चौथ्या अध्यायात रामेश्वरहून मच्छिंद्रनाथ पायीपायी जात असतांना एका घनघोर जंगलामध्ये हिंगळादेवीच्या दर्शनासाठी गेले.तेथे अष्टभैरवांचा पराभव करून देवीच्यादासींची फजीती केली व हिंगळादेवीचे, अंबेचे दर्शन घेतले. अंबेने मच्छिंद्रनाथांची परीक्षापाहून त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र दिले.
मच्छिंद्रनाथ तीर्थाटण करीत करीत हिंगळादेवीच्या दर्शनासाठी आले. हिंगळादेवी ही साक्षात ज्वालामुखीसारखी महाप्रदिप्त आदिशक्ती आहे. घनदाट आरण्यात हिचे स्थान आहे. या मंदिराचे महाद्वार हे जवळजवळ ५०फुटी उंच आहे. या मंदीरावर द्वारपाल म्हणून अष्ट भैरव होते.
अश्वत्थाच्या झाडाखाली मच्छिंद्रनाथांनी सर्व देव अनुकूल करून घेतले होते हे या अष्टभैरवांनी पाहीले होते. अष्टभैरवांनी, मच्छिंद्रनाथांना पाहताच ओळखले. नाथांना मिळालेली अस्त्रे आदी वरदाने कितपत सिध्दिस गेली हे पहावे अशा हेतूने मच्छिंद्रनाथांची परीक्षा घेण्याचे अष्टभैरवांच्या मनात आले. त्यांनी स्वतःचे रूप बदलून संन्यासाचे रूप धारण केले व दाराशी उभे राहून त्यांनी मच्छिंद्रनाथाला विचारल्यावर त्याने सांगितले, ‘मला देवीचे दर्शन घ्यावयाचे आहे, म्हणून मी आत जात आहे.’
ते ऐकून संन्याशी म्हणाले, ‘आम्ही येथले व्दारपाल आहोत. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पाप-पुण्याची चौकशी करुन, जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यालाच आम्ही आत जाऊ देतो. तुझ्या पाप-पुण्याचा झाडा देऊन तू आत जा. दर्शनाचा आव आणून रतिसुखाच्या मिषाने कोणी आत जाऊ लागले तर आत प्रवेश करताना तो दारात अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते, खोटे बोलून अडकला असे दिसताच आम्ही त्याला मागे ओढून शिक्षा करतो. तेव्हा तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील, ती ती सर्व सांगा व मग दर्शनास खुशाल जा’ अष्टभैरवांचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, ‘मी पाप-पुण्य काही जाणत नाही. माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती ती मी ईश्वरासाठी केली आहेत. आम्ही जती, पाप-पुण्यापासून अलिप्त आहोत.’
मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, ‘जन्माला आल्यापासून तू केलेली कर्मे लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही, तुला शिक्षा भोगावी लागेल. म्हणून काही वाईट असेल ते सांगून आत जा म्हणजे अंबाबाई तुझ्यावर कृपा करील व तुला दर्शन देईल.’
हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला, ‘प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. माझ्यापुढे तुम्हा क्षुद्रांचा काय प्रताप?’ ते ऐकून अष्टभैरवांना राग आला. त्रिशूळ, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, बरची, गदा, भाले, कुर्हाडी अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ते युध्दाला सिध्द झाले. मच्छिंद्रनाथाने ‘जय जय श्रीदत्त गुरुराज’ म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले, ‘मित्रा, वरुण देवा माझ्या कार्यासाठी सहाय्य करा. वरुणी, अग्नी, वायु, इंद्रादि देव-गण, गंधर्व यांनी मला मदत करावी.’ अशा तर्हेने सर्वांना युध्दाचे आमंत्रण करुन मंतरलेले भस्म दाही दिशांना फेकले. नंतर वज्रपंजरप्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली. त्याबरोबर शरीर वज्राहून कठीण झाले. मग मच्छिंद्रनाथाने भैरवांना सांगितले, ‘तुम्ही आता आळस करुन वेळ लावू नका. युध्द करण्यास तयार व्हा. युध्द केले नाहीत तर तुमच्या मातापित्यांची शपथ आहे. युध्दाला या नाहीतर विहिरीत जीव द्या.’ ही कठोर वाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने युध्दाला सुरवात केली. होता होता घनघोर युध्द सुरू झाले अनेक प्रकारची अस्त्रे, शस्त्रे मच्छिंद्रनाथांच्या अंगावर टाकली पण कांहीच उपयोग झाला नाही. शेवटी मच्छिंद्रनाथांनी निरनिराळी अस्त्रे टाकून, अष्टभैरवांचे जीव कासावीस केले.
घनघोर युध्दाचा आवाज एकून, अंबेने काय सुरू आहे, याचा शोध घेण्यासाठी आपल्या लावण्यवती दासी पाठविल्या. सर्व दासींनी मिळून शस्त्रास्त्रांचा खूप जोर वाढविला, परंतु मच्छिंद्रनाथापुढे कोणाचेच काही चालत नव्हते. मच्छिंद्रनाथांनी सर्वांचीच फजीती केली आणि कोणाचेही काहीही चालत नव्हते. हे सर्व पाहून भवानी मातेला खूपच आश्चर्य वाटले. तिने अंतर्ज्ञानाने हा कोण आहे व काय करतो हे पाहिले. तिच्या दिव्य दृष्टीला कवीनारायणाने मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेतल्याचे लक्षांत येताच ती मच्छिंद्रनाथांसमोर प्रगट झाली. देवीला पाहताच मच्छिंद्रनाथांनी तिला वंदन केले व तिची स्तुती केली. देवीने प्रसन्न होवून त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि भैरवांची व सर्वांचीच सुटका करण्याची मच्छिंद्रनाथांना विनंती केली. देवीची आज्ञा म्हणून मच्छिंद्रनाथांनी तसे केले. त्यानंतर देवीने, मच्छिंद्रनाथाला सांगून, त्याची परीक्षा घेतली. देवीने त्याची परीक्षा घेण्यासाठी मच्छिंद्राला पर्वत आकाशात उंच उडवून पुन्हा जागच्या जागीच ठेवून दाखव म्हणून सांगितले. मच्छिंद्रनाथांनी त्याप्रमाणे करून दाखविले. देवी त्याच्यावर खूप प्रसन्न झाली व त्याला आपल्या जवळ तीनदिवस ठेवून घेतले आणि जाण्यापूर्वी पुढील कार्यासाठी स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र दिले.
मग ते अष्ट भैरववीर | येत झाले अंबिकेसमोर | म्हणती अंबे प्रताप थोर | मच्छिंद्रानें पैं केला ॥145॥ आम्ही याची युद्धमांडणी | घेऊं सकळ परीक्षाकडसणी | मग नागपत्रएशत्थाहूनी | कथा वदली अंबेतें ॥46॥ नागएशत्थाहूनि ऐकतां गोष्टी | माता म्हणे हा धन्य धूर्जटी | मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी | प्रताप कांहीं दावीं कां ॥47॥ जैसें पयामाजी तोय | शोषूनि घेती हंस पय | तेवीं आता युद्धसंदेह | काढूनि दावीं चक्षूतें ॥48॥ यावरी बोले मच्छिंद्रनाथ | कैसी दावूं कोणत्या अर्थ | माता म्हणे हा पर्वत | आकाशातें मिरवीं कीं ॥49॥ मिरवेल परी जेथील तेथ | पुन्हा ठेवीं मूर्तिमंत | ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ | करीं कवळी भस्मातें ॥50॥ मग वायुअस्त्र फणिदैवत | मंत्रजल्पे केलें युक्त | पर्वतीं फेंकितां भस्म होत | उदयवातचि जो झाा ॥51॥ वात मौळीं कद्रुनंदन | पर्वत मौळीं शीघ्र वाहून | वातचक्रीं करी भ्रमण | चंडरथासमान कीं ॥52॥ त्यातें उलथावया शक्ती | अंबा पाहे आपुल्या चित्तीं | परी शेषमौळींची पर्वतमाती | दृढ असे ढळेना ॥53॥ मग मनीं म्हणे हा धन्य नाथ | जेणें ऐक्य केला पर्वत वात | शत्रु समरीं ऐक्य चित्त | मिरविलाही हें धन्य ॥54॥ पर्वत पूर्ण वातावरी | तो वात मिरवी घेऊनि शिरीं | जैसा मत्स्यकोदरी | येवोनियां दडाला ॥55॥ कीं व्याघ्रअजानांदवटी | नांदविले एका पेटीं | कीं उरग उरगारी सांगती गोष्टी | प्रेमभावे मिरवूनियां ॥56॥ तन्न्याय मच्छिंद्रें केलें | धन्य सद्विद्येचें धाम रचिलें | मग कुरवाळूनि म्हणे वहिलें | पर्वतातें उतरीं कां ॥57॥ मग मच्छिंद्रें वात आकर्षून | ठायींच्या ठायीं नग उतरून | ठेवूनि अंबेचें समाधान | सद्विद्येनें पैं केलें ॥58॥ यावरी नाथ आणि भगवती | गेलीं अंबिकास्थानाप्रती | तेथें राहूनि तीन रात्री | पुसूनियां चालिले ॥59॥ मग अंबा प्रसन्न होऊन | अस्त्रें दिधलीं त्यातें दोन | स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न | प्रसादातें निवेदिलें ॥60॥ असो ऐसा प्रसाद घेऊन | निघता झाला मातेसी नमून | बारामल्हारांचा मार्ग धरून | जाता झाला तो नाथ ॥161॥
वास्तवीक पाहता आजच्या काळात अशा अस्त्रांचा, दैनंदीन जीवनात कोणताही उल्लेख होतांना दिसत नाही. आजची परिस्थिती देखील अगदीच वेगळी आहे. परंतु हे सामर्थ्य, देवतांची वचने, विविध अस्त्रे, शस्त्रे, आदि सर्व सांकेतीक रूपाने जेथून अखंड पणे पंथ कार्यसुरू आहे तेथे विद्यमान आहेत. आज या सर्वांचा उपयोग पूर्वी सारखा दृष्य स्वरूपात होत नसला तरी पंथ कार्य करतांना त्याचा उपयोग आजही होतो. जनसामान्यांसाठी ह्याचा उपयोग कधीच नव्हता, परंतु पंथकार्यकरतांना व्यक्तिगत किंवा जनसामुदायाच्या समस्या सोडविण्यासाठी ज्या विविध योजनांचा विनीयोग करावा लागतो त्यासाठी या सामर्थ्याची गरज व उपयोगिता आजही आहे.
नाथपंथाचे पारंपरिक स्थान माधवनाथांनी बदलले
माधवनाथांनी आपले क्षेत्र व कार्यस्थळ चित्रकूट बदलण्याचे ठरविले. त्यांनी आपले कार्यक्षेत्र देवगांवरंगारी जिल्हा औरंगाबाद हे निश्चित केले. चित्रकूट हे उत्तरप्रदेशात येते तर औरंगाबाद महाराष्ट्र मराठवाडा येथे येते. माधवनाथांना हा बदल करत असतांना प्रत्यक्ष बालाजीने दर्शन देवून आदेश दिला होता. नाथ पंथीयांच्या मंदिरात सहसा पंथाचे अराध्य दैवत भगवान श्री दत्तात्रेयाची मूर्ती असते परंतु येथे काही वेगळेच घडले. लोकोध्दार करीत व देशभ्रमण करीत माधवनाथमहाराज, गिरीच्या बालाजीला दर्शनासाठी जात असतांनाच पांढर्याघोड्यावर बसलेले पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले एक तेज:पुंज सत्प्ाुरुष अचानकपणे त्यांचे समोर आले त्यांनी आपल्या झोळीतून प्रभावळीसहीत पंचायतन काढून माधवनाथाच्या हातात दिले आणि म्हणाले की, ‘बच्चा बालाजी क्या और दत्त क्या दोनों एकही है इसकी स्थापना करना’ एवढे सांगून ते सत्पुरुष घोड्यासह अदृश्य झाले.
बालाजीचे दर्शन झाल्यावर ते पुन्हा भ्रमण करीतकरीत घृष्णेश्वर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले आणि वेळ गंगेचा शोध घेत घेत ते देवगांव ररंगारी येथे आले. तिथे त्यांना एक उकीरडा दिसला आणि ‘यहॉं हमारा मंदिर दिखता है’ वाक्य त्यांचे तोंडून निघाले. चित्रकुटच्या मंदिराची आखणी लक्षात घेऊन देवगांव येथील मंदिराची योजना त्यांनी स्वत:संपूर्ण केली आणि मंदिराची उभारणी पूर्ण करुन स्वयंसिध्द मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. चित्रकुटचा त्याग केल्यावर पंथाचे सर्व महात्म्य माधवनाथांनी स्वत: देवगांवरंगारी येथे आणले आणि परत पुन्हा त्यांनी चित्रकुटला कधीच पाय ठेवला नाही.
चित्रकूटला पंथाची सर्व आभूषणे होती. चित्रकूट येथे मंदिरा खालच्या गुहेत ती होती. त्या गुहेत कोणालाही जाणे शक्यच नव्हते. नाग देवता व अग्नी देवता त्याचे रक्षण करीत होते. कुणालाही प्रवेश नव्हता. फक्त नाथांनाच आत कसे जायचे हे माहित होते. फक्त त्यांनाच प्रवेश होता. म्हणून स्वतःमाधवनाथांनीच चित्रकूटला जावून येथील पंथाची आभूषणे, वस्त्रे, शस्त्रे, अस्त्रे, विभूती आदी सर्व आपल्या योग शक्तीने, आकाशमार्गातून देवगांव येथे आणले आणि बोलल्या प्रमाणे चित्रकूट येथील पंथाची सिध्दता व तेथून चालणारे पंथ कार्य संपुष्टात आणले. नाथपंथ कार्याचा, नाथपरंपरेचा किंवा नाथपंथाच्या चित्रकुटच्या गादीचा वारसासंबंध कोणाशी व कोणताच नसून हे सर्व कार्य परंपरेनुसार देवगांवरंगारी येथूनच चालेल असे सांगितले. येथून पंथाचे वा गुरु परंपरेचे कोणतेही कार्य भविष्यात देखील होणार नाही हे सांगून चित्रकुटचे सर्व महत्त्व माधवनाथांनी स्वत:च देवगांव येथे आणले. ज्या प्रमाणे पूर्वी अस्त्रे, मंत्र यांचा उपयोग करायचे त्याच प्रमाणे माधवनाथांनी चित्रकुटचे सर्व वैभव, स्थान महात्म्य आपल्या योग साधनेने देवगांवरंगारी येथे आणले. हे जरी कोणाला दिसण्यासारखे नव्हते तरी ते प्रत्यक्षात घडले आहे. जेंव्हा हे सर्व वैभव देवगांवला आणले तेंव्हा स्वतः व्यंकटनाथांनी ह्याचा अनुभव घेतला होता.
अश्वत्थाच्या झाडाखाली मच्छिंद्रनाथांनी केलेली उपासनाहि विशेषच महत्त्वाची होती.सर्व देवदेवतांना अश्वत्थवृक्षा खालीच प्रसन्न करून त्यांच्याकडून अबाधीत वचने घेतलीत व अखंड नाथकार्या साठी त्यांना पूर्ण अनुकूल करून घेतले होते.
मारूतीने आपल्या भक्ताला नरेंद्रनाथांकडे पाठविले
नाथशक्तिपीठाचे कार्य सुरू झाल्यावर याच शक्तिंनी सर्वतोपरी मदत केली आहे. एकदा एक गृहस्थ संध्याकाळी नरेंद्रनाथ महाराजांच्या निवास स्थानी दर्शनासाठी आले होते. दोघेही ऐकमेकांना पहिल्यांदाच भेटत होते. यापूर्वी कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती. ते म्हणाले, ‘महाराज मी तुमच्या दर्शनासाठी आलो आहे.’ नरेंद्रनाथमहाराजांनी आपली ओळख दिली नाही व त्यांना आपल्या गुरूंच्या गादीच्या दर्शनासाठी आंत नेले. गादीचे दर्शन झाल्यावर ते पुन्हा म्हणाले, ‘महाराज मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे.‘’ त्यावर नरेंद्रनाथ महाराज म्हणाले, ‘मी तर सी.ए.ची प्रॅक्टिस करतो.’ त्यावर ते म्हणाले की, ‘मला आपल्याच दर्शनासाठी पाठविले आहे.’ कोणी पाठविले विचारल्यावर ते म्हणाले, ‘स्वतः मारूतीरायाने पाठविले आहे.’ ‘ते कसे ?’ असे विचारल्यावर ते म्हणाले की, ‘ते माझ्या स्वप्ना मध्ये आले. माझ्याशी बोलले, त्यांनी तुम्हाला दाखविले एवढेच नाही तर अकोल्याला तुमचे घरी कसे जायचे तो मार्ग देखील त्यांनीच दाखविला, त्या प्रमाणे मी तुमच्याकडे कुणालाही न विचारता आलो. आता माझे काम करून द्या.’ त्यांनी आपली कोणतीही बाजू मांडली नाही. माझा प्रश्न सोडवून द्या एवढाच आग्रह धरला. वास्तविक पाहता त्या गृहस्थांचे गुरू १०१ वर्षाचे होते व ते संन्यासी होते. त्या गुरूंनी देखील त्यांना माझ्याकडे पाठविले. काय ही परीक्षा हे त्यांनाच माहीत. त्यांच्याशी जुजबी बोलणे केल्यावर त्यांना सांगितले की, ‘तुम्हाला पुन्हा यावे लागेल.’ त्यावर ते ठीक आहे म्हणाले. पुन्हा केंव्हा याल असे विचारताच ते म्हणाले, ‘स्वतः मारूतीराया सांगतील तेंव्हा येईन,’ असे म्हणून ते गेले व पंधरा दिवसांनी मारूतीरायाने पहिल्याप्रमाणेच स्वप्नदृष्टांत देवून पुन्हा पाठविले. त्यानंतर खात्री पटल्यावरून त्यांना मार्गदर्शन केले व पुढे कसा मार्ग काढावा हे समजावून सांगितले. येथे मारूतीरायाने नरेद्रनाथांची परीक्षा देखील घेतली व आपल्या भक्ताला मार्गदर्शन तेच करू शकतात. दुसरे कोणी त्यांचे काम करू शकणार नाही म्हणूनच त्यांनी आपल्या भक्ताला नरेंद्रनाथांकडे पाठविले.
नवनाथांचे चरित्र वाचतांना त्यांनी केलेले अध्यात्मीक कार्य व त्यांचे अध्यात्मीक प्रदर्शन हा एक जादूचा खेळ वाटुशकतो, परंतु विविध प्रकारचे सामर्थ्य पंथाजवळ कसे आहे त्याचे वर्णन व त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले आहे त्या मुळे त्याची व्याप्ती, तीव्रता आदी लक्षांत येते. ज्या विविध शक्तींना प्रत्यक्ष जीवनात सामोरे जावे लागते. त्याकरता अशा अस्त्रांची गरज असते. पंथाची सिध्दता वाढविण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत कोणाकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या अस्त्रांची व सामर्थ्याची आवश्यकता असते. ही अस्त्रे दिसत नाहीत पण त्यांचा परीणाम होतांना दिसतो