अनुग्रह : पध्दती, महात्म्य व परिणाम

आज समाजामध्ये स्वतःला नाथपंथी म्हणवून घेणारे बरेच लोक आहेत. पण खरच ते नाथपंथी आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वेच्छेने धारण करण्यासारखा हा प्रकार नाही. आपल्या इच्छेने पाहिजे त्याला पाहिजे तेंव्हा पाहिजे तेथे हा पंथ स्वीकारला असे म्हणता येत नाही. परंपरेने अखण्ड गुरूशिष्य प्रणालीने, गुरू आज्ञेवरून, गुरूकार्य, पंथकार्य जिथे सुरू आहे, त्या परंपरेतील कार्यरत गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला असेल तरच ते नाथपंथीय गुरू व नाथपंथाचे कार्य समजले जाईल.

नाथपंथियांची वेषभूषा, केशभुषा, भस्मधारण करून, अलंकार वस्त्र धारण करून, झोळी, कफनी घेवून, स्वतःला कानफाटे करून, कमंडलू आदी भूषणे घेवून, मोर पिसांचे गुच्छे घेवून नाथपंथी होत नाही. बोलण्यातील आविर्भाव आणून, हावभाव करून नाथांचे सामर्थ्य अंगी येत नाही. जनसमुदायाकडून मान्यता मिळाल्याने देखील नाथांचे सामर्थ्य अंगी येत नाही. लोकमानसातिल लोकांची मान्यता, लोकांची अनुभूती आहे म्हणून देखील तो नाथपंथी होत नाही. पूर्वापार, पिढीजात संबंधामुळे, वंशपरंपरागत संबंधामुळे नाथपंथी होत नाही. नाथपंथी गुरूला मानून देखील नाथपंथी होत नाही. समाधिस्त नाथगुरूंच्या समाधी जवळ अनुग्रह घेऊन अगर त्यांना मनोमन मानून देखील नाथपंथी कार्यकर्ता होत नाही. स्वप्नामध्ये दिलेल्या अनुग्रहाने नाथपंथी कार्यकर्ता होत नाही.

भगवान दत्तात्रेयांचा उपासक आहे म्हणून, नाथपंथाचे कार्य केलेल्या संत महात्म्याचा पुत्र, नातलग आहे म्हणून त्यांचा वारसा आहे म्हणून किंवा त्यांच्या इस्टेटीचा वारसदार आहे म्हणून तो पंथ कार्याचा वारसदार होत नाही. समाजातले काही मान्यवर, धर्मसंस्थेचे पिठाधीश, निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करणारे सामाजीक कार्यकर्ते, वडील किंवा कोणी नातलग नाथपंथी होते म्हणून, मुलगा किंवा नातलग हा नाथपंथी म्हणून त्याला बहूमानाने संबोधतात व मुलगा आदी देखील त्याच थाटात वावरतात, पण हे कसे नाथपंथी होतील? कोणत्याही भूमित अगर वास्तूत प्रवेश करून त्यांच्या शिष्यांनी अगर वारसदारांनी अथवा कोणीही आपल्याला संकेत मिळाले असे सांगून नाथांची आज्ञा आहे असे सांगून समाजाची दिशाभूल करण्याचे कार्य करतात. नावाजलेले, मान्यवर, शास्त्राचा गाढा अभ्यास असणार्‍याने फार काय कोण्या धार्मिक पिठाच्या जबाबदार अधिकार्‍याने सांगून नाथ पंथाचे सामर्थ्य अंगी येत नाही.कोणत्याही धर्मगुरूला एखाद्याव्यक्तिला नाथपंथी आहे असे सांगण्याचा अधीकारच नाही. अध्यात्मिक क्षेत्रातले व्यवहार धार्मिक क्षेत्रापेक्षा वेगळे असतात.धर्म आणि धर्मशास्त्र वेगळे आणि अध्यात्म व अध्यात्मिक सामर्थ्य वेगळे, अध्यात्मिक परंपरा

वेगळी आहे. नवनाथ आणि परमेश्वर हे वेगळे नाही हे म्हणणे योग्य होईल परंतु धर्मगुरू व परमेश्वर एकच आहेत हे समजणे बरोबर नाही. धर्मगुरूला परमेश्वराचा मान सन्मान देणे योग्य ठरेल. परंतु त्याने तो परमेश्वर होत नाही.

 स्वतःनाथांनी केलेली कृती ही बरोबर नाही अशा अर्थाचे भास निर्माण करून अगर कोणाच्या तरी अनधिकृत व्यक्तिच्या सांगण्यावरून नाथांनी त्यागलेल्या जागेवर जाऊन स्वतःला त्यांचा उत्तरअधिकारी म्हणवून घेणे हे प्रकार ह्या युगांत घडतांना दिसत आहेत. म्हणजे नाथमहाराज जीवंत असतांना केलेले कार्य हे चुकीचे होते ह्या चुकीची जाणीव त्यांना समाधी नंतर झाली हेच प्रतिध्वनीत करण्यासारखे आहे. नाथ हयातीत असतांना केलेले सर्व कार्य बरोबर आहे आणि एवढेच काय ते चुकीचे आहे हा केवढा विरोधाभास आहे, असा खेळ खेळणार्‍यांच्या जीवाचे काय व्हावयाचे आहे ते पंथ पाहील.

काही सिद्धींच्या आधारे चमत्कार दाखवून तो नाथपंथी होत नाही. भूत, प्रेत पिशाश्चाचे खेळ दाखवून नाथपंथी होत नाही. आज समाजामध्ये गोरक्षनाथांचा साक्षात्कार झाला, त्यांनी अनुग्रह दिला मच्छिंद्रनाथांचा साक्षात्कार झाला, त्यांनी अनुग्रह दिला वगैरे सारख्या गोष्टी सांगून समाजाची फार मोठ्या प्रमाणावर दिशाभूल करणे सुरू आहे. हे नाथपंथी कसे होतील. मच्छिंद्रनाथांचे शिष्य कसे होते. गोरक्षनाथांचे शिष्य कसे होते, आणि हे कसे आहेत ह्यांचे कार्य कसे आहे, याचा थोडा तरी विचार करावा. आजच्या परिस्थितीत, मला प्रत्यक्ष नाथांचे दर्शन झाले असे सांगून आपले अनुग्रहीत तयार करून नाथपंथकार्य करीत असल्याचे भासवित असतांना लक्षांत येते. हे तर कलियुगच आहे. जनसमुदायांची दिशाभूल करून ईेशर भक्तिबद्दल संभ्रमता, साशंकता गुरूसंस्थे बद्दल अनेक प्रश्न चिन्ह निर्माण करण्याचे कार्य हे लोक सतत करीत असतात. केवळ स्वतःचा मोठेपणा मिरविण्यासाठी किंवा स्वार्थ प्रेरित हेतूंनी कार्य करीत राहणे हाच यांचा उद्देश आहे.

आज देखील समाजामध्ये नाथपंथाचे कार्य अखण्डपरंपरेने सुरू आहे. गुरूंच्या योजने प्रमाणे कार्य करणारे शिष्य आज देखील गुरूंवरील पूर्ण श्रध्देने, गुरूंनी सांगितल्या बरहुकूम कार्य करीत आहेत. हे कार्य ते स्वतःचे म्हणून करीत नाहीत तर गुरूआज्ञा म्हणून करीत असतात. इतर कोणाच्याहि आधारावर अवलंबून राहून ते गुरू कार्य करीत नाहीत. जी शिस्त गुरूंनी लावून दिली त्या प्रमाणेच पंथ कार्य आज देखील होत आहे. स्वतःच्या भावनांची, इच्छेची, स्वार्थाची वा कोणत्याही प्रापंचीक साधन पूर्तिचा विचार न करता, आपल्या गुरूआज्ञेनुसार पंथाला शोभेलसे अघटित गुरूकार्य आज देखील सुरू आहे. ज्याचा जसा योग असेल त्या प्रमाणे ह्या गोष्टिंची अनुभूति त्याला घेता येईल.

कविनारायणाने मच्छिंद्रनाथ म्हणून कार्य केले, हरिनारयणाने गोरक्षनाथ म्हणून कार्य केले असे नवनारायणांनी नवनाथ म्हणून कार्य केले हे आपल्याला आज इतिहासावरून माहित होत आहे. कार्य करतांना त्यांनी त्यांना झालेल्या आज्ञेप्रमाणे कार्य केले. कशाचीही पर्वा न करता स्वतःच्या त्रासाची पर्वा न करता, आपल्याला दिलेले अवतार कार्य ते करीत होते. त्यांच्या कार्याचे तेजच ऐवढे जबरदस्त होते की हा प्रश्न कधी उपस्थितच झाला नव्हता, संपूर्ण ब्रह्मांडशक्ती त्यांचे हाती होती. हल्लीच्या काळातील एक उदाहरण पहा. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आदींनी आपापल्या

 योजनेनुसार निरनिराळ्या ठिकाणी अवतार घेऊन पंथ कार्य केले. त्यानंतर निरनिराळ्या विभूतिंनी हे पंथ कार्य पुढे विकसीत केले. यामध्ये निरनिराळ्या शाखा उपशाखा निर्माण झाल्या. याच पंथातील गुप्त नाथांच्या शाखेतील विठ्ठलनाथजींनी चित्रकुट येथून कार्य केले. त्यांनी समाधी घेतल्यावर त्या गादीवर कांही काळ कोणीच विराजमान झाले नव्हते. त्यावेळी असे वाटू लागलं की, पंथ आता खंडला, परंतु पंथ सिध्दता एवढी प्रखर व स्वयंसिध्द असते की, गुरूंच्या समाधीनंतर देखील, नवीन गुरू त्या गादीवर स्थानापन्न झाले. जणू माधवनाथ त्या गादीवर विराजमान झाले ही पूर्वीच्याच नाथांची योजना होती. म्हणजे योग्य व्यक्तिला गुरूपद ग्रहण करायला कांही अवधी आहे तो पर्यंत जुन्या गुरूंनी समाधी घेऊ नये अशी आवश्यकता यांनी ठेवली नाही.

माधवनाथ चित्रकूटच्या गादीवर

चित्रकुटला असंच झालं विठ्ठलनाथजींनी समाधी घेतल्यानंतर तेथील कारभार पाहण्यासाठी चांगल्या मुलाची निवड करून त्याला गादीवर बसवावे, असे ठरले त्याप्रमाणे विश्वस्थांनी ठरविले की, आठ ते दहा वर्षे वयोगटातील मुलांची निवड करुन त्यापैकी ज्याची चिठ्ठी निघेल त्याला गादीवर बसवावे आणि त्याप्रमाणे एक दिवस दर्शनासाठी आलेल्या बाईच्याकडे वरील मुलाला निवडक मुलांच्या चिठ्ठ्यामधील एक चिठ्ठी काढण्यास सांगितली. लहान तान्हुल्याने निवडलेली चिठ्ठी माधव रत्नपारखी यांची होती. पुढे या मुलांचे नांव धार्मिक विधी झाल्यावर माधवनाथ ठेवण्यात आले व त्याला मंदिराच्या तळघरातील बंद गुहेत जाण्यास सांगितले. या गुहेत सिध्द सत्प्ाुरुषाच्या आज्ञेशिवाय जाणे केवळ अशक्य होते तिथे त्यांनी मोठ्यांनी अलख असे म्हणताच आतून निरंजन असा आवाज आला आणि गुहेचे दार आपोआप उघडून माधवनाथांना गुहेत प्रवेश मिळाला व गुहेचे दार लगेचच आपोआप बंद झाले. बर्‍याच वेळानंतर बाहेर आलेल्या माधवनाथाच्या मुद्रेत पूर्ण फरक पडून तो एका योग्याचा चेहरा दिसत होता. येथेच तर त्यांना पंथाचा खरा अनुग्रह झाला.

वास्तविक पाहता माधव(नाथ) रत्नपारखींच्या आईला त्या वेळी कार्यरत असलेले नासिक जिल्ह्यातील सटाण्याच्या मामलेदार देवनाथ महाराजांनी अगोदरच सांगून ठेवलं होत की हा मुलगा, थोर अधिकारी सत्पुरूष आहे. तो नाथपंथाच्या मोठ्या गादिचा मालक आहे. देवनाथांच्या पोथीतून माधवनाथांचा उल्लेख पहावयास मिळेल आणि देवनाथ महाराजांनी सांगितल्या प्रमाणे घडले देखील.

गादीवर बसल्यानंतर माधवनाथांना हिमालयात जाण्याची ईच्छा झाली आणि ते १२ वर्षे हिमालयात भ्रमण करीत साधना करीत राहिले. नंतर ते पूर्ण सिध्दतेने चित्रकुटला परत आले. तेथून आपल्या गुरुकार्याला त्यांनी आरंभ केला अशा रितीने विठ्ठलनाथांनी समाधी घेतल्यानंतर देखील पंथाच्या योजनेनुसार गुरुकार्य पंथकार्य पुढे सुरू राहिले. माधवनाथांच्या विषयी मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होणे शक्य आहे परंतु त्यांचा जीवन प्रवास व कार्य लक्षात घेतला तर हा प्रश्न म्हणजे केवळ बुध्दिभेदाचाच प्रकार आहे. चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या जन्माचा विचार केला तर त्याचे वर्णन पोथी मधून असे केले आहे.

यापरी भरतां पूर्ण दिवस | मच्छीने प्रसूतकाळसमयास | अंड सांडोनि जळतटास | मच्छी गेली जळोदरी 22 असो अंड सांडोनि तीरास | मच्छी गेली जळोदरास | त्यास काही लोटल्या दिवस | यमुनातीरीं महाराजा 23 तंवतेथें समयकाळीं | बकपक्ष्यांची उतरली मंडळी | मीन वेंचावया यमुनाजळी | निगणांसहित संचरले 24 तों अकस्मात मित्रात्यजातटीं | अंडजशुक्तिका पाहिली दृष्टी | मग सर्व मिळोनि चंचुपुटीं | खाद्य म्हणोनि भेदिती ते 25 चंचुपुटांचा भेदवज्र | तेणें अंड झाले जर्जर | द्विशकल होऊनि सत्वर | महीवरी आदळलें 26 परी वरील शकल पडिलें मही | खालील शकलांत बाळ विदेही | जैसा अर्क उदकप्रवाहीं | एकाएकीं उतरला 27 रुदनशब्द कडकडाट | बाळतेजाचा बोभाट | तें न्याहाळितां चकचकाट | पाहोनियां पळाले ते 28 असो सकळ शुक्तिका रत्नाकर | आंत मुक्तमुद्रिकेचा भद्र मच्छिंद्र | असता तमारिकन्यातीर | पावला धीवर त्या काळीं 29 कामिकनाम सुभट | पाहतां अंडजशुक्तिका प्रकट | तों आंत रत्नतेज स्फुट | बाळ रम्य देखिला 30 देखिला परी जो सविता | मग चित्तीं द्रवली मोहममता | म्हणे बाळ हें कोमळ तत्त्वतां | यातें भक्षील कोणी सावज 31 ऐसा उदय होतां चित्तीं | देव शब्दकुसुमां सांडिती | कीं हे महाराजा कामिकमूर्ती | बाळ नेईं वो सदनातें 32 अरे हा कवि नारायण | मच्छोदरीं पावला जनन | तरी मच्छेंद्र ऐसें यातें नाम | जगामाजी मिरवीं कीं 33 अरे हा दक्ष योगींद्रजेठी | तारक नौका महीपाठीं | तरी तूं संशय सोडोनि पोटीं | सदना नेईं महाराजा 34

अशा प्रकारे कवीनारायण म्हणजेच मच्छिंद्रनाथ ह्या भूमीवर कार्य करण्यासाठी आले. आगा पिछा कांहीही नाही अशा परिस्थितीत मच्छिंद्रनाथांना एवढे महत्त्व कां हा प्रश्न केवळ निरर्थक आहे. नवनाथांच्या कार्य योजने बद्दल यापूर्विच उहापोह केला आहे. मच्छिंद्रनाथांना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनीच अनुग्रह दिला. भगवानदत्तात्रेय हेच तर नाथपंथाचे आराध्य दैवत आहे. भगवान दत्तात्रेय हे नाथपंथीयांचेच काय तर सर्व गुरूंचे गुरू ते आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश ह्या तिन्ही शक्ती यांच्यात एकवटलेल्या आहेत. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती व लय किंवा संपूर्णब्रह्मांडाचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. मच्छिंद्रनाथ म्हणजेच कवी नारायण ते कोण होते व कसे होते ह्याचा उहापोह पूर्वीच केला आहे त्याचे स्मरण ह्या ठिकाणी झाले तर भगवान दत्तात्रेयांनीच स्वतः अनुग्रह का दिला हा प्रश्न राहणार नाही. शिवाय अनुग्रहाची ही परंपरा भगवानदत्तात्रेयांनीच त्यांच्या पासूनच सुरू केली आहे. प्रत्येक नाथांची ही अखंड गुरूपरंपरा आहे. मुळांत नाथपंथ हाच अखण्ड गुरूपरंपरेचा पंथ आहे.

माधवनाथांना गुहेत अनुग्रह झाला हे यापूर्वीच सांगितले आहे. त्यांनी अनेकांना अनुग्रह दिला त्यात श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांना देखील अनुग्रह दिला होता. आपला कार्यावतार संपविण्यापूर्वी त्यांनी व्यंकटनाथांना पुढील पंथ कार्याची आज्ञा स्वतःदिली होती.

अनुग्रह देणे हा पंथ कार्याचा अतीशय महत्त्वाचा भाग आहे. पंथ टिकून राहण्या करीता तसेच त्याचा विकास होण्या करिता अनुग्रहीत शिष्य असणे गरजेचे आहे. भक्त हा अनुग्रहीत शिष्य नसतो. ज्याला रितसर अनुग्रह दिला जातो तोच गुरूमार्गी शिष्य समजावा. स्वप्नात अनुग्रह, दृष्टांतमार्गाने अनुग्रह, कांही खाणाखुणांनी अनुग्रह, भावनेने अनुग्रह, स्वमनानंदानी गुरू मानणे, एकलव्यासारखे भक्तिभावाने गुरू मानणे ह्या सर्व प्रकारांनी जरी गुरूशिष्य नाते जोडले जात असले तरी असा शिष्य गुरूमार्गी होवु शकत नाही. तो गुरूपदी जावू शकत नाही. गुरू शिष्यावर कृपा करीतच असतात.कृपा करणे हा तर गुरूंचा स्थाईभाव आहे. परंतु अन्य कुणावरहि गुरूकृपा करू शकण्यासाठी गुरूंचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त करून व गुरूंची पूर्ण गुरूकृपा प्राप्त करूनच तो शिष्य गुरू आज्ञेनेच गुरूपदी जातो व पुढे गुरू कार्य करीत करीत तो कुणावरही कृपा करू शकतो. अशीच गुरू परंपरा पुढे पुढे वाढत जाते व पंथ आपले कार्य अखण्ड पणे भविष्यात करीत राहतो. अनुग्रहाचे अनेक प्रकार आहेत. अनुग्रह हा विश्‍लेषणाचा विषय नसून तो केवळ अनुभूतिचाच विषय आहे.ज्यांचा अनुग्रह घ्यायला हवा ते सद्गुरू हे साधकाच्या सान्निध्यात येतच असतात परंतु सान्निध्यात आलेल्या गुरूंकडून अनुग्रह घेणे हे साधकाच्या शुध्द मनावर अवलंबून आहे त्याच्या बुध्दिविश्‍लेषणावर अवलंबून नाही. आपले अंतःकरण आपल्याला सतत मार्गदर्शन करीत असते. ते लक्षांत घ्यावे ऐवढेच काय ते.

गुरू अनुग्रह हा एकांता देतात. अनुग्रहाची पध्दत ही गुरूच ठरवितात. अनुग्रह कुणाला, केंव्हा, कुठे व कसा द्यायचा हे सर्व गुरू स्वतःच ठरवितात. साधारणपणे मंत्र उपदेश ऊजव्या कानात करतात. ज्यावेळी अनुग्रह दिला जातो त्यावेळीच शिष्याच्या हृदयामध्ये गुरू आपल्या शक्तिचे बीज संक्रमीत करतात आणि त्यानंतर शिष्याच्या आध्यात्मिक ऊन्नतीची सुरवात होते. ज्या प्रमाणे हल्ली मोबाईलफोन कुठेही असला तरी त्याच्याशी संपर्क जोडता येतो अगदी तसेच अनुग्रहानंतर गुरू आपला शिष्य कुठेही असला कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याच्याशी ते सहज संपर्क साधु शकतात. संपर्क हा शरीराशी नसून अंतर्मनाशी असतो.मानवी जीवन हे केवळ कर्म करण्यासाठीच प्राप्त झालेले असते. हे कर्म केवळ गुरूच सांगू शकतात व करवून घेवू शकतात.गुरूंनी केलेले संस्कार हे त्या जीवावर जन्मो-जन्मी कार्य करीत राहतात. लोकानुग्रह कार्या, करसी कर्मे आर्या, कर्मातीता सदया, जय जय सद्गुरू नाथ, असे हे सद्गुरू असतात.

अनुग्रह देण्याचा अधिकारअसल्या शिवाय अनुग्रह देवूच नये. आजकाल तर कोणीही केंव्हाही अनुग्रह मागितला तर देतांना दिसतात. सामुदायिक अनुग्रह, मोठ्यांने लाउडस्पिकर वर एकाच वेळी अनेकांना अनुग्रह देणे हे तर धर्माचे केवळ राजकारण झाले. साधारणपणे भिक्षुकी करणारे, भागवत सांगणारे, धार्मिक कार्य करणारे व्यवसायाच्या भुमिकेतून अनुग्रह देतांना दिसतात. याच प्रमाणे आज समाजा मध्ये अनेक प्रकारचे लोक आध्यात्मिक कार्य करतांना दिसतात. आपण खरोखर गुरूपदी आहोत किंवा नाही याचा विचार न करता ते अनुग्रह देवून आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा प्रकारच्या अनुग्रहाने शिष्याची तर प्रगती होतच नाही पण असल्या गुरूची अधोगती झाल्या शिवाय राहतच नाही. यथायोग्य ज्ञान झाल्यावर यथोचीत गुरू कडून असल्या साधकांनी अनुग्रह घेणे उचित राहील. स्वयंसिध्द लोकांनी, ज्यांना कोणतीच परंपरा नाही त्यांनी अनुग्रह कोणत्या उद्देशाने व कां द्यावा? याचा विचार करणे जरूर आहे. जर आपल्याला कोण्यागुरूने अधिकार दिलाच नसेल तर पुढे अनुग्रह देण्याचा हट्ट कां ज्यांना अनुग्रह द्यावयाचा आहे त्यांचा पूर्ण उध्दार होणार असेल तर तो द्यावा अन्यथा त्यांना ईेशर भजनी लावावे हेच योग्य ठरेल. भगवान दत्तात्रेयांनी साक्षात्कार देवून अनुग्रह देण्यास सांगितले म्हणून अनुग्रह देतो हे केवळ दिशाभूल करणे आहे. आजदेखील परंपरेने आध्यात्मिक सामर्थ्य संपादन करणारे सत्पुरूष आहेत. भगवान दत्तात्रेय कांहीही करू शकतात परंतु असा विरोधाभास ते करतील यावर विेशास बसतच नाही.

अवतारी सत्पुरूष जेथून कार्याला सुरवात करतात तेथूनच पंथाची निर्मिती होवू शकते. अन्य कुणी पंथ सुरू करणे ही केवळ विडंबनाच आहे. पंथाची जबाबदारी ज्यांनी स्विकारली आहे तेच पंथाचा विकास करीत असतात त्या बद्दल कोणत्याही स्वरूपाची काळजी करण्यासारखे काही नाही किंवा पंथविकासाचा विचार सामान्यांनी करूच नये. ज्यांनी पंथाचा आरंभ केला ते तत्त्वरूपाने त्यात सदैव व्याप्त असतात तेच पंथ विकासाकडे लक्ष ठेवून असतात.

अखंड परंपरेने जेथे पंथ कार्य होते तेथे घडणारे कार्य हे अखण्ड परंपरेच्या शक्तितूनच घडत असते. कार्य करीत असणारी व्यक्ति कोण आहे ह्याचा विचार न करता त्या व्यक्तिकडून घडणारे कार्य हे पंथाला मान्य असणारेच घडते, पंथ सामर्थ्यानेच ते घडत असते.संपूर्ण पंथ शक्ति ही पंथ कार्य घडवित असते. पंथशक्तिच्या विरोधात कोणतीही व्यक्ति वा शक्ती कार्य करू शकत नाही.

द्वापार युगामध्ये दुर्योधनाने म्हटले आहे,

जानामि धर्मं नच मे प्रवृत्ती | जानामी अधर्मं नच मे निवृत्ति | केनोपमा हृदिस्थितेन | यथा स्थितोसि तथा करोमि|

जेवढा धर्मराजाचा धर्माचा अभ्यास आहे. तेवढाच माझा देखील आहे परंतु माझी प्रवृत्ति ही धार्मीक नाही तसेच अधर्मीक प्रवृत्ती मी सोडू शकत नाही. दुर्योधनाचे व्यक्तिमत्त्व कितीही वाईट असल तरी त्याने प्रामाणीक पणे आपली व्यथा सर्वांसमोर मांडली. असेच कलियुगाने ब्रह्मदेवा समोर सांगितले आहे. परंतु द्वापायुगाची प्रवृत्ती कलियुगासारखी नसल्यामुळे त्याप्रवृत्तिचा अंत झाला. कलियुगाची हीच प्रवृत्ती असल्यामुळे जो पर्यंत कलियुग आहे. तो पर्यंत ही प्रवृत्ती राहणारच आहे.


Leave a Reply