगात हे सप्तचिरंजीव प्रत्यक्षात भूमीवर अवतरले तेव्हापासून ते आजही हयात आहेत, त्याच देहानिशी, जसेच्या तसेच. हीच इतिहासाची ग्वाही आहे. हाच आपला इतिहास आहे.
हीच वैदिक संस्कृती आहे. आज आपल्याला ते डोळ्याने दिसत नाहीत, पण त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती आपल्याला घेता येते. त्यांच्या इच्छेला येईल तेव्हा ते ब्रह्मांडामध्ये युगानुयुगे इतस्तत: भ्रमण करू शकतात. हे त्यांचे वन, व्यक्तिमत्त्व आणि वैशिष्ट्य आजही आहे. ते कुणालाही दिसू शकत नाहीत. ते काय करतात, हे कुणालाही कळत नाही. आपल्यात असून आपल्याला दिसत नाहीत, असे असले तरी ते ब्रह्मांडाच्या नियमानेच वागणार. ह्याचा अर्थ ते नाहीत, असा नसून हे तत्त्व आपल्याला गवसायला काहीतरी वेगळे करणे जरूर आहे.
ह्या पुस्तकाच्या सुरवातीला वाल्या कोळी, ज्ञानेश्वर महाराज, भगवान दत्तात्रेय व श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज ही चार उदाहरणे दिली आहेत.
१. सामान्य जीवाच्या दृष्टीने नारदमुनींच्या हे कसे लक्षात आले, की वाल्या कोळ्यामध्ये असामान्य परिवर्तन होऊ शकते? वाल्यातच त्यांनी स्थित्यंतर का घडविले? वाल्या कोळ्याच्या जीवनाचा जर विचार केला तर हा प्रश्न पडतो, की ब्रह्मर्षी नारदांनी ब्राह्मणाचा वेष धारण करून वाल्या कोळ्याचा उद्धार करण्यासाठी एवढे झटावे? एवढे जबरदस्त पूर्वसुकृत असताना त्याच्या जीवनात असे का घडले? असे काय झाले, की ज्याचा परिणाम म्हणून तो लुटारू झाला?
ब्रह्मर्षी नारदमुनी हे कायमच आध्यात्मिक कार्यांत रत होते. सतत परमेश्वराच्याच सान्निध्यात व ईश्वरी कार्यात ते निमग्न असायचे. ब्रह्मांडाचे कार्य हेच जणू त्यांचे कार्य होते. प्रत्येक आत्म्याची, परमात्म्याची इत्थंभूत माहिती त्यांना असायची. ह्या त्रिकालज्ञानी ब्रह्मज्ञान्याने वाल्या कोळ्याचे प्रारब्ध लक्षात घेतले. पूर्वजन्मीच्या कृती, त्याच्या प्राक्तनामुळे सद्यजीवनात ही परिस्थिती प्राप्त झाली; परंतु जबरदस्त पूर्वसंचित असल्यामुळे त्याच्यात स्थित्यंतर करायचे ठरविले. त्यांनी वाल्या कोळ्याकडे स्वत: जाऊन त्याच्या आत्म्याला जाणीव देऊन, उपरती देऊन त्याला तप:श्चर्येला लावले. त्याच्याकडून कडक तपश्चर्या,कर्म करून घेतले आणि मानवी इतिहासात एक अघटित कार्य करवून त्याला अजरामर केले. हे केवळ नारदमुनींच्या आध्यात्मिक बळाने झाले. एक मान्य जीव असामान्य झाला.
ब्रह्मांडाच्या खेळामध्ये ढवळाढवळ करून एका सामान्य जीवात फार विलक्षण स्थित्यंतर घडवून आणले. वाल्या कोळ्याने आपल्या आवडीने, स्वमनाने नामस्मरण करून त्याच्यामध्ये विलक्षण स्थित्यंतर घडले नाही तर ब्रह्मांडाच्या नियमामध्ये जे कोणी स्थित्यंतर घडवून आणू शकतात. त्यांनी म्हणजे नारदमुनींनी ते स्वमनाने केले होते. म्हणजे त्यांनी सामान्य जीवाच्या आत्म्यामध्ये, योगामध्ये, भोगामध्ये, प्राप्त जीवनामध्ये पाहिजे ते स्थित्यंतर घडविले होते.
२. दुसरे उदाहरण ज्ञानदेव महाराजांचे : ज्ञानदेव महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले. रेडा हा पशुजीव पहिल्या उदाहरणात मानवी जीव होता व त्याच्यावर परिणाम दाखविणारे ह्या भूतलावर मनुष्यरूपाने वावरणारे नदेव महाराज होते. रेड्याला वाचा नाही, बोलता येत नाही, तरी त्याच्या मुखी ज्ञानदेव महाराजांनी वेद वदविले. हे कसे केले? आत्म्याला जे शरीराचे वेष्टन असते त्या शरीराचा व आत्म्याचा तसा संबंध नसतो. आत्मा हा शरीरापासून अलिप्त असतो. श्रीकृष्णांच्या वचनाप्रमाणे :
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:|
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:॥
म्हणजे आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वायू त्याचे शोषण करू शकत नाही. म्हणजेच आत्मा हा अलिप्त आहे, हेच ज्ञानदेवांनी ह्या उदाहरणावरून दाखवून दिले. आत्मा कोणतेही शरीर धारण करू शकतो. परंतु आत्म्यावर संस्कार वेगळे. आत्म्यावर संस्कार होतात, पण शरीरावर अशा प्रकारचे संस्कार होत नाहीत. आत्म्यावर जन्मोजन्मीचे झालेले संस्कार ज्ञानदेव महाराजांनी सहजतेने दाखविले. म्हणजेच जन्मोजन्मी जीवावर झालेले संस्कार हे आत्म्यावर सूक्ष्मरूपाने लिहिलेले असतात, हेच ह्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
३. तिसरे उदाहरण भगवान दत्तात्रेयांचे. हे अवतारी सत्पुरुष. ब्रह्मा, विष्णू व महेशरूपी भगवान दत्तात्रेयस्वामींचे चरित्र, ‘गुरुचरित्र’ ह्या ग्रंथामध्ये लिहिले आहे. रजक म्हणून सामान्य जीव जगणार्या माणसाला, धोब्याला भगवान दत्तात्रेयांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता पूढच्या जन्मी राजा होशील असे सांगितले. पुढच्या जन्मात राजाला झालेल्या व्याधीमुळे त्याची व दत्तात्रेयस्वामींची भेट होते. येथेदेखील स्वत: भगवान त्या सामान्यपणे वागणार्या सामान्य माणसाला, रजकाला भेट देऊन त्याच्या व्याधीचे हरण करतात. परंतु ब्रह्मा, विष्णू, महेशस्वरूपी भगवान दत्तात्रेयांनी स्वत: धोब्याच्या प्रारब्धात बदल घडवून त्याला स्वर्गोपभोग दिला. जे एका जन्मात शक्य नाही ते त्या धोब्याला केवळ श्रीगुरुस्वामींच्या कृपेने प्राप्त झाले.
४. चौथे उदाहरण सद्गुरु व्यंकटनाथांच्या सान्निध्यातले. आध्यात्मिक विषयाशी गंध नसलेल्या जीवाला त्याच्या चित्तवृत्ती-प्रवृत्तींमध्ये बदल घडवून त्याला गुरुपदी नेऊन बसविले, हे केवळ त्यांच्या कृपेमुळेच. चार दिवसांचा गर्भ आहे म्हणून सांगून होणार्या मुलाचे सर्व भवितव्य सांगितले. नुसता हात बाजूला सारून तेथे अस्तित्वात असलेले व्यक्तिमत्त्व पुन्हा दाखवून योगसिद्धतेचा नमुना दर्शविला.
श्रीसमर्थ योगाभ्यानन्द व्यंकटनाथ महाराज हे सद्ययुगातले, चालू शतकातले सिद्ध पूरुष होते. स्वत:च्या योगसामर्थ्यावर सर्व तर्हेची अघटित स्थित्यंतरे त्यांनी भक्तांच्या जीवनात केली. ह्याही उदाहरणात इतरांच्या आत्म्यावर असलेले नियंत्रण त्यांनी दाखविले आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की
‘हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वजन्मकृतीचा | मज ना कळे कशाचा कुंठित बुद्धि वाचा ॥
लिहिले न भाळीं त्याने वात्सल्य, प्रेम विधीने | पण दोष ना कुणाचा हा भोग संचिताचा ॥
योगी म्हणोनी म्हणती कुणी कीर्तिगान गाती | मज लोभ ना कशाचा, हा मार्ग कर्म साधनेचा ॥
जीवाचा जीवनप्रवास :-विश्वामध्ये रोज अनेक मुले जन्माला येतात तर रोजच अनेकांचे मृत्यू होतात. जगभर लोकांची आवक जावक सुरूच असते. विश्वामध्ये सर्वत्रच मानवांची गर्दी आहे. हे लोक येतात कुठून आणि जातात कुठे? गेल्यावर त्यांच्या जीवाचे, जीवनाचे काय?
मनुष्याचे आयुष्य जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आहे एवढेच समजायचे, की मेल्यानंतर हाच जीव जन्ममृत्यूच्या फेर्यात पुन्हा मानवी जन्मात येतो, हे काहीच कळत नाही. मागच्या जन्माची कोणालाच आठवण नसते, त्यामुळे सद्यजीवन आहे एवढेच जीवन आहे असे मानायचे? जीवनाचा हा जीवनप्रवास अनेक योनींतून अनेक जन्मांतून सतत चालू असतो, असे समजायचे? आपल्या जीवनाकडे आणि इतरांच्या जीवनाकडे ज्या वेळी आपली दृष्टी वळते त्या वेळी प्रत्येकाच्या जीवनात घडणार्या गोष्टी याला काही ना काही पूर्वनियोजन असेल का, असे विचार मनामध्ये आल्यावाचून राहत नाहीत. जीवनामध्ये विविध प्रकारचे क्लेश, भोग, व्याधी, आजारपण, खडतर नशीब, असफलता आदी गोष्टी सततच घडत असतात. समाजामध्ये विचार, विचारांचे मतमतांतर, भिन्न प्रयत्न आणि विविध कृतींचे चांगले आणि वाईट योग हे का येतात, हे काही कळत नाही. एखादी गोष्ट, कोणाला काही न मागता आपसूक मिळते तर तीच कोणाला मागून मागून, मागे लागूनदेखील मिळतच नाही. कोणाच्या जीवनामध्ये अतिसहजता, सरळता असते, तर कोणाच्या जीवनामध्ये ती तशी दिसत नाही. कोणाचे विवाह होतात तर कोणाचे काही केल्या योगच येत नाहीत. कुणाला सहजतेने पुत्रसंतती होते तर कुणाला नवससायास करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनदेखील संतती होत नाही. सर्व प्रकारची सुबत्ता असूनदेखील काही ना काही खंत असते, तर कुणाला काहीच नसतानादेखील सर्व काही सुरळीत व्यवस्थित असते. कुणाचा देवावर, दैवावर विश्वास असतो तर कुणाचा देवावर, दैवावर अजिबात विश्वास नसतो. फार काय, कुणाचा तर स्वत:वरदेखील विश्वास नसतो.
वाल्यालादेखील ताबडतोब का उपरती व्हावी आणि कर्मसाधनेला त्याने लागावे? माणसाची बुद्धी कुंठित होते. ‘लिहिले न भाळीं त्याने, वात्सल्य, प्रेम विधीने | पण दोष ना कुणाचा, हा भोग संचिताचा |’ ह्याची सत्यता वाल्या कोळ्याच्या घटनेवरून पटते. वाल्याच्या नशिबात लुटमार करणारा असे तर काही नव्हते. येथेच तर बुद्धी कुंठित होते आणि हा प्राक्तनाचा दोष आहे असेच वाटू लागते. ‘योगी म्हणोनि म्हणती कुणि कीर्तिगान गाती | मज लोभ ना कशाचा| हा मार्ग कर्मसाधनेचा |’ वाल्मीकी ऋषी खूप थोर विभूती होते. रामजन्मापूर्वी संपूर्ण रामायण लिहिणे हे केवळ अशक्य आहे, परंतु ते त्यांनी अतिसहजतेने केले. केवळ कर्माच्या आधारावर, केवळ आपल्या तपोबलावर, नारदमुनींच्या कृपाशीर्वादावर हे कार्य त्यांनी केले.
**********************************************************
देवावर विश्वास आहे किंवा नाही, नित्य पूजापाठ, उपासना होते किंवा नाही, ह्यावर जीवनाचे सुख किंवा आनंद अवलंबून नसतो, तर माणसाच्या सच्छीलतेवर, सज्जनतेवर व यथायोग्य नित्यकर्मावर, त्याच्या संस्कृतीवर, जीवनाच्या दैनंदिन कृतींवर, दातृत्वावर, त्याच्या चारित्र्यावर जीवनाचा आनंद अवलंबून असतो. आर्थिक सुबत्ता वा सर्व तर्हेचे स्वर्गोपभोग हे आत्मिक आनंद केव्हाही देऊ शकत नाहीत.
**********************************************************