धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रुपाने अवतार घेतील, तेव्हा सत्य युगाची सुरुवात होईल आणि नवी संतती सात्वीक होईल. जेव्हा चंद्र, सर्य, आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील, त्यावेळी सत्य युगाची सुरुवात होईल. देवतांच्या कालगणने नुसार जेव्हा एक हजार वर्ष होऊन जातील, तेव्हा कलियुगाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा माणसांची मने, सात्वीकवृत्ती वाढवून आपले खरे स्वरुप जाणतील. तेव्हा पासून सत्य युगाची पुन्हा सुरुवात होईल.
आष्टमासिध्दींनी संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय, चराचर जगताचे स्वामी भगवान,देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील. अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरुन पृथ्वीवर संचार करतील आणि राजे म्हणवणार्या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील.जेव्हा सर्व लुटारुंचा संहार होईल, तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवीत्र सुगंधी वायुच्या स्पर्शाने पवीत्र होतील. त्यांच्या हृदयामध्ये सत्वमुर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील त्यामुळे शांती, संतती, बलवान होऊ लागेल.
चारही वर्णाचे लोक शूद्राप्रमाणे होतील गाई शेळयांप्रमाणे लहान शरीराच्या आणि कमी दुध देणार्या असतील. आश्रमही घरांसारखे होतील वैवाहिकसंबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल. धान्याची रोपे आखूड होत जातील. मोठी झाडे शमीच्या झाडा प्रमाणे कमी उंचीची व दाट सावली नसलेली होतील. ढगांमध्ये विजाच जास्त चमकतील, घरेही सुनीसुनी होतील. अशा रितीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील. देवा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतःच सत्वगुणांचा स्वीकार करुन अवतार धारण करतील. सर्वशक्तीमान, सर्वस्वरुप, चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्व साधूंना कर्म बंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतील. त्याकाळी शंभल नांवाच्या गावाचा प्रमुख असणार्या विष्णू यश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राम्हणांच्या घरी कल्की नांवाने भगवान अवतार घेतील. कलियुगाच्या शेवटी, वासुदेवांच्या आज्ञेंवरुन ते पुन्हा येतील आणि पुर्वी प्रमाणेच वर्णाश्रम धर्माची स्थापना करतील. अशी ही, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि चार युगे आहेत. आपल्या युगगुणा प्रमाणे ती आपआपल्या युगांत पृथ्वीवरील प्राणिमात्रांवर आपला प्रभाव पाडतात.
ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कोणत्याही युगाच्या घटनेत इतर कोणालाही कोणताही बदल करता येत नाही. परंतु घडणार्या घटनांचे परिणामामध्ये कंाही परिवर्तन करणे शक्य असते. चारही युगांचे गुणविशेष पाहिल्यास, जी परिस्थिती कृत, त्रेता व द्वापार युगामध्ये जन सामान्यांची होती ती वृत्ती, ते वागणे, ते सामाजीक जीवन, ती जीवन मूल्ये, ती नैतिक मूल्ये आदि कलियुगांत दिसतच नाहीत किंबहूना माणसाची पातळी सर्व निकशांवर पूर्णतः घसरलेली दिसते. ही पातळी उंचावण्यासाठीच द्वापार युग संपता संपताच कृष्णाने नाथपंथाची योजना केली आहे. त्या प्रमाणे कली युगातील घटनांना सौम्य करण्यासाठी सर्वच देवांनी मिळून नाथपंथाच्या माध्यमातून प्रयत्न कण्याचे ठरविले.
****************
अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतीलअनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा अकार्यक्षम होतो आणि व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो, आणि त्यातून तो कसा बाहेर येऊ शकतो, याचे विवेचन हा खेळ प्राक्तनाचा की पूर्व संचिताचा या नरेंद्रनाथांनी लिहीलेल्या पुस्तकात केले आहे.
****************